अर्थ मंत्रालय
महसूल गुप्तचर संचालनालयाने आंतरराज्यीय अंमली पदार्थ टोळी आणली उघडकीला ; 81 कोटी रुपये किमतीचे 270 किलो मेफेड्रोन जप्त; 6 जणांना अटक
प्रविष्टि तिथि:
13 JAN 2026 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2026
अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या जाळ्यांना मोठा धक्का देत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी 11-12 जानेवारी 2026 रोजी अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या एका सुनियोजित कारवाईत 270 किलोग्राम मेफेड्रोन, हा कृत्रिम अंमली पदार्थ जप्त केला आहे. देशांतर्गत वाहतूकीदरम्यान हा प्रतिबंधित पदार्थ कोंबड्यांच्या खाद्याच्या आड लपवून नेला जात होता. तपास यंत्रणांची नजर टाळण्यासाठी अंमली पदार्थ टोळीने ही नवी कार्यपद्धती अवलंबली आहे.
विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी राजस्थानमध्ये एका ट्रकची तपासणी केली, जो वरवर पाहता कृषी-आधारित मालाची वाहतूक करत होता. सखोल तपासणीनंतर, कोंबड्यांच्या खाद्याच्या खेपेत लपवलेले 270 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. अवैध बाजारात या मालाची किंमत सुमारे 81 कोटी रुपये आहे. या प्रकरणात वाहनाचा चालक आणि वाहतुकीत सामील असलेल्या टोळीचे सदस्य तसेच सदर मालाला संरक्षित करणाऱ्या व्यक्तींना घटनास्थळीच अटक करण्यात आली.
हरियाणामधील अनेक ठिकाणी केलेल्या पुढील तपासादरम्यान, जप्त केलेल्या प्रतिबंधित पदार्थाच्या निर्मिती आणि पुरवठ्यात सामील असलेल्या टोळीच्या इतर प्रमुख सदस्यांना अटक करण्यात आली. याचबरोबर, एका बंद पडलेल्या गुप्त अंमली पदार्थ निर्मिती कारखान्यात काही कच्चा मालही जप्त करण्यात आला.
ही कारवाई दळणवळणाच्या दृष्टीने आव्हानात्मक होती. या कारवाईत प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी अथक प्रयत्न, आंतरराज्यीय समन्वय आणि अचूक अंमलबजावणी यांचा समावेश होता. प्रतिबंधित पदार्थांची जप्ती आणि टोळीच्या 6 प्रमुख सदस्यांच्या अटकेमुळे अनेक राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या एका संघटित, बहु-क्षेत्रीय अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
चालू आर्थिक वर्ष 2025 -26 मध्ये, डीआरआयने यापूर्वीच 6 गुप्त कारखाने उघडकीला आणले आहेत. या कारखान्यांमध्ये मेफेड्रोन, अल्प्राझोलम आणि मेथाम्फेटामाइनची अवैध निर्मिती केली जात होती.
अंमली पदार्थांची निर्मिती आणि तस्करी विरुद्धच्या लढ्यासाठी आणि 'नशा मुक्त भारत अभियाना'चे ध्येय साध्य करण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय आपल्या सातत्यपूर्ण आणि अतूट वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते.
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2214334)
आगंतुक पटल : 21