संरक्षण मंत्रालय
10 वा संरक्षण दल सेवानिवृत्त सैनिक दिन पुणे येथील हवाई दल तळावर साजरा
कल्याण आणि तक्रार निवारणावर लक्ष केंद्रित, 4,200 सेवानिवृत्त सैनिकांचा कार्यक्रमात सहभाग
प्रविष्टि तिथि:
14 JAN 2026 5:54PM by PIB Mumbai
पुणे, 14 जानेवारी 2026
पुणे येथील हवाई दल तळावर 14 जानेवारी 2026 रोजी 10 वा 'संरक्षण दल निवृत्त सैनिक दिन' आयोजित करण्यात आला होता. भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ (सी-इन-सी) असलेले दिवंगत फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा, ओबीई, हे 1953 मध्ये याच दिवशी सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या वारशाचा आणि अतुलनीय सेवेचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. भारताच्या लष्करी इतिहासातील एक महान व्यक्तिमत्त्व असलेल्या फील्ड मार्शल करिअप्पा यांच्या नेतृत्वाने 1947 च्या युद्धात सैन्याला विजयपथावर नेले आणि सेवा, शिस्त व देशभक्तीच्या चिरस्थायी वारशाचा पाया घातला. या दिवसाने देशाच्या माजी सैनिकांप्रती असलेला आदर आणि कृतज्ञता पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि सेवारत कर्मचारी, निवृत्त सैनिक व नागरिक यांच्यातील बंध अधिक दृढ केले. राष्ट्राच्या सेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली म्हणून पुष्पचक्र अर्पण करण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सुमारे 4,200 निवृत्त सैनिक उपस्थित होते.

R4RV.jpeg)
या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून शोभा वाढवली. तसेच या कार्यक्रमाला लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी), सदर्न कमांड; व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी, कमांडंट, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए); यांच्यासह संरक्षण दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात निवृत्त सैनिकांचे समर्पण, शिस्त आणि त्यागाची प्रशंसा केली आणि त्यांच्या कल्याणासाठी संस्थात्मक पाठिंबा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी बोलताना लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आणि एअर कमोडोर सतबीर सिंग राय, एओसी यांनी निवृत्त सैनिकांसाठी विविध संस्थांनी हाती घेतलेल्या महत्त्वपूर्ण कल्याणकारी उपाययोजनांवर प्रकाश टाकला. संवादादरम्यान त्यांनी सेवानिवृत्त सैनिकांप्रती मातृभूमीच्या सेवेबद्दल आणि राष्ट्रनिर्माणातील निःस्वार्थ योगदानाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

RJDV.jpeg)
निवृत्त सैनिक दिनाच्या सोहळ्याचा मुख्य उद्देश निवृत्तीवेतन, तक्रारी, आर्थिक सहाय्य, निवृत्त सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस) आणि इतर विविध कल्याणकारी योजनांशी संबंधित बाबींवर निवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये जागरूकता वाढवणे हा होता. या कार्यक्रमादरम्यान निवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या समस्या, चिंता आणि सूचना मांडण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. हवाई दल निवृत्त सैनिक संचालनालय (डीएव्ही), प्रधान संरक्षण लेखा नियंत्रक (पीसीडीए) आणि जिल्हा सैनिक कल्याण मंडळाद्वारे माहितीपूर्ण व्याख्याने आयोजित करण्यात आली.
2G5N.jpeg)

निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2214628)
आगंतुक पटल : 67
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English