शिक्षण मंत्रालय
इग्नूने पाच नवीन ‘करिअर’ केंद्रित अभ्यासक्रम केले सुरू; मार्चमध्ये होणार विद्यापीठाचा 39 वा दीक्षांत समारंभ
Posted On:
18 FEB 2026 6:38PM by PIB Mumbai
नागपूर, 18 फेब्रुवारी 2026
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नूने) जानेवारी 2026 शैक्षणिक सत्रापासून मुक्त आणि दूरस्थ शिक्षण पद्धती (ओडीएल) अंतर्गत पाच नवीन अभ्सासक्रम सुरू केले आहेत.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना, इग्नू प्रादेशिक केंद्र नागपूरचे प्रादेशिक संचालक डॉ. लक्ष्मण कुमारवाड यांनी सांगितले की, नव्याने सुरू केलेल्या कार्यक्रमांमध्ये दोन पदव्युत्तर पदवी - डेटा सायन्स अँड अॅनालिटिक्समध्ये एम.एससी. (एमएससीडीएसए) आणि मानवी मूल्ये आणि नीतीशास्त्र या विषयामध्ये एम.ए अभ्यासक्रम सुरू केला आहे. याशिवाय दोन पदव्युत्तर पदविका – भारतीय तत्वज्ञानामध्ये पदव्युत्तर पदविका ( पीजीडीबीडी ) आणि कचरा व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका (पीजीडीडब्ल्यूएएम) आणि एक पदवीपूर्व कार्यक्रम – वस्त्र आणि परिधान डिझाइनमध्ये बी.एससी. यांचा समावेश आहे.
एम.एससी. डेटा सायन्स अँड अॅनालिटिक्समध्ये व्यावहारिक अनुप्रयोगांसाठी संगणकीय आणि सांख्यिकीय कौशल्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
मानवी मूल्ये आणि नीतिमत्तेतील एम.ए.हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 शी सुसंगत आहे. भारतीय तत्त्वज्ञानामधील पदव्युत्तर पदविका आणि कचरा व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका हे एक वर्षाचे कार्यक्रम आहेत. फॅब्रिक आणि पोशाख डिझाइनमधील बी.एससी. हा तीन वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे.
जानेवारी 2026 सत्रासाठी नवीन प्रवेशाची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी, 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. दुसऱ्या/तिसऱ्या वर्षाच्या किंवा दुसऱ्या ते सहाव्या सत्राच्या पात्र विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी 28 तारखेला किंवा त्यापूर्वी पुन्हा नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
डॉ. कुमारवाड यांनी असेही सांगितले की, इग्नू प्रादेशिक केंद्र नागपूर विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमधील - नांदेड, हिंगोली आणि परभणीमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि प्रशासकीय सहाय्य प्रदान करते.
डिसेंबर 2024 आणि जून 2025 च्या सत्र अखेरीच्या परीक्षांमध्ये आपले अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ मार्च 2026 मध्ये 39 वा दीक्षांत समारंभ आयोजित करणार आहे. आगामी शैक्षणिक सत्रासाठी बी.एड. प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीही सुरू झाली आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी प्रवेश आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावे, असे आवाहन डॉ. कुमारवाड यांनी केले आहे.
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229842)
अभ्यागत कक्ष : 20