संरक्षण मंत्रालय
विजय दिनानिमित्त आयोजित 'ॲट होम' समारंभामध्ये भारतीय लष्कराने प्रदर्शित केले आत्मनिर्भरता आणि नवोन्मेष
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2025 8:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025
1971 च्या युद्धात भारतीय सशस्त्र दलांनी मिळवलेल्या निर्णायक विजयाचे स्मरण म्हणून, आज भारतीय लष्कराने नवी दिल्लीतील आर्मी हाऊस येथे विजय दिनानिमित्त "ॲट होम" (Vijay Diwas ‘At Home’) समारंभाचे आयोजन केले. या समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. यावेळी स्वदेशी विकसित तंत्रज्ञान आणि विशिष्ट क्षमतांचे प्रभावी प्रदर्शन करण्यात आले. त्यातून भारतीय लष्कराचे आधुनिक, नाविन्यपूर्ण आणि आत्मनिर्भर दलात होणारे परिवर्तन दिसून आले.
आर्मी हाऊस येथे आयोजित विजय दिनाच्या 'ॲट होम' समारंभाचा भाग म्हणून, भारतीय लष्कराने विविध प्रकारचे स्वदेशी विकसित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष प्रदर्शित केले, त्यातून भारतीय लष्कर एक आधुनिक, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या दलात रूपांतरित होत असल्याचे अधोरेखित झाले. सैन्यातील जवान, अभियंते, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्था राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणारे उपाय विकसित करण्यासाठी कसे एकत्रितपणे काम करत आहेत, तसेच आपत्कालीन प्रतिसाद, पायाभूत सुविधा विकास आणि शाश्वततेचे सशक्त पर्याय देत आहेत, हे या प्रदर्शनांमधून दिसून आले.
खेळाडू, शौर्य पुरस्कार विजेते, विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्ती आणि वरिष्ठ भारतीय नेतृत्वाबरोबरच 73 राजदूत आणि उच्चायुक्तांसह मोठ्या संख्येने पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे भारताची विस्तारत असलेली जागतिक संरक्षण भागीदारी आणि देशाच्या स्वदेशी लष्करी तंत्रज्ञानावरील वाढलेला आंतरराष्ट्रीय विश्वास दिसून आला. यावेळी प्रदर्शित केलेल्या उपकरणे आणि तंत्रज्ञानाची माहिती पुढे दिली आहे.
या प्रदर्शनातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे एआय-आधारित उपग्रह प्रतिमा विश्लेषण प्रणाली. ही प्रणाली उपग्रह चित्रांचे जलद आणि अचूक विश्लेषण करायला मदत करते. प्रतिमांचा मानवी अभ्यास करण्याऐवजी, ही प्रणाली बदल ओळखण्यासाठी, घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण निरीक्षणे चिन्हांकित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते.
भारतीय लष्कराने एक सुटसुटीत,ने-आण करायला सुलभ अशी एआय प्रणाली देखील प्रदर्शित केली, ही प्रणाली इंटरनेट किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसलेल्या भागातही कार्य करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
जप्त केलेल्या ड्रोनचा अभ्यास करण्यासाठी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी भारतात विकसित केलेली ड्रोन विश्लेषण प्रणाली सैन्याने सादर केली.ड्रोनचा वापर कसा केला गेला हे समजून घेण्यास हे साधन मदत करते आणि उदयोन्मुख धोक्यांविरुद्ध चांगल्या सज्जतेसाठी सहाय्य करते.
भारतीय लष्कराने स्वदेशी बनावटीच्या 'अॅडव्हान्स ट्रस ब्रिज'चे प्रदर्शन केले, जो नद्या, दऱ्या आणि उद्ध्वस्त रस्त्यांवरील संचार व्यवस्था त्वरित पूर्ववत करण्यासाठी आरेखित करण्यात आला आहे. जुन्या पूल प्रणालींच्या तुलनेत, ज्यांना मोठ्या चमूची आणि जास्त वेळेची आवश्यकता असते, हा नवीन पूल कमी मनुष्यबळाचा वापर करून खूप वेगाने उभारला जाऊ शकतो.
सर्वात नाविन्यपूर्ण प्रदर्शनांपैकी एक म्हणजे पुनर्वापर केलेल्या प्लास्टिक कचऱ्यापासून बनवलेली ट्रॅकवे प्रणाली. वाहनांना मऊ किंवा खराब जमिनीवरून सुरक्षितपणे आणि सहजतेने जाण्यास मदत करण्यासाठी हे ट्रॅकवे तात्पुरते अंथरले जातात. जुन्या प्रणालींच्या तुलनेत नवीन आवृत्ती वजनाने हलकी, हाताळण्यास सोपी आणि वापरण्यासाठी अधिक वेगवान आहे.
भारतीय लष्कराने नाईट-व्हिजन उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या घटकाच्या स्वदेशी निर्मितीमध्ये एक मोठे यश मिळवले आहे. पूर्वी जास्त किमतीने आणि दीर्घकाळ प्रतीक्षेने आयात केला जाणारा हा घटक आता भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून लष्कराच्या कार्यशाळांमध्ये तयार केला जात आहे.
लष्कराने एक मानवरहित अग्निशमन रोबोट प्रदर्शित केला जो मानवी प्रवेश जोखीम असलेल्या धोकादायक अग्निशामक क्षेत्रात काम करण्यासाठी आरेखित केलेला आहे. दूरस्थपणे नियंत्रित केलेला हा रोबोट कॅमेरे आणि सेन्सर वापरतो जेणेकरून अग्निशमन दलाच्या जवानांना सुरक्षित अंतरावरून तीव्र आगींवर मात करण्यास मदत होईल.
भारतीय लष्कराने नैसर्गिक आपत्तींच्या वेळी प्रथम प्रतिसाद देणारी संस्था म्हणून आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली, तसेच बचाव आणि मदत मोहिमांमध्ये वापरली जाणारी उपकरणे आणि प्रणालींचे प्रदर्शन केले. गेल्या वर्षभरात लष्कराच्या तुकड्यांनी देशभरात आणि परदेशात हजारो नागरिकांना वाचवले आहे, खराब झालेल्या पायाभूत सुविधा पूर्ववत केल्या आहेत आणि मदत सामग्री पोहोचवली आहे. समर्पित आपत्कालीन प्रतिसाद पथके आणि पूर्वनियोजित उपकरणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित कारवाई सुनिश्चित करतात. या प्रदर्शनाने लष्कराच्या कार्यात्मक जबाबदाऱ्यांसोबतच त्याच्या मानवतावादी वचनबद्धतेवरही प्रकाश टाकला.
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2204335)
आगंतुक पटल : 15