संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हवाई दल अकादमीमध्ये संयुक्त पदवीदान संचलन

Posted On: 13 DEC 2025 4:27PM by PIB Mumbai

 

हैदराबादच्या दुंडीगल येथील हवाई दल अकादमीत 13 डिसेंबर 2025 रोजी संयुक्त पदवीदान संचलन पार पडले. या संचलनाद्वारे भारतीय हवाई दलाच्या उड्डाण शाखा तसेच भूपृष्ठीय कर्तव्य शाखेतील फ्लाइट कॅडेट्सच्या कमिशनपूर्व प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप झाला. या संचलनाचे पुनरावलोकन अधिकारी (रिव्ह्यूइंग ऑफिसर) म्हणून संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान उपस्थित होते. त्यांनी 216 व्या अभ्यासक्रमातील पदवी प्राप्त करणाऱ्या फ्लाइट कॅडेट्सना राष्ट्रपती कमिशन प्रदान केले. आज एकूण 244 फ्लाइट कॅडेट्स पदवीधर झाले, त्यामध्ये 215 पुरुष आणि 29 महिला कॅडेट्सचा समावेश आहे.

या प्रसंगी भारतीय नौदलातील सहा अधिकारी, भारतीय तटरक्षक दलातील आठ अधिकारी तसेच व्हिएतनामच्या समाजवादी प्रजासत्ताकातील दोन प्रशिक्षणार्थींना उड्डाण प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल ‘विंग्स’ प्रदान करण्यात आले. तसेच नॅव्हिगेशन प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल पाच अधिकाऱ्यांना ‘ब्रेवे्ट्स’ प्रदान करण्यात आले. या समारंभास पदवी प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कमीशनिंग समारंभ या संचलनातील प्रमुख आकर्षण ठरले. या समारंभात पुनरावलोकन अधिकाऱ्यांनी पदवी प्राप्त करणाऱ्या कॅडेट्सना उड्डाण अधिकारी (फ्लाइंग ऑफिसर) म्हणून कमिशन प्रदान केले. या प्रसंगी पदवी प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. देशाची सार्वभौमता आणि सन्मानाचे रक्षण करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. पदवीदान संचलनादरम्यान पिलॅटस पीसी–7, हॉक, किरण आणि चेतक या विमानांच्या सुयोग्य समन्वय व एकसंधतेने सादर केलेल्या फ्लायपास्टने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. तसेच आकाश गंगा पथक आणि एअर वॉरियर ड्रिल टीम यांच्या थरारक सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

विविध प्रशिक्षण शाखांमधील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पुनरावलोकन अधिकारी यांनी उड्डाण शाखेतील फ्लाइंग ऑफिसर तनिष्क अग्रवाल यांना पायलट अभ्यासक्रमात एकूण गुणवत्ताक्रमात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्रतिष्ठित ‘राष्ट्रपती सन्मानचिन्ह’ तसेच ‘नवानगर स्वॉर्ड ऑफ ऑनर’ प्रदान केले. तसेच नेव्हिगेशन प्रवाहात एकूण गुणवत्ताक्रमात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल फ्लाइंग ऑफिसर सक्षम दोब्रियल यांना ‘राष्ट्रपती सन्मानचिन्ह’ प्रदान करण्यात आले. याचप्रमाणे भूपृष्ठीय कर्तव्य शाखांमध्ये एकूण गुणवत्ताक्रमात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल फ्लाइंग ऑफिसर नितेश कुमार यांना ‘राष्ट्रपती सन्मानचिन्ह’ प्रदान करण्यात आले.

लष्करी संचलन सुरावटींच्या तालावर नव्याने कमिशन प्राप्त अधिकाऱ्यांनी दोन स्तंभांमध्ये संथ गतीने मार्च करत संचलनाचा समारोप केला. या क्षणी कार्यक्रमात एक विशेष भावनिक वातावरण निर्माण झाले. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी स्वतः किरण विमानांच्या तीन विमानांच्या फॉर्मेशनचे नेतृत्व करत उड्डाण केले आणि नव्याने कमिशनप्राप्त अधिकाऱ्यांवरून फ्लायपास्ट सादर केला.

यावेळी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून नव्या अधिकाऱ्यांना प्रथम सलामी देण्यात आली. या भावनिक व गौरवपूर्ण क्षणासह संयुक्त पदवीदान संचलनाचा समारोप झाला. संयुक्त पदवीदान संचलनाच्या अंतिम टप्प्यात सारंग आणि सूर्यकिरण पथकांच्या उड्डाण सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

***

माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2203595) अभ्यागत कक्ष : 41