आदिवासी विकास मंत्रालय
नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स (NESTS) ने ESSE-2025 टियर-1 निकालांबाबत दिले स्पष्टीकरण - 'नकारात्मक गुणांवर आधारित निवड' बाबतचे माध्यमांचे अहवाल दिशाभूल करणारे
ESSE-2025 भरती: टियर-1 हा केवळ छाननी टप्पा असेल, अंतिम निवड टियर-2 आणि मुलाखतीवर आधारित असेल, NESTS ने केले स्पष्ट
Posted On:
06 FEB 2026 3:16PM by PIB Mumbai
आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स (NESTS) ने ESSE-2025 भरती परीक्षेच्या टियर-1 चा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या काही माध्यमांतील वृत्तांवर स्पष्टीकरण दिले आहे. NESTS ने म्हटले आहे की, काही वृत्तांनी कमी किंवा अगदी नकारात्मक गुण मिळालेल्या उमेदवारांची 'निवड' झाल्याचा दावा करून एक दिशाभूल करणारे चित्र सादर केले आहे, जे वस्तुस्थितीच्या दृष्टीने चुकीचे आहे आणि अधिसूचित भरती प्रक्रियेची चौकट दर्शवत नाही.
NESTS ने सांगितले की, ESSE-2025 ही भरती प्रक्रिया 7,267 अध्यापन आणि बिगर-अध्यापन पदांसाठी अधिसूचित करण्यात आली होती. ही निवड प्रक्रिया दोन-स्तरीय परीक्षा प्रणालीनुसार होते. डिसेंबर 2025 मध्ये सीबीएससीद्वारे आयोजित केलेली टियर-1 परीक्षा ही केवळ एक छाननी आणि पात्रता फेरी आहे, जी टियर-2 साठी उमेदवारांची निवड करण्यासाठी आहे. ESSE-2025 अधिसूचनेनुसार, प्रत्येक पदासाठी 1:10 या प्रमाणात उमेदवारांची निवड केली जाते, आणि म्हणूनच टियर-1 चा कट-ऑफ अंतिम नियुक्तीसाठीच्या योग्यतेनुसार नव्हे, तर निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या संख्येनुसार निश्चित केला जातो.
संस्थेने पुढे स्पष्ट केले की, नकारात्मक गुणांसह गुणांकन योजना ESSE-2025 च्या अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद केली होती. टियर-1 मध्ये कमी किंवा नकारात्मक कट-ऑफ असणे हे केवळ स्पर्धात्मक परीक्षेतील सापेक्ष कामगिरी दर्शवते आणि याचा अर्थ नियुक्तीसाठी पात्रता किंवा मानकांमध्ये कोणतीही शिथिलता, असा होत नाही.
NESTS ने यावर जोर दिला की अंतिम गुणवत्ता यादी आणि निवड केवळ टियर-2 परीक्षेच्या आधारावर केली जाते, जी विषय-विशिष्ट आणि मूल्यमापनात्मक स्वरूपाची असते, आणि जिथे लागू असेल तिथे मुलाखतीद्वारेही केली जाते. मुख्याध्यापक पदासाठी केवळ व्यावसायिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांची निवड व्हावी यासाठी प्रक्रियेमध्ये टियर-2 परीक्षेनंतर मुलाखतीचा समावेश असतो. उमेदवारांनी टियर-2 परीक्षेत किमान पात्रता गुण मिळवणे आवश्यक आहे जे सामान्य श्रेणीच्या उमेदवारांसाठी 30 टक्के आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/दिव्यांग उमेदवारांसाठी 25 टक्के आहेत; अन्यथा, टियर-1 मधील त्यांच्या कामगिरीची पर्वा न करता त्यांना आपोआप अपात्र ठरवले जाते.
संस्थेने हे देखील स्पष्ट केले की, काही माध्यमांमधील वृत्तांमध्ये नमूद केलेले वेतन स्तर हे प्रमाणित सरकारी वेतनश्रेणी आहेत आणि ते भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरच लागू होतात. ही भरती प्रक्रिया पारदर्शक, नियमांनुसार आणि गुणवत्तेच्या आधारावर केली जात आहे, याचा पुनरुच्चार करून NESTS ने प्रसारमाध्यम संस्थांना विनंती केली आहे की, जनतेची दिशाभूल होऊ नये यादृष्टीने माहिती प्रसारित करण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करावी.
***
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2224502)
अभ्यागत कक्ष : 10