कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
पारदर्शक आणि नागरिक-केंद्रित प्रशासन बळकट करण्यासाठी डॉ. जितेंद्र सिंह यांच्याकडून पाच महत्त्वपूर्ण डिजिटल सुधारणांचा शुभारंभ
Posted On:
25 DEC 2025 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025
पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज दिल्लीत 'सुप्रशासन पद्धतींसंबंधी राष्ट्रीय कार्यशाळा 2025' चे उद्घाटन केले.
25 डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या सुप्रशासन दिनानिमित्त केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि धोरणकर्त्यांना संबोधित करताना सिंह म्हणाले की, सुप्रशासन हा केवळ एक अमूर्त आदर्श नसून ती पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिक-केंद्रित सेवा वितरणावर आधारित एक दैनंदिन प्रशासकीय जबाबदारी आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या दिवसाचे विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले. वाजपेयी यांनीच सार्वजनिक जीवनात सचोटीची संकल्पना रुजवली आणि जनतेला प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाचा पाया रचला, असे त्यांनी सांगितले.
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने या सुप्रशासन दिनानिमित्त पाच मोठे उपक्रम सुरू केले आहेत, त्यांचा उद्देश प्रशासकीय प्रक्रिया बळकट करणे आणि सनदी अधिकाऱ्यांना बदलत्या काळासाठी सज्ज करणे हा आहे.
पाच प्रमुख डिजिटल सुधारणा:
- माजी सैनिकांच्या आरक्षणाबाबत मार्गदर्शक सूचनांचा संग्रह: यामध्ये केंद्र सरकारमधील माजी सैनिकांच्या आरक्षणाशी संबंधित सर्व विद्यमान सूचनांचे एकत्रीकरण करून एक अद्ययावत आणि वापरण्यास सोपा संदर्भ ग्रंथ तयार करण्यात आला आहे.
- एआय-आधारित भर्ती नियम जनरेटर टूल: हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधन 'भर्ती नियम तयार करणे, सुधारणा आणि देखरेख प्रणाली' पोर्टलशी जोडलेले आहे, यामुळे नियमावली तयार करणे सोपे होईल.
- ई-एचआरएमएस 2.0 मोबाईल ॲप्लिकेशन: हे ॲप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. याद्वारे मानवी संसाधनांशी संबंधित सर्व महत्त्वाच्या सेवा थेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होतील.
- आयगॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर नवीन एआय वैशिष्ट्ये: प्रशिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
- कर्मयोगी डिजिटल लर्निंग लॅब 2.0: ही एक अत्याधुनिक सुविधा असून, यामध्ये एआर-व्हीआर, गेमिफिकेशन आणि परस्परसंवादी सिम्युलेशन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाचा शैक्षणिक आशय तयार केला जाईल.

हे सर्व उपक्रम एकत्रितपणे प्रशासकीय सुधारणांसाठीचा एक भविष्योन्मुख दृष्टिकोन दर्शवतात असे आपल्या भाषणाचा समारोप करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. हे उपक्रम तंत्रज्ञानाचा वापर करतात, संस्थांचे बळकटीकरण करतात आणि नागरिक व सनदी अधिकाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून बदल घडवून आणतात. हे उपाय भारताला अधिक प्रतिसादात्मक आणि उत्तरदायी प्रशासकीय चौकटीच्या दिशेने पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* * *
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2208487)
अभ्यागत कक्ष : 66