विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 24 नामवंत शास्त्रज्ञांना "राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025" प्रदान


भारतीय विज्ञान क्षेत्रासाठी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी प्रख्यात खगोलभौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर "विज्ञान रत्न पुरस्कार"

प्रविष्टि तिथि: 23 DEC 2025 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 डिसेंबर 2025


राष्ट्रपती भवनात आयोजित दुसऱ्या "राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार" समारंभात आज भारतीय विज्ञान क्षेत्रासाठी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी प्रख्यात खगोलभौतिकशास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर "विज्ञान रत्न पुरस्काराने" गौरविण्यात आले. सीएसआयआरच्या नेतृत्वाखालील अरोमा मिशनने "राष्ट्रीय विज्ञान टीम पुरस्कार 2025", किंवा विज्ञान टीम पुरस्कार जिंकला, आणि  भारतातील बहुचर्चित "पर्पल रिव्होल्यूशन" आणि लव्हेंडर उद्योजकतेला चालना देणाऱ्या उद्योजक विज्ञान चमूला राष्ट्रीय ओळख  मिळाली.  

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत विविध विज्ञान शाखांमधील 24 शास्त्रज्ञ आणि नवोन्मेषकांना पुरस्कार प्रदान केले.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची स्थापना केली.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी 'X' वर लिहिले आहे, "जगाला "जांभळी क्रांती" ही संकल्पना भेट देण्यात आणि "लॅव्हेंडर" ला कृषी-उद्योजकतेचा एक नवा मार्ग म्हणून सादर करण्यात दिलेल्या  योगदानाबद्दल मिळालेल्या प्रतिष्ठेच्या #RashtriyaVigyanPuruskar 2025 साठी "टीम अरोमा" चे अभिनंदन.... हिमालयाच्या दुर्गम डोंगराळ प्रदेशातही आकर्षक उपजीविकेच्या संधी निर्माण करत आहे."

 

नवीन राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आराखड्याचा एक भाग म्हणून, गेल्या वर्षी राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार सुरू करण्यात आले. विज्ञान क्षेत्रातील, आजीवन कामगिरी, कारकि‍र्दीच्या सुरुवातीच्या काळातील यश, ते संघ-आधारित नवोपक्रमापर्यंत केलेल्या कामाची दखल घेण्यासाठी या पुरस्कारांची रचना करण्यात आली. यंदा या पुरस्कारांचे दुसरे वर्ष होते. यामधून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जागतिक सर्वोत्तम पद्धतींना साजेसा, संरचित, समकालीन स्वरूपात सन्मान करण्याचा सरकारचा दृष्टीकोन अधोरेखित होतो.

या समारंभात, विज्ञान क्षेत्रासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल, ख्यातनाम खगोलभौतिकशास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी भौतिकशास्त्र, कृषी, जैव विज्ञान, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, अवकाश विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील वैयक्तिक योगदानाबद्दल अनेक शास्त्रज्ञांचा विज्ञान श्री आणि विज्ञान युवा पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.

  

  

पुरस्कार विजेत्यांच्या संपूर्ण यादीमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ तसेच 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या संशोधकांचा समावेश आहे, यामधून अनुभव आणि उदयोन्मुख प्रतिभेवर पुरस्काराचा भर दिसून येतो.

45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या वैज्ञानिकांना दिला जाणारा विज्ञान युवा-शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, नाविन्यपूर्ण योगदानासाठी उदयोन्मुख संशोधकांना सन्मानित करतो.

यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रामुख्याने महिला शास्त्रज्ञांचा समावेश असून, त्यांनी विविध श्रेणी आणि विषयांमध्ये आपली कामगिरी सिद्ध केली आहे. डॉ. दीपा आगाशे आणि प्रा. श्वेता प्रेम अग्रवाल यांच्यासारख्या संशोधकांचा त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यामधून भारताच्या वैज्ञानिक परिसंस्थेत महिलांचा वाढता सहभाग आणि नेतृत्व प्रतिबिंबित होते.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. त्यांचे काम भारताच्या वैज्ञानिक प्रतिभेची खोली आणि विविधता प्रतिबिंबित करते, आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रम पूर्ण करण्यात आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित करते, असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीने वैज्ञानिक संशोधन, नवोन्मेष आणि त्याचे सार्वजनिक मूल्यात रूपांतर, याला दिले  जाणारे  राष्ट्रीय प्राधान्य दिसून आले. 

राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार (RVP) – 2025, पुरस्कार विजेत्यांची यादी

 

* * *

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे


(रिलीज़ आईडी: 2207959) आगंतुक पटल : 33
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Kannada