भूविज्ञान मंत्रालय
पुणे इथल्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत (IITM) आजपासून तिसऱ्या भारतीय चतुर्थक काँग्रेस (Indian Quaternary Congress-2026) या परिषदेचे आयोजन
पृथ्वीच्या व्यवस्थेचे आयाम तसेच मानव आणि पर्यावरणातील परस्परसंवाद ही यंदाच्या परिषदेची संकल्पना
सुमारे 200 प्रतिनिधींचा परिषदेत सहभाग
Posted On:
21 JAN 2026 9:56PM by PIB Mumbai
पुणे, 21 जानेवारी 2026
पुणे इथल्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत (IITM) आजपासून तिसऱ्या भारतीय चतुर्थक काँग्रेस (Indian Quaternary Congress-2026) या परिषदेला सुरुवात झाली. या परिषदेचे प्रमुख पाहुणे आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. 21 ते 23 जानेवारी 2026 असे तीन दिवस ही परिषद चालणार आहे. पृथ्वीचे पर्यावरण आणि हवामान इतिहास या विषयावरील देशातील प्रमुख वैज्ञानिक परिषदेपैकी ही एक परिषद आहे. चतुर्थक युगातील पृथ्वीच्या व्यवस्थेचे आयाम तसेच मानव आणि पर्यावरणातील परस्परसंवादाचा शोध (Tracing Earth System Dynamics and Human–Environment Interactions through the Quaternary) ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे.



राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान अभ्यास केंद्राचे (NCESS) संचालक प्रा. एन. व्ही. चालपती राव हे सन्माननीय पाहुणे म्हणून या परिषदेला उपस्थित होते. यासोबतच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. सूर्यचंद्र ए. राव, आगरकर संशोधन संस्थेचे (ARI) संचालक डॉ. पी. ढाकेफळकर, चतुर्थक संशोधक संघटनेच्या (Association of Quaternary Researchers-AOQR) सचिव डॉ. बिनीता फर्तियाल आणि हवामान बदल संशोधन केंद्राच्या (CCCR) प्रकल्प संचालक डॉ. सुवर्णा फडणवीस हे मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.



या परिषदेच्या निमित्ताने प्रख्यात शास्त्रज्ञांची विशेष व्याख्यानेही आयोजित करण्यात आली आहेत. चतुर्थक विज्ञानातील अलीकडील प्रगती आणि उदयोन्मुख दृष्टिकोन यावर या व्याख्यानांचा भर असणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी अहमदाबाद इथल्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे (PRL) प्रा. जे. एस. राय यांनी सरस्वतीचा शोध: हडप्पा संस्कृतीतील लुप्त झालेली नदी (Retracing Sarasvati: The Lost River of the Harappan Civilization) या विषयावर तर, प्रा. एन. व्ही. चालपती राव यांनी क्रीटेशियस-पॅलिओजीन मास एक्सटिंक्शन: ए मॅग्मॅटिक परस्पेक्टिव्ह या विषयावर मार्गदर्शन केले.



या परिषदेत संपूर्ण भारतातून सहभागी झालेल्या प्रतिनिधींसह तैवान, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियममधील आंतरराष्ट्रीय विद्यापीठांतील विद्यार्थी आणि संशोधकही सहभागी झाले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने चतुर्थक आणि प्राचीन हवामान संशोधनातील वाढता राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सहभाग अधोरेखित झाला आहे.
शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2217121)
अभ्यागत कक्ष : 31