पर्यटन मंत्रालय
तरुण शेफ्स भारताच्या पाककलाविषयक वारशाचे अग्रदूत आहेत: केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2026 4:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026
नवी दिल्लीत पुसा येथील हॉटेल व्यवस्थापन संस्थेत (आयएचएम) आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या पीएचडीसीसीआय राष्ट्रीय तरुण शेफ स्पर्धा (एनवायसीसी) 2025-26 च्या महाअंतिम फेरीत पुणे येथील सिंबायोसिस पाककला आणि पोषण विज्ञान संस्थेने विजेतेपद पटकावले आहे. पुण्यातील महाराष्ट्र राज्य आयएचएमसीटी आणि नवी दिल्लीतील आयएचएम पुसा यांना अनुक्रमे पहिला उपविजेता आणि दुसरा उपविजेता घोषित करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या शेफ्स किचन पाककला आणि हॉटेल व्यवस्थापन संस्थेला सर्वोत्तम भाजा पाककृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती विभाग मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, “भारतीय पाककलाकृती आपल्या सर्वात मजबूत सांस्कृतिक संपदांपैकी एक आहे आणि ती पर्यटनाच्या नेतृत्वाखालील विकासाचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आपल्या खाद्यपरंपरांतून आपल्या प्रदेशांची विविधता, विद्वत्ता आणि सजीव वारशाचे दर्शन घडते आणि आपले तरुण शेफ्स या वारशाचे अग्रदूत आहेत.” वेगाने होत असलेले शहरीकरण आणि बदलत्या आहार पद्धतींमुळे भारतीय शेफ्सना पारंपरिक ज्ञान प्रणालीत रुजलेली मूल्य-वर्धित, पोषणदृष्ट्या समतोल तसेच खाण्यासाठी तयार खाद्य प्रकारांमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची अनोखी संधी प्राप्त होणार आहे.

सदर स्पर्धेच्या अखिल भारतीय स्वरूपाचे ठळक दर्शन घडवत या महाअंतिम फेरीसाठी देशाच्या सर्व म्हणजे चार विभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या – होसूरची आशियाई ख्रिश्चन पाककला आणि कृषी विज्ञान संस्था; कोल्हापूरची शेफ्स किचन पाककला आणि हॉटेल व्यवस्थापन संस्था, हैदराबादयेथील भारतीय पाककला अकादमी; आयएचएम भुवनेश्वर; आयएचएम कोलकाता; आयएचएम कुफ्री; आयएचएम पुसा, नवी दिल्ली; आयएचएम हैदराबाद; महाराष्ट्र राज्य आयएचएमसीटी; तसेच पुणे येथील सिंबायोसिस पाककला आणि पोषण विज्ञान संस्था- या आदरातिथ्य क्षेत्रातील 10 आघाडीच्या संस्था एकत्र आल्या होत्या.
मान्यताप्राप्त जागतिक शेफ्स परीक्षक शेफ अनिल ग्रोव्हर यांच्या अध्यक्षपदाखाली हिमाचल प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक, शेफ नंदलाल शर्मा; पॅशन 4 हॉस्पिटॅलिटीचे सल्लागार शेफ आणि सह-संस्थापक शेफ देवजीत मजुमदार; शेफ देवजीत मजुमदार; जीआयएचएमसीटी नागपूर या संस्थेच्या खाद्यान्न उत्पादन विभागातील प्राध्यापक शेफ नितीन शेंडे; ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसचे एक्झिक्युटिव्ह शेफ असलेले शेफ श्रीनिवास व्ही तसेच डॉ.एम.जी.आर. शैक्षणिक आणि संशोधन संस्थेतील सहनिबंधक शेफ एम.प्रभू या तज्ञांनी अंतिम फेरीसाठी मूल्यांकनाचे काम केले.

केंद्रीय पर्यटन मंत्रालय, भारतीय पाककलासंबंधी संस्थांचे महामंडळ (आयएफसीए) तसेच पर्यटन आणि आदरातिथ्य कौशल्य मंडळ (टीएचएससी) यांच्या भागीदारीसह पीएचडीसीसीआयने आयोजित केलेल्या या एनवायसीसीमुळे भारतीय पाककला क्षेत्रासाठी लक्ष्यित राष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करण्यासोबतच भारताच्या समृद्ध पाककलेच्या वारशाचा गौरव करत देशभरात गेले सहा महिने सुरु असलेल्या पाककलाविषयक प्रवासाचा समारोप झाला.
या महाअंतिम फेरीमध्ये चढाओढीच्या प्रत्यक्ष पाककृती करून दाखवण्याचा मार्ग अवलंबण्यात आला असल्यामुळे स्पर्धकांना अडीच तासांच्या कालावधीत भाजा तयार करणे, जेवणाची मुख्य थाळी, भाज्या आणि डाळींच्या पाककृती, दही लावणे, भात अथवा पोळी,चपाती इत्यादी प्रकार तसेच गोडाचा पदार्थ यांसह संपूर्ण पारंपरिक भोजन तयार करण्याचे आव्हान पेलावे लागले. परीक्षकांनी पाककला तंत्र, अस्सलपणा, नाविन्यपूर्णता, शाश्वतता तसेच सादरीकरण या मापदंडांच्या आधारावर पाककृतींचे मूल्यमापन केले.

* * *
नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2216469)
आगंतुक पटल : 3