पंचायती राज मंत्रालय
पंचायत राज मंत्रालय 8-9 जानेवारी 2026 रोजी पुण्यातील यशदा येथे आदर्श महिला-स्नेही ग्रामपंचायतींच्या सर्वोत्तम पद्धतींवर राष्ट्रीय कार्यशाळेचे करणार आयोजन
प्रविष्टि तिथि:
06 JAN 2026 6:56PM by PIB Mumbai
पुणे, 6 जानेवारी 2026
भारत सरकारचे पंचायत राज मंत्रालय महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या सहकार्याने 8-9 जानेवारी 2026 रोजी पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे 'आदर्श महिला-स्नेही ग्रामपंचायतींच्या सर्वोत्तम कार्यपद्धती' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करत आहे. या कार्यशाळेचा उद्देश तळागाळाच्या पातळीवर लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी अनुकरणीय कार्यपद्धती सामायिक करणे आणि ग्रामपंचायतींची क्षमता वाढवणे हा आहे.
पंचायत राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुशीलकुमार लोहाणी यांच्या हस्ते गुरुवारी या कार्यशाळेचे उद्घाटन होईल. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ राजाराम डवले, यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशु, पंचायत राज मंत्रालयाचे संचालक विपुल उज्ज्वल आणि यूएनएफपीए इंडियाच्या कार्यक्रम व तांत्रिक सहाय्य प्रमुख डॉ. दीपा प्रसाद उपस्थित राहणार आहेत.
आंध्र प्रदेश, छत्तीसगड, दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू आणि तेलंगणा या 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 240 सहभागी या कार्यशाळेत सहभागी होत आहेत. यामध्ये निवडून आलेले प्रतिनिधी, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महिला-स्नेही ग्रामपंचायतींचे सचिव, गटविकास अधिकारी, राज्य ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्थेचे (SIRD&PR) संचालक आणि राज्य नोडल अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या कार्यशाळेत शासन व्यवस्थेत सहभाग, आरोग्य आणि पोषण, शिक्षण आणि कौशल्य विकास, आर्थिक संधींची उपलब्धता आणि सुरक्षा या पाच प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आदर्श महिला-स्नेही ग्रामपंचायती सादरीकरण आणि पॅनल चर्चांद्वारे आपली नाविन्यपूर्ण धोरणे आणि दृष्टिकोन सामायिक करतील. सहभागींना प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी डॅशबोर्ड निर्देशक आणि पोर्टल वैशिष्ट्यांवर प्रशिक्षण दिले जाईल.
आदर्श महिला-स्नेही ग्रामपंचायतींना अनुभवाधारित शिक्षण केंद्र म्हणून विकसित करणे तसेच सहभागी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वोत्तम पद्धतींच्या देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.
पार्श्वभूमी
पंचायत राज मंत्रालयाने 5 मार्च 2025 रोजी 'आदर्श महिला-स्नेही ग्रामपंचायती' उपक्रम सुरू केला. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक अशी ग्रामपंचायत स्थापन करणे, जी महिला आणि मुलींसाठी अनुकूल असेल, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे आदर्श महिला-स्नेही ग्रामपंचायतींची निवड केली. या निकषात पंचायत प्रगती निर्देशांक (पीएआय) आवृत्ती 1.0 चे समग्र गुण आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरण (एलएसडीजी) अंतर्गत थीम 9 मधील विषय-निहाय गुण, महिला आणि बाल विकास यांसारख्या संबंधित विभागांशी सल्लामसलत आणि महिला विकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांकडून मिळालेल्या सूचनांचा समावेश आहे.
एलएसडीजी च्या थीम 9 अंतर्गत, 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 744 ग्रामपंचायतींना आदर्श महिला-स्नेही ग्रामपंचायती म्हणून निश्चित केले गेले आहे. मंत्रालयाने प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी सहा उप-संकल्पना अंतर्गत 35 निर्देशकांसह एक समर्पित एमडब्ल्यूएफजीपी डॅशबोर्ड विकसित केला आहे. या आदर्श महिला-स्नेही ग्रामपंचायतींना क्षमता-बांधणी आणि मार्गदर्शक सहाय्य प्रदान करण्यासाठी मास्टर ट्रेनर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2211877)
आगंतुक पटल : 48