वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
इटली-भारत व्यापार मंच 2025 द्वारे द्विपक्षीय व्यापार, नवोन्मेष आणि धोरणात्मक आर्थिक भागीदारी बळकट
उच्च-स्तरीय भारत-इटली संवादात वाहन उद्योग, स्वच्छ ऊर्जा, कृषी-अन्न, क्रीडा तंत्रज्ञान आणि संपर्क क्षेत्रांवर टाकला प्रकाश
पीयूष गोयल आणि इटलीचे उपपंतप्रधान अंतोनियो ताजानी यांच्यात व्यापार विस्तार आणि पुरवठा साखळीची लवचिकता वाढीविषयावर केंद्रित द्विपक्षीय बैठक
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2025 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025
इटलीच्या उपपंतप्रधानांच्या भेटीदरम्यान 11 डिसेंबर 2025 रोजी मुंबईत 'भारत-इटली व्यापार मंच' आयोजित करण्यात आला होता. भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही भेट एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री, अंतोनियो ताजानी यांच्या अधिकृत भेटीचा भाग म्हणून आयोजित या मंचावर वरिष्ठ सरकारी नेते, उद्योग संघटना, युनिकॉर्न संस्थापक आणि 150 हून अधिक भारतीय तसेच इटालियन कंपन्या एकत्र आल्या होत्या.
दोन्ही देशांनी तंत्रज्ञान-आधारित विकास आणि शाश्वत औद्योगिक विकासावर लक्ष केंद्रित केल्याच्या अनुषंगाने, या व्यापार मंचाने वाहने, कचऱ्यापासून ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा, क्रीडा तंत्रज्ञान, कृषी-अन्न आणि संपर्क यासह प्रमुख क्षेत्रांमध्ये औद्योगिक सहयोग बळकट करण्यासाठी भारत आणि इटलीच्या सामायिक वचनबद्धतेवर प्रकाश टाकला.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि इटलीचे उपपंतप्रधान अंतोनियो ताजानी यांनी मुंबईत द्विपक्षीय बैठक घेतली. या चर्चेत व्यापार विस्तार, पुरवठा साखळीची लवचिकता वाढवणे, तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणस्नेही दळणवळण, हरित ऊर्जा, प्रगत उत्पादन आणि अन्न प्रक्रिया यांमधील सहयोग वाढवण्यावर भर देण्यात आला.
याप्रसंगी ताजानी यांनी विशेष भाषण केले, त्यानंतर पीयूष गोयल यांनी समारोपाचे भाषण केले. यामध्ये मजबूत व्यवसाय आणि नाविन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित करून भारत-इटली धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.
मार्च 2023 मध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या नवी दिल्ली येथील भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंधांना 'सामरिक भागीदारी'च्या पातळीवर नेल्यामुळे निर्माण झालेल्या संवेगावर आजची चर्चा आधारित होती.
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ही बैठक आयोजित केल्यामुळे थेट व्यावसायिक संबंध वाढवण्यासाठी आणि गुंतवणुकीचा ओघ सुलभ करण्यासाठी दोन्ही सरकारांची असलेली सामायिक वचनबद्धता अधोरेखित झाली.
दोन्ही मंत्र्यांमधील भेट आणि 22 व्या संयुक्त आर्थिक सहकार्य समितीच्या इतिवृत्तावर स्वाक्षरी करणे हे धोरणात्मक भागीदारीचे मूर्त आर्थिक परिणामांमध्ये रूपांतर करण्याच्या ठोस संकल्पाचे प्रतीक आहे, ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांतील नागरिकांना आणि व्यवसायांना लाभ होईल.
युरोपियन युनियनमध्ये इटली हा भारतासाठी एक महत्त्वाचा आर्थिक भागीदार म्हणून कायम आहे. आजच्या बैठकीमुळे व्यापार संबंधांना महत्त्वपूर्ण चालना मिळाली असून दोन्ही अर्थव्यवस्थांच्या मजबूत पूरक क्षमतांचा फायदा घेण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल.
भारतीय आणि इटालियन कंपन्यांनी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांची यादी: - SIMEST आणि ICC यांनी भारतात विस्तार करणाऱ्या इटालियन कंपन्यांना मजबूत सहाय्य करण्यासाठी, द्विपक्षीय गुंतवणुकीला चालना देण्यासाठी तसेच संरचित व्यवसाय सुलभतेद्वारे आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी एक धोरणात्मक सामंजस्य करार केला आहे.
PRADA S.p.A., LIDCOM आणि LIDKAR यांनी पारंपरिक कोल्हापुरी चपलांपासून प्रेरित, इटालियन आरेखन आणि भारतीय कारागिरीचे मिश्रण असलेल्या मर्यादित-आवृत्तीच्या सँडलची मालिका तयार करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे.
Kuvera S.p.A. आणि Neopolis Brands Pvt. Ltd. यांनी भारतात कार्पिसाच्या किरकोळ विक्री व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एक करार केला आहे, ज्यामध्ये 2045 पर्यंत 100 दुकाने उघडण्याची दीर्घकालीन योजना आहे
कॅवाग्ना ग्रुपने गटायला यांच्यासोबत मिळून 'कॅवाग्ना ग्रुप एस ब्रास टेक प्रायव्हेट लिमिटेड' हा एक नवीन संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे, ज्यामध्ये 5 दशलक्ष युरोची इटालियन गुंतवणूक असून कॅवाग्नाकडे 51% हिस्सा आहे.
इटली-भारत व्यापार मंच 2025 ची सांगता एका सशक्त आणि भविष्यवेधी वातावरणात झाली, ज्यामध्ये लवचिक पुरवठा साखळी निर्माण करणे, शाश्वत वाढीला चालना देणे आणि उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे या द्विपक्षीय महत्त्वाकांक्षांना बळकटी मिळाली.
सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202649)
आगंतुक पटल : 7