सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

77व्या प्रजासत्ताक दिनी कच्छच्या रणमध्ये जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे भव्य प्रदर्शन


देशभरातील लाखो खादी कारागिरांनी आपापल्या घरातून व्हिडिओ संदेशाद्वारे जगातील सर्वात मोठ्या तिरंग्याला वंदन करून एक नवीन विक्रम रचला

कच्छची अदम्य जिद्द आणि पुनरुज्जीवन आणि विकासाच्या वाटचालीचा भूज भूकंपाच्या 25व्या स्मृती वर्षात केला गौरव

भारतीय लष्कर आणि बीएसएफच्या जवानांनी प्रजासत्ताक दिनी जगातील सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचे संपूर्ण सन्मानाने केले प्रदर्शन आणि वंदन

या कार्यक्रमादरम्यान ग्रामोद्योग विकास योजने अंतर्गत कारागिरांना उपकरणे आणि साहित्य-संचांचे वाटप

केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी या मंचावर भारतीय लष्कराच्या एका शूर हुतात्म्याच्या पत्नीचा केला सन्मान, तिच्या त्यागाबद्दल केले अभिवादन

केव्हीआयसी अध्यक्ष म्हणाले, “प्रजासत्ताक दिनी कच्छच्या रणमध्ये जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे प्रदर्शन करणे ही राष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. हा कार्यक्रम 'ऑपरेशन सिंदूर' मधील शूर सैनिकांना समर्पित आहे. भूज भूकंपानंतर कच्छचा झालेला नियोजित पुनर्विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच शक्य झाला आहे.

Posted On: 26 JAN 2026 7:11PM by PIB Mumbai

भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, सोमवारी गुजरातच्या भूज या सीमावर्ती जिल्ह्यातील धोरडो येथे देशभक्ती आणि स्वदेशी सामर्थ्याचा एक ऐतिहासिक संगम पाहायला मिळाला. महात्मा गांधींचा वारसा असलेल्या 'खादी'पासून तयार करण्यात आलेला जगातील सर्वात मोठा भव्य राष्ट्रध्वज येथे पूर्ण आदर आणि अभिमानाने भव्य स्वरूपात प्रदर्शित करण्यात आला. या विशेष प्रदर्शनाचे आयोजन भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे (केव्हीआयसी) करण्यात आले होते. धोरडोच्या 'पांढऱ्या मिठाच्या वाळवंटाच्या' कॅनव्हासच्या पार्श्वभूमीवर उजळून निघालेला हा ऐतिहासिक तिरंगा राष्ट्रीय अभिमान, स्वावलंबनाची जिद्द आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक भव्य प्रतीक ठरला.

याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाने राष्ट्राची एकता, अखंडता आणि गौरवशाली परंपरांच्या जिवंत दर्शनाचा अनुभव घेतला. देशभरातील खादी कारागिरांनी कच्छमध्ये फडकवलेल्या जगातील सर्वात मोठ्या तिरंग्याला व्हिडिओ संदेशाद्वारे मानवंदना देत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.

या विशेष सोहळ्यात भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पूर्ण लष्करी सन्मानासह खादीपासून बनवलेल्या जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रध्वजाची स्थापना केली आणि 77व्या प्रजासत्ताक दिनी त्याला सलामी दिली. राष्ट्रभक्तीने ओथंबलेल्या या कार्यक्रमात एक अत्यंत भावुक क्षण पाहायला मिळाला, जेव्हा केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी भारतीय लष्कराचे वीर हुतात्मा सार्जेन्ट मुरलीधर यांच्या पत्नी श्रीमती राजकुमारी यांचा व्यासपीठावर सन्मान केला. यावेळी त्यांच्या त्यागाचा, समर्पणाचा आणि देशसेवेचा गौरव करण्यात आला.

या विशेष कार्यक्रमाचे मुख्य अतिथी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष श्री मनोज कुमार होते. या सोहळ्याला भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि जवान, स्थानिक लोकप्रतिनिधी, गुजरात सरकारचे आणि केव्हीआयसी चे वरिष्ठ अधिकारी आणि खादी कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाच्या या राष्ट्रीय उत्सवाचे औचित्य साधून, ग्रामोद्योग विकास योजनेअंतर्गत गुजरातच्या कारागिरांना विविध उपकरणे आणि साहित्याच्या संचांचे वाटप करण्यात आले.

हे देखील उल्लेखनीय आहे की, 26 जानेवारी 2026 रोजी 2001 च्या भूज भूकंपाला 25 वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर, भूकंपग्रस्त नागरिकांचे स्मरण करतानाच कच्छच्या भूमीची अदम्य जिद्द, तिची पुनरुत्थान करण्याची क्षमता आणि विकासाचा ऐतिहासिक प्रवास अधोरेखित करण्यात आला.

याप्रसंगी केव्हीआयसी चे अध्यक्ष मनोज कुमार यांनी आपल्या भाषणात सांगितलेः

“77व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर कच्छच्या रणात जगातील सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचे भव्य प्रदर्शन ही राष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा कार्यक्रम 'ऑपरेशन सिंदूर' मधील शूर सैनिकांना समर्पित आहे. या ऐतिहासिक यशाचे श्रेय मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाला देतो, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खादी चळवळीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन ओळख मिळाली आहे.”

याप्रसंगी, त्यांनी देशातील नागरिकांना खादीच्या दुकानांतून खादीचे ध्वज खरेदी करून ते आपल्या घरांवर फडकवण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात त्यांनी असेही नमूद केले की, 26 जानेवारी हा भूज भूकंपाचा 25 वा स्मृतिदिन आहे. ते म्हणाले की, 2001 च्या त्या विनाशकारी दुर्घटनेनंतर, ज्यामुळे हजारो कुटुंबे प्रभावित झाली होती, भूजने पुनर्रचना, धैर्य आणि दृढनिश्चयाचे एक असाधारण उदाहरण सादर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, आज उभे असलेले नवीन, सुरक्षित आणि सुव्यवस्थित भूज हा केवळ योगायोगाचा परिणाम नाही तर तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे, अथक प्रयत्नांचे आणि विकासात्मक विचारांचे प्रतीक आहे. भविष्यासाठी भूज हे एक स्वावलंबी आणि सुनियोजित शहर म्हणून विकसित केले गेले आहे.

केव्हीआयसी अध्यक्षांनी असेही सांगितले की, आज भूज हे सीमावर्ती भागाच्या सानिध्यामुळे आपल्या शूर सैनिकांच्या भक्कम उपस्थितीद्वारे राष्ट्रीय सुरक्षेचा एक महत्त्वाचा स्तंभ बनले आहे. हे शहर नव्या भारताची सुरक्षा, संकल्प आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. भूजमध्ये उभारण्यात आलेल्या 'स्मृती वन'चा संदर्भ देताना ते म्हणाले की, हे केवळ एक स्मारक नसून 2001 च्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांना समर्पित असलेले एक जिवंत प्रतीक आहे, जे दुःखाचे शक्तीत, स्मृतीचे संकल्पात आणि आपत्तीचे राष्ट्र उभारणीच्या प्रेरणेत कसे रूपांतर करता येते हे दर्शवते.

त्यांनी पुढे असेही नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राने अभूतपूर्व प्रगती केली आहे आणि देशभरातील लाखो कारागिरांना स्वावलंबी होण्याची संधी मिळाली आहे. गेल्या 11 वर्षांत, केव्हीआयसीने उत्पादन, विपणन, डिझाइन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत, ज्यांचे दूरगामी परिणाम झाले आहेत. खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राने 2 कोटींहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देतानाच रु. 1,70,000 कोटींच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. खादी उद्योगातील क्रांतिकारी बदलांमुळे कारागिरांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. खादी कारागिरांच्या मानधनात झालेली रु. 4 प्रति गुंडी वरून रु. 15 प्रति गुंडीपर्यंतची वाढ ही या बदलाचा भक्कम पुरावा आहे. हे केवळ उत्पन्नातील वाढच नाही, तर कारागिरांचा सन्मान, आत्मविश्वास आणि राहणीमानातील सकारात्मक परिवर्तन देखील प्रतिबिंबित करते.

हा भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज भारतीयांच्या सामूहिक भावनेचे आणि खादी हस्तकलेच्या वारशाचे प्रतीक आहे. हा ध्वज स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात आलेल्या 'आझादी का अमृत महोत्सव' निमित्त खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे तयार करण्यात आला होता. यापूर्वी अनेक प्रसंगी तो प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ध्वज 225 फूट लांब, 150 फूट रुंद असून त्याचे वजन अंदाजे 1400 किलोग्रॅम आहे. हा एखाद्या स्मारकासारखा राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी खादी कारागीर आणि संबंधित कामगारांनी अंदाजे 3500 अतिरिक्त तास काम केले. हा ध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या खादी सुती कापडापासून बनलेला आहे, जो आश्चर्यकारक असा 4,500 मीटर लांब आहे. हे एकूण 33,750 चौरस फूट क्षेत्र व्यापते. ध्वजातील अशोक चक्राचा व्यास 30 फूट असून हा ध्वज तयार करण्यासाठी 70 खादी कारागिरांना 49 दिवस लागले.

‘ग्रेट रण ऑफ कच्छ' सारख्या अद्वितीय ठिकाणी या अवाढव्य तिरंगा ध्वजाचे प्रदर्शन देशभरातील नागरिकांसाठी प्रेरणास्रोत बनले आहे आणि खादीचा गौरवशाली भूतकाळ तसेच उज्ज्वल भविष्य अधोरेखित करत आहे.

***

NitinFulluke / ShaileshPatil / DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2220706) अभ्यागत कक्ष : 25
Read this releasein: Gujarati , English