गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रात जनगणना 2027 (टप्पा-1) संदर्भात राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

Posted On: 19 FEB 2026 6:46PM by PIB Mumbai

 

जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यासंदर्भातील (घरांची यादी आणि गृहसंख्या गणना) राज्यस्तरीय परिषद मुंबईतील मलबार हिल भागातील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. जनगणना 2027 ही भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना म्हणून एक ऐतिहासिक टप्पा ठरणार असून क्षत्रिय माहिती संकलनासाठी विशेष मोबाईल ॲप ‘सीएमएमएस’ (जनगणना देखरेख आणि व्यवस्थापन प्रणाली) पोर्टलद्वारे रिअल-टाइम निरिक्षण आणि नागरिकांसाठी सुलभ स्व-नोंदणी सुविधा यांचा वापर केला जाणार आहे.

ही परिषद महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल; भारताचे नोंदणी महानियंत्रक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण; अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्य जनगणना नोडल अधिकारी सीमा व्यास यांच्या आभासी उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या जनगणना संचालिका आणि मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे तसेच वरिष्ठ राज्य अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जनगणना संचालका संचालनालयाचे अधिकारी या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

महाराष्ट्रात पहिला टप्पा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबविला जाईल अशी माहिती देण्यात आली. स्वयं-नोंदणी पोर्टल 1 मे ते 15 मे 2026 पर्यंत खुले राहील. यामुळे नागरिकांना गणनाकर्त्यांच्या भेटीपूर्वी घरातील तपशील ऑनलाइन सादर करता येतील. राज्यभरात सुमारे 2.64 लाख गणनाकर्ते आणि पर्यवेक्षक तैनात केले जाणार आहेत. सीएमएमएस पोर्टल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर रिअल-टाइम निरिक्षण, पुनरावलोकन आणि अहवालनियोजन सुनिश्चित करेल.

परिषदेला संबोधित करताना मुख्य सचिवांनी पारदर्शकता, माहितीची गुणवत्ता, तांत्रिक एकात्मता आणि वेळापत्रकाचे काटेकोर पालन यावर भर दिला. नोंदणी महानियंत्रकांनी पुराव्यावर आधारित नियोजन आणि प्रशासनासाठी जनगणना आकडेवारीचे राष्ट्रीय महत्त्व या बैठकीत अधोरेखित केले.

जनगणना संचालक आणि मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रोडमॅप, वेळापत्रक आणि प्रशासकीय तयारी सादर केली. त्यांनी क्षमता बांधणी, प्रगत डिजिटल प्रणालींचे एकत्रीकरण, क्षेत्रीय स्तरावरील तयारी उपक्रम तसेच सुरळीत आणि अचूक डेटा संकलन सुनिश्चित करण्याकरिता प्रसिद्धी उपायांसाठी संरचित प्रशिक्षण कॅस्केड मॉडेलची रूपरेषा सादर केली.

जनगणना 2027 देशभरात दोन टप्प्यात आयोजित केली जाईल: पहिला टप्पा (एप्रिल-सप्टेंबर 2026) आणि दुसरा टप्पा (फेब्रुवारी-मार्च 2027).

जनगणना 2027 पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञान-आधारित पद्धतीने पार पाडली जाईल याची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा वचनबद्धता व्यक्त करण्यात आली.

***

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2230874) अभ्यागत कक्ष : 21
Read this releasein: English