नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
भारताने हरित हायड्रोजन मूल्य निर्धारणात जागतिक मानक स्थापित केले : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
भारताच्या व्यापक आणि सर्वसमावेशक ऊर्जा संक्रमणात महाराष्ट्र महत्वाचा घटक म्हणून उदयास आला आहे : केंद्रीय मंत्री जोशी
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मुंबई हवामान सप्ताह कार्यक्रमाला संबोधित केले; भारताची स्वच्छ ऊर्जा गती अधोरेखित केली
Posted On:
17 FEB 2026 3:55PM by PIB Mumbai
मुंबई , 17 फेब्रुवारी 2026
केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज प्रथमच आयोजित मुंबई हवामान सप्ताहला संबोधित केले. भारताची हवामान विषयक महत्त्वाकांक्षा आता प्रत्यक्षात निर्णायक हवामान कृतीत रूपांतरित होत असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. ते म्हणाले की राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत, भारताने हरित हायड्रोजन मूल्य निर्धारणात एक नवीन जागतिक मानक स्थापित केले आहे, ज्या अंतर्गत नवीन किंमत प्रति किलो 279 रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. त्यांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक हरित अमोनियाच्या मूल्य निर्धारणाचा देखील उल्लेख केला , जे उदयोन्मुख स्वच्छ इंधन बाजारपेठांमध्ये भारताचे नेतृत्व बळकट करते.
राष्ट्रीय पातळीवर, भारत या आठवड्यात पंतप्रधान सूर्य घर: मुफ्त बिजली योजनेअंतर्गत 30 लाख लाभार्थी कुटुंबांचा टप्पा पार करणार आहे, जो देशभरात वितरित छतावरील सौरऊर्जा वाढविण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले की भारताची बिगर- जीवाश्म इंधन क्षमता 272 गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे, जी गेल्या दशकातला जलद विस्तार दर्शवते. सौरऊर्जा क्षमता 141 गिगावॅट आणि पवनऊर्जा क्षमता 55 गिगावॅट आहे, ज्यामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात जगातील आघाडीच्या देशांपैकी एक म्हणून भारताचे स्थान बळकट झाले आहे. भारताने निर्धारित वेळेपूर्वी त्याच्या स्थापित वीज मिश्रणात 52 टक्क्यांहून अधिक बिगर- जीवाश्म क्षमता गाठली आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारताने शाश्वत विकासाला विकासाचे एक शक्तिशाली इंजिन म्हणून प्रस्थापित करून जागतिक हवामान परिदृश्यात बदल घडवून आणला आहे असे ते म्हणाले. धोरणात्मक स्थिरता, वित्तीय तरतूद आणि संस्थात्मक समन्वय यांच्या मदतीने देशातील नवीकरणीय ऊर्जा उत्पादन परिसंस्था वेगाने विस्तारली आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आर्थिक विकास आणि पर्यावरणीय प्रगती एकत्रितपणे कशी पुढे जाऊ शकते हे दाखवून देत आहे. त्यांनी अधोरेखित केले की, पीएम-कुसुम आणि पीएम सूर्य घर: मुफ्त बिजली योजना यासारख्या प्रमुख योजनांद्वारे, शेतकरी आणि कुटुंबे स्वच्छ ऊर्जा संक्रमणात सक्रिय सहभागी होत आहेत, ऊर्जा ग्राहक वरून ऊर्जा उत्पादक बनत आहेत.
जोशी यांनी नमूद केले की महाराष्ट्राने या वर्षाच्या अखेरीस सुमारे 16 गिगावॅट सौर क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे, ज्यामध्ये दरमहा होणारी लक्षणीय वाढ राज्याच्या नवीकरणीय ऊर्जेला बळकटी देत आहे. त्यांनी अधोरेखित केले की पीएम-कुसुम अंतर्गत कृषी फीडरच्या सौर ऊर्जेद्वारे संचालनामुळे शेतकऱ्यांचा वीज पुरवठ्याचा खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, अनुदानाचा भार कमी झाला आहे आणि स्थिरता वाढली आहे.
मुंबई हवामान सप्ताहकडे केवळ संवादाचे व्यासपीठ नाही तर स्वच्छ शहरे, स्पर्धात्मक उद्योग आणि लवचिक, शाश्वत भविष्यासाठी एक निश्चित पाऊल म्हणून पाहिले जावे यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला . त्यांनी मजबूत भागीदारी, व्यापक नवोन्मेष, नवीकरणीय ऊर्जा प्रणालींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसह प्रगत तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण आणि साठवणूक आणि हरित हायड्रोजन उपायांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229126)
अभ्यागत कक्ष : 44