पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय ऊर्जा सप्ताह 2026 : भू राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा सुरक्षा, गुंतवणुकीमधील सातत्य आणि जागतिक सहकार्याची गरज मंत्रीस्तरीय चर्चेतून अधोरेखित

प्रविष्टि तिथि: 27 JAN 2026 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जानेवारी 2026

 

भारत ऊर्जा सप्ताह 2026 च्या पहिल्या दिवशी एका उच्चस्तरीय मंत्रीस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अनिश्चिततेतून मार्ग काढणे : अस्थिरतेच्या जगात किफायतशीर, सुलभ आणि शाश्वत ऊर्जेची सुनिश्चिती हा या चर्चासत्राचा विषय होता. या निमित्ताने एकाच ठिकाणी आलेल्या वरिष्ठ तज्ञ धोरणकर्त्यांनी विचार मंथन केले. जागतिक ऊर्जेतील अस्थिरतेवर मात करण्यासाठी व्यावहारिक धोरणे, शाश्वत गुंतवणूक आणि मजबूत आंतरराष्ट्रीय भागीदारीची गरज या चर्चेतून अधोरेखित झाली.

या चर्चासत्रात भारत सरकारचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी, कॅनडाचे ऊर्जा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती मंत्री टिम हॉजसन आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाचे महासचिव जासिम अल शिरावी सहभागी झाले होते.

भू राजकीय तणाव आणि व्यापार क्षेत्राच्या बदलत्या आयामांमुळे जागतिक ऊर्जा व्यवस्थेला वाढत्या अनिश्चिततेचा सामना करत असल्याची दखल या चर्चासत्रातील सर्व वक्त्यांनी घेतली. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांकडून वाढत असलेली मागणी आणि ऊर्जा संक्रमणाच्या वाढत्या वेगामुळे ऊर्जा सुरक्षा, किफायतशीरपणातील उपलब्धता आणि शाश्वतता या बाबी केंद्रस्थानी आल्या असून, सर्व देशांसाठी कोणताही एकच मार्ग लागू होऊ शकत नाही, ही बाब सर्व वक्त्यांनी अधोरेखित केली.

या चर्चासत्रात हरदीप सिंह पुरी यांनी भारताचा दृष्टिकोन मांडला. ऊर्जेची उपलब्धता ही वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी आणि राष्ट्रीय लवचिकतेची बाब आहे असे त्यांनी अधोरेखित केली. भारताने ऊर्जेचे स्त्रोतांमध्ये वैविध्य आणले, पुरवठादारांच्या भौगोलिक क्षेत्रांचा विस्तार केला आणि संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीत सुधारणा घडवून आणली. या माध्यमातून भारताने कोणत्याही टंचाईशिवाय अलीकडील जागतिक अस्थिरतेवर यशस्वीपणे मात केली असल्याचे त्यांनी नमूद केले

भारताच्या ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायुंचा वाटा वाढवण्याची महत्त्वाकांक्षाही त्यांनी मांडली. जागतिक सहकार्य, गुंतवणूक आणि वास्तववादी संक्रमण मार्ग महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कॅनडाचे ऊर्जा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती मंत्री टिम हॉजसन यांनी कॅनडाचे तेल, वायू आणि महत्त्वाच्या खनिजांचे प्रमुख उत्पादक म्हणून असलेले स्थान अधोरेखित केले. विशेषतः द्रवरूप नैसर्गिक वायू, अत्यावश्यक खनिजे, तेल पुरवठा आणि दीर्घकालीन ऊर्जा व्यापाराच्या क्षेत्रात भारतासोबतचे सहकार्य अधिक दृढ करण्याबद्दल उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाचे महासचिव जासिम अल शिरावी यांनी जागतिक दृष्टीकोन मांडला. लोकसंख्येतील वाढ, शहरीकरण, औद्योगिकीकरण, डिजिटलायझेशन आणि उंचावलेले राहणीमान यामुळे वाढणाऱ्या जागतिक ऊर्जेच्या मागणीचा मुद्दा त्यांनी मांडला. गुंतवणुकीतील कमतरता, उर्जा पुरवठा व्यवस्थेच्या मर्यादा, पुरवठा साखळीतील केंद्रीकरण आणि विखुरलेपणा यामुळे ऊर्जा सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. ऊर्जा संक्रमण संतुलित आणि सुनियोजित पद्धतीने हाताळण्यासाठी उत्पादक आणि ग्राहक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व्हायला हवा असे आवाहनही त्यांनी केले.

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2219318) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी