शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टाटा समाज विज्ञान संस्थेच्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त 'टिस ग्लोबल' उपक्रमाचा आरंभ


भारताचा विकासाच्या वाटचालीचे जागतिक मंचावर दर्शन

Posted On: 12 FEB 2026 7:08PM by PIB Mumbai

मुंबई, 12 फेब्रुवारी  2026

 

टाटा समाज विज्ञान संस्थेने (टीआयएसएस) आपल्या संस्थेच्या स्थापनेस 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, ‘टीआयएसएस ग्लोबल’  या आंतरराष्ट्रीय स्तरावर समावेशक आणि नाविन्यपूर्ण व्यासपीठ सुरू केले असून ते व्यापक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि भू-राजकीय संदर्भात झालेली भारताची प्रगती आणि विकासाचे परीक्षण करून त्याला बळकटी देण्यासाठी समर्पित आहे.

कुलगुरू प्रा. बद्री नारायण तिवारी यांच्या हस्ते ‘टीआयएसएस ग्लोबल’चे उद्घाटन झाले, तर अमेरिकेतील इंडियाना येथील नोत्र दाम विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा. मायकल पिपेंजर हे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

आपल्या उद्घाटनपर भाषणात, प्रा. बद्री नारायण यांनी भर दिला की, भारत जगातील एक प्रमुख घटक म्हणून उदयास येत असताना, त्याच्या विकास मार्गांवर समीक्षात्मक विचार मांडणे आणि परस्पर शिक्षण आणि एकतेच्या भावनेने जगासोबत त्याचे अनुभव सामायिक करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. प्रा. मायकल पिपेंजर यांनी जागतिक विकासाच्या क्षेत्रात भारताची वाढती भूमिका असल्याचा पुनरुच्चार करून, जागतिक आव्हानांना एकत्रित तोंड देण्यासाठी शैक्षणिक संस्थांदरम्यान भागीदारी असणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.

संस्थेच्या स्थापनेच्या 90 वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या समारंभाचा एक भाग म्हणून, ‘टिस ग्लोबल’मार्फत सहभागींना भारताच्या विकास प्रवासातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पैलूंचा शोध घेण्यासाठी मंच उपलब्ध करून देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. स्थानिक ज्ञान प्रणाली आणि जागतिक ‘फ्रेमवर्क्स’  यांना परस्परांशी जोडणे आणि समुदाय-चालित मॉडेल्स तसेच सहभागी दृष्टिकोन जगभरातील समन्यायी आणि शाश्वत विकासात कसे योगदान देऊ शकतात,  हेदाखवून देणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.

संशोधन, धोरण आणि पद्धती यांना परस्परांशी जोडून जागतिक सामाजिक विज्ञान संशोधनात नवीन मार्ग चोखाळण्यास गती देणे ‘टिस ग्लोबल’चा उद्देश आहे. तुलनात्मक शिष्यवृत्ती, नैतिक आणि प्रभाव-चालित सहकार्य आणि सीमापार सहभागींदरम्यान संपर्काला ते प्रोत्साहन देते. जागतिक ज्ञान उतरंडींच्या चौकटीत भारतीय दृष्टिकोनांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि विविध, संदर्भ-संवेदनशील वास्तवांमध्ये रुजलेल्या संशोधन कार्यक्रम पत्रिकेचा पुरस्कार करणे,  हा या व्यासपीठाचा  प्रयत्न आहे.

शैक्षणिक देवाणघेवाणीव्यतिरिक्त, हा उपक्रम भारतीय संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीच्या समृद्धतेची माहिती घेण्याची संधी उपलब्ध करून देणारा आहे, त्यामुळे भारताच्या विकासाच्या गाथेला आणि जागतिक स्तरावर त्याच्या वाढत्या प्रतिध्वनीला सखोल सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ देतो.

या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय व्यवहार कार्यालयाच्या अध्यक्ष प्रा. मधुश्री शेखर; शैक्षणिक व्यवहार विभागाचे अधिष्ठाता प्रा. सुनील संथा; सामाजिक कार्य विभागाचे अधिष्ठाता प्रा. बिपिन जोजो; आणि ‘टीआयएसएस’चे कुलसचिव डॉ. नरेंद्र मिश्रा यांचीही भाषणे झाली, त्यामध्ये त्यांनी या महत्त्वाच्या उपक्रमामागील सामूहिक प्रयत्नांची प्रशंसा केली.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227233) अभ्यागत कक्ष : 73
Read this releasein: English