अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने आज मुंबईत भागधारकांसोबत अर्थसंकल्पोत्तर संवादात्मक सत्राचे केले आयोजन

Posted On: 12 FEB 2026 8:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 फेब्रुवारी 2026

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) मुंबईतील ‘न्यू कस्टम हाऊस’ येथे व्यापार संघटना, वाणिज्य मंडळे, निर्यातदार, आयातदार, संरक्षक (कस्टोडियन), सीमाशुल्क दलाल,  माल वाहतूक सेवा प्रदाते यांच्या प्रतिनिधींबरोबर एक संवादात्मक सत्र आयोजित केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ‘सीबीआयसी’चे अध्यक्ष विवेक चतुर्वेदी आणि सीबीआयसीचे सदस्य (आयटी, करदाता सेवा आणि तंत्रज्ञान) योगेंद्र गर्ग यांनी भूषवले. मुंबई सीमाशुल्क तसेच वस्तू आणि सेवा कर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त, सहसचिव (सीमाशुल्क), आयुक्त (सीमाशुल्क आणि निर्यात प्रोत्साहन) तसेच वस्तू आणि सेवा कर धोरण विभागाचे आयुक्त हे देखील विभागाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपस्थित होते.

आपल्या भाषणात चतुर्वेदी यांनी 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अप्रत्यक्ष कर क्षेत्रातील विश्वासावर आधारित प्रशासनावर भर देणाऱ्या नव्याने सुरू केलेल्या सुधारणा सरकारच्या दृष्टिकोनाला कसे हातभार लावतील हे स्पष्ट केले. त्यांनी अर्थसंकल्पीय धोरणातील बदलांचे बारकावे स्पष्ट केले. सीमाशुल्क प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सीमाशुल्क विभाग कसे काम करत आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

गर्ग यांनी आपल्या भाषणात जलद मंजुरी, चांगले व्यवसाय नियोजन आणि ‘मेक इन इंडिया’ मजबूत करण्यासाठी इतर सहभागी सरकारी संस्थांसह सर्व निर्यात-आयात भागधारकांना जोडणाऱ्या एकल एकात्मिक डिजिटल परिसंस्थेचे फायदे अधोरेखित केले.

सीमाशुल्क विभागाच्या सहसचिवांनी माहिती दिली की, सार्वजनिक सुविधा आणि या उपक्रमांचे सुलभ आकलन व्हावे यासाठी सीबीआयसीने वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) जारी केले असून ते https://www.cbic.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत.

व्यापार आणि उद्योगातील शंका दूर करण्यासाठी भागधारकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने हे सत्र आयोजित केले होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधण्यात आला.

चतुर्वेदी यांनी मुंबई सीमाशुल्क विभाग, विमानतळ, कुरिअर टर्मिनल आणि सीजीएसटीमधील अत्याधुनिक स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. सुधारणा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच व्यापार आणि उद्योगासाठी व्यवसाय सुलभता वाढवण्याबद्दल त्यांना जागरूक करण्यात आले. 

 

* * *

सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227279) अभ्यागत कक्ष : 8