माहिती आणि प्रसारण मंत्रालय
रथा कन्नीर हा 1954 या वर्षातील दुर्मीळ तमिळ चित्रपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) संग्रहात दाखल
त्या काळातील विविध सामाजिक प्रश्नांवर चित्रपटात क्रांतिकारी विचार
प्रविष्टि तिथि:
02 JAN 2026 5:27PM by PIB Mumbai
रथा कन्नीर हा 1954 या वर्षातील एक दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण तमिळ चित्रपट. या चित्रपटाचा समावेश आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) च्या संग्रहात करण्यात आला आहे. हा चित्रपट कृष्णन-पंजू यांनी दिग्दर्शित केला असून थिरुवारूर थंगारासू यांनी लिहिला आहे. 1950 च्या दशकातील हा चित्रपट फक्त मनोरंजनापुरता न राहता, समाजात प्रगतिशील विचारांचा प्रसार करणारा प्रभावी माध्यम ठरला. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) येथील चित्रपट संशोधन अधिकारी अपर्णा सुब्रमण्यम यांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहातून चित्रपटाची 35 मिलीमीटर स्वरूपातील 8 मोठी रील्स आज पुण्यात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केली.
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत एम.आर. राधा होते. त्या काळात हा चित्रपट क्रांतिकारी ठरला आणि जातीभेद, अंधविश्वास, विधी-परंपरा यांसारख्या मुद्द्यांवर या चित्रपटाने ठोस दृष्टिकोन मांडला. तसेच यात कुष्ठरोगावरील सामाजिक कलंकावर भाष्य केले आहे. श्रीमंत, पाश्चात्त्य जीवनशैली असलेला नायक समाजाने दूर ठेवलेला कुष्ठरोगी कसा होतो, हे त्यात दाखवले आहे. त्या काळात अत्यंत कलंकित मानल्या जाणाऱ्या या रोगाकडे बघण्याची मानवी दृष्टी या चित्रपटाने दिली.
एम.आर. राधा हे रंगभूमीवरील दिग्गज होते. त्यांनी या भूमिकेला अपार बहुविधता दिली. उपहासात्मक, पाश्चात्त्य जीवनशैली असलेली श्रीमंत व्यक्ती म्हणून चित्रपटाच्या पूर्वार्धात ते विनोदी आणि भयावह वाटतात, तर उत्तरार्धात कुष्ठरोगी म्हणून त्यांचातील बदल अत्यंत नेमकेपणाने आणि पूर्ण अशा वर्णनातून समोर येतो. त्यांच्या देहबोलीतील वाकलेपणा, हालचालीतील विसंगती आणि संवादातील वेगळेपणा यामुळे ते अविस्मरणीय ठरले.
या चित्रपटात विधवा पुनर्विवाहाबद्दल क्रांतिकारी दृष्टिकोन मांडला आहे. चित्रपटाच्या शेवटी, मृत्यूपूर्वी नायक आपल्या पत्नीला विचारतो की ती त्याच्या मित्राशी पुनर्विवाह करेल का.
मद्रास राजगोपालन राधाकृष्णन (एम.आर. राधा) यांनी रथा कन्नीर मध्ये साकारलेली ही भूमिका त्यांची सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. या चित्रपटाला अपार सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असूनही भारतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही चित्रपट संग्रहालयाकडे याची प्रिंट किंवा मूळ निगेटिव्ह उपलब्ध नाही. आज उपलब्ध असलेल्या आवृत्त्या या कमी दर्जाच्या प्रती आहेत आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर फिरत आहेत. या चित्रपटाचे संकलन दीर्घकालीन जतन आणि जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मगदूम यांनी सांगितले. चित्रपट आणि इतर स्मृतिचिन्हे एनएफएआयला जतन करता यावीत यासाठी चित्रपटप्रेमींनी देणगीदाखल द्यावीत असे आवाहन त्यांनी केले.
चित्रपटाची प्रिंट एनएफएआयला देणगी स्वरुपात देता आल्याबद्दल अपर्णा सुब्रमण्यम यांनी आनंद व्यक्त केला. हा चित्रपट खरोखरच एनएफएआयमध्ये जतन, संग्रहण आणि भविष्यातील पुनर्निर्मितीसाठी असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी दक्षिण भारतातील जुन्या चित्रपट संग्राहक आणि वितरकांच्या वर्तुळातून हा चित्रपट मिळवला.


***
शैलेश पाटील /प्रज्ञा जांभेकर /परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2210981)
आगंतुक पटल : 22