वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जीईएमच्या वायदे सौदा लिलाव मॉड्यूलद्वारे सरकारी मालमत्तेच्या पारदर्शक विनियोगा करण्यास चालना

प्रविष्टि तिथि: 21 DEC 2025 12:36PM by PIB Mumbai

 

 

शासकीय ई-मार्केटप्लेस हे एक डिजिटल व्यासपीठ असून त्याद्वारे मंत्रालये, विविध विभाग तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संस्था वस्तू आणि सेवांची खरेदी करतात. या मुख्य कार्याबरोबरच, जीईएम वायदे सौदा लिलाव मॉड्यूलच्या माध्यमातून सरकारी मालमत्तेची विल्हेवाट लावण्याची सुविधा उपलब्ध करून देते. या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन स्पर्धात्मक बोली पद्धतीचा अवलंब करण्यात येतो, ज्यामुळे पारंपरिक पद्धतीने तुटक, कागदोपत्री आणि वेळखाऊ असलेल्या प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि योग्य मूल्यनिर्धारण सुनिश्चित होते.

वायदे सौदा लिलाव ही एक डिजिटल बोली प्रक्रिया असून त्याद्वारे शासकीय विभाग भंगार, ई-कचरा, जुनी वाहने, यंत्रसामग्री तसेच इमारती आणि जमीन यांसारख्या भाडेपट्ट्यावरील मालमत्तेची विक्री सर्वोच्च बोलीदाराला करतात. या प्रक्रियेत सरकार संबंधित मालमत्ता व्यासपीठावर सूचीबद्ध करते, नोंदणीकृत बोलीदार परस्पर स्पर्धात्मक बोली सादर करतात आणि सर्वोच्च बोली यशस्वी घोषित केली जाते. जीईएमच्या सुरक्षित डिजिटल प्रणालीद्वारे विभाग राखीव किंमत निश्चित करू शकतात, सहभागाच्या अटी ठरवू शकतात तसेच बोली प्रक्रियेवर प्रत्यक्ष वेळेत देखरेख ठेवू शकतात, ज्यामुळे संपूर्ण लिलाव प्रक्रियेत कार्यक्षमता आणि पारदर्शकता कायम राहते.

वायदे सौदा लिलावची उपयुक्तता विविध क्षेत्रे आणि भौगोलिक भागांपर्यंत विस्तारलेली असून मोठ्या प्रमाणावर सरकारी मालमत्ता या व्यासपीठावर उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

डिसेंबर 2021 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत जीईएमच्या वायदे सौदा लिलाव मॉड्यूलद्वारे रुपये 2200 कोटींपेक्षा अधिक किमतीचे लिलाव पार पडले. या कालावधीत 13000 पेक्षा अधिक लिलाव आयोजित करण्यात आले, 23000 पेक्षा अधिक नोंदणीकृत बोलीदार जोडले गेले आणि 17000 पेक्षा अधिक लिलावकर्त्यांचा सहभाग नोंदवण्यात आला. ही आकडेवारी दर्शवते की वायदे सौदा लिलाव ही आता केवळ प्रायोगिक उपक्रम न राहता, सरकारी मालमत्तेच्या विल्हेवाटीसाठी एक राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल यंत्रणा म्हणून विकसित झाली आहे.

जीईएमद्वारे लिलावात काढण्यात येणाऱ्या मालमत्तेची व्याप्ती वायदे सौदा लिलाव मॉड्यूलच्या व्यापक वापराचे द्योतक आहे.

जीईएम वायदे सौदा लिलावमध्ये सहभाग सुलभ व्हावा यासाठी प्रक्रिया संरचित करण्यात आली आहे. इच्छुक सहभागींनी जीईएमच्या मुख्य पृष्ठाला भेट देऊन वायदे सौदा लिलाव बोलीदार नोंदणी दुव्याद्वारे नोंदणी करणे, पॅन आणि आवश्यक माहिती सादर करणे तसेच ईमेल पडताळणी आणि ऑनबोर्डिंग प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.पात्रता लागू असल्यास अनामत रक्कम भरल्यानंतर बोलीदार थेट ऑनलाईन पद्धतीने, कालमर्यादित आणि निश्चित सुरक्षा प्रोटोकॉलनुसार आयोजित लिलावात सहभागी होऊ शकतात.

वैयक्तिक व्यवहारांपलीकडे, वायदे सौदा लिलाव व्यापक प्रशासकीय उद्दिष्टांना हातभार लावते. यामध्ये सरकारी मालमत्तेच्या विनियोग करण्यात पारदर्शकता वाढवणे, प्रशासकीय विलंब कमी करणे, न्याय्य स्पर्धेला प्रोत्साहन देणे, सार्वजनिक मालमत्तेतून अधिक परतावा मिळवणे, भंगार व कालबाह्य साहित्याची जलद विल्हेवाट लावणे तसेच विशेषतः ई-कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात पर्यावरणीय जबाबदारीला चालना देणे यांचा समावेश आहे.

जीईएमवरील वायदे सौदा लिलाव ही सरकारी मालमत्ता विनियोगाच्या दृष्टिकोनातील बदल दर्शवते. हे व्यासपीठ सरकारी विभाग आणि व्यवसायांसाठी एक समान डिजिटल मंच उपलब्ध करून देते, जिथे नियम पूर्वनिश्चित असतात, बोली प्रक्रिया स्पष्टपणे दिसते आणि निकाल स्पर्धात्मक निकषांवर आधारित असतात.

***

जयदेवी पुजारी स्वामी / गजेंद्र देवडा / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2207164) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी