पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला केले संबोधित
भारत आत्मविश्वासाने भारलेला आहे – पंतप्रधान
'मंदी, अविश्वास आणि विखुरलेपणाच्या जगात, भारत प्रगती साध्य करतो, विश्वास निर्माण करतो आणि दुवा साधणारा देश म्हणून कामी येतो – पंतप्रधान
आज भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचे मुख्य इंजिन बनू लागला आहे' – पंतप्रधान
भारताची महिला शक्ती विलक्षण कामगिरी करत आहे; आज आपल्या कन्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी नोंदवत आहेत – पंतप्रधान
आपली गती कायम आहे, आपली दिशा निर्धारीत आहे, राष्ट्र प्रथम हाच आपला कायमस्वरूपी उद्देश आहे – पंतप्रधान
आज प्रत्येक क्षेत्र जुनी वसाहतवादी मानसिकता झुगारून अभिमानाने नवे यश मिळवण्याचे ध्येय बाळगून आहे – पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
06 DEC 2025 8:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2025 या शिखर परिषदेला संबोधित केले. त्यांनी संमेलनात उपस्थित असलेल्या देशातील आणि परदेशातील अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीची दखलपूर्ण नोंद घेतली. त्यांनी आयोजकांना तसेच या परिषदेत आपले विचार मांडलेल्या सर्वांना अभिनंदनपर शुभेच्छाही दिल्या. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दोन मुद्द्यांची आपण काळजीपूर्वक नोंद घेतली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. त्यांनी आपल्या मागील भेटीचा संदर्भ दिला, त्यावेळी आपण त्यांना माध्यम समुहांतर्फे क्वचितच हाती घेतल्या जाणार्या गोष्टीबद्दल सुचवले होते याची आठवण त्यांनी करून दिली, आणि या समुहाने ते केले, असेही त्यांनी नमूद केले. शोभना आणि त्यांच्या चमूने उत्साहाने आपली सूचना पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जेव्हा आपण प्रदर्शनाला भेट दिली, तेव्हा छायाचित्रकारांनी क्षण अशा पद्धतीने टिपले की ते अमर झाल्यासारखे वाटले असे ते म्हणाले. आपण ते प्रदर्शन पाहिले असून, सर्वांनी ते पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. शोभना यांनी उल्लेख केलेल्या दुसर्या मुद्याच्या संदर्भानेही त्यांनी भाष्य केले. त्यांचे म्हणणे म्हणजे केवळ आपण देशाची सेवा करत राहावी अशी इच्छा नाही, तर हिंदुस्तान टाईम्सनेच आपण त्याच पद्धतीने सेवा करत राहावे, असे म्हटले आहे, असे म्हणत याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञताही व्यक्त केली.
उद्याचे परिवर्तन (Transforming Tomorrow) ही यंदाच्या परिषदेची संकल्पना असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हिंदुस्तान टाईम्सला 101 वर्षांचा इतिहास आहे, या समुहाला महात्मा गांधी, मदन मोहन मालवीय आणि घनश्यामदास बिर्ला यांसारख्या महान नेत्यांचे आशीर्वाद लाभले आहेत, असे त्यांनी सांगितले. ज्यावेळी हे वृत्तपत्र उद्याचे परिवर्तन याबद्दल चर्चा करते, तेव्हा भारतात होत असलेले परिवर्तन हे केवळ शक्यतांबद्दलचे नसून, बदलणारे जीवनमान, बदललेली मानसिकता आणि बदललेल्या दिशांची ती खरी गाथा आहे, असा आत्मविश्वास देशाला मिळतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन असल्याचा उल्लेखही त्यांनी केला, आणि सर्व भारतीयांच्या वतीने त्यांना आदरांजलीही अर्पण केली. 21 व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ उलटून गेला असल्याच्या निर्णायक टप्प्यावर आपण उभे असल्याची जाणीव त्यांनी आपल्या संबोधनातून करून दिली. या 25 वर्षांत जगाने आर्थिक संकटे, जागतिक साथरोग, तंत्रज्ञानविषयक अडथळे, विखुरलेले जग आणि सध्या सुरू असलेली युद्धे यांसारखे अनेक चढ-उतार पाहिले असल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व घडामोडी जगाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आव्हान देत असून, आज जग अनिश्चिततेने भारलेले आहे असे पंतप्रधान म्हणाले. अनिश्चिततेच्या या युगात, भारताने स्वतःची वेगळी वाट चोखाळत, आत्मविश्वासाने भारलेला देश म्हणून स्वतःला सिद्ध केले असल्याचे ते म्हणाले. जग जेव्हा मंदीबद्दल बोलत असते, त्यावेळी भारत विकासाची गाथा रचत असतो, जग जेव्हा विश्वासार्हतेच्या संकटाचा सामना करत असते, तेव्हा भारत विश्वासाचा आधारस्तंभ बनतो, आणि जग जेव्हा विखुरलेल्या दिशेने वाटचाल करते, तेव्हा भारत दुवा साधणारा देश म्हणून उदयाला येतो आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
काही दिवसांपूर्वीच भारताच्या दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाची आकडेवारी जाहीर झाले असून, यात आठ टक्क्यांपेक्षा जास्त विकास दर नमूद केला असल्याची माहिती त्यांनी दिली. ही आकडेवारी म्हणजे प्रगतीला मिळालेल्या नव्या गतीचे प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले. हा केवळ एक आकडा नसून, मजबूत आणि व्यापक आर्थिक परिस्थितीचे निदर्शक आहे असे ते म्हणाले. आज भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा कारक घटक बनू लागला असल्याचेच या आकडेवारीवरून दिसून येते असे त्यांनी सांगितले. आज जागतिक विकास दर सुमारे तीन टक्के आहे, तर G-7 देशांचा सरासरी विकास दर सुमारे दीड टक्का आहे, या पार्श्वभूमीवर भारताबद्दलची ही आकडेवारी जाहीर झाली असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. अशा परिस्थितीत भारत अधिक विकास आणि कमी महागाई असणारा आदर्श देश म्हणून उदयाला आला असल्याचे त्यांनी सांगितले. कधीकाळी अर्थतज्ज्ञ वाढत्या महागाईबद्दल चिंता व्यक्त करत असत, पण आज तेच अर्थतज्ज्ञ कमी झालेल्या महागाईबद्दल बोलतात असेही ते म्हणाले.
हे यश सामान्य नाही, अथवा ते आकडेवारीबद्दलही नाही, तर गेल्या दशकात देशाने घडवून आणलेले हे एक मूलभूत परिवर्तन आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. हे मूलभूत परिवर्तन लवचिकतेबद्दलचे आहे, समस्यांवर उपाय शोधण्याच्या प्रवृत्तीबद्दल आहे, भीतीचे सावट दूर करण्याबद्दल आणि आकांक्षांची व्याप्ती विस्तारण्याबद्दलचे आहे, असे त्यांनी नमूद केले. यामुळेच आजचा भारत स्वतःत परिवर्तन घडवून आणत असून, येणाऱ्या उद्यातही परिवर्तन घडवून आणतो आहे, असे त्यांनी सांगितले.
उद्याच्या परिवर्तनावर चर्चा करताना, परिवर्तनाबद्ल मिळणारा आत्मविश्वास हा आज सुरू असलेल्या कामाच्या मजबूत पायावर आधारलेला आहे असे ते म्हणाले. आजच्या सुधारणा आणि आजची कामगिरी यातूनच उद्याच्या परिवर्तनाचा मार्ग प्रशस्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दीर्घकाळपर्यंत देशातल्या क्षमतांचा उपयोगच करून घेतला नाही ही देशाची मोठी समस्या होती, अशा क्षमतांना जेव्हा अधिक संधी मिळतात, जेव्हा त्या देशाच्या विकासात पूर्णतः आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय सहभागी होतात, तेव्हाच देशात परिवर्तनाची सुनिश्चिती होते, असे त्यांनी नमूद केले. पूर्व भारत, ईशान्य भारत, गावे, टीयर-2 आणि टीयर-3 शहरे, महिला शक्ती, नवोन्मेषी युवा वर्ग, सागरी क्षमता, नील अर्थव्यवस्था, तसेच अंतराळ क्षेत्रांच्या बाबतीत विचार केला गेला पाहीजे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. गेल्या दशकांमध्ये या सगळ्या घटकांची पूर्ण क्षमता वापरली गेली नाही, मात्र आज भारत या उपयोग करून न घेतलेल्या क्षमतांना उपयोगात आणण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे, असे त्यांनी नमूद केले. पूर्व भारतात आधुनिक पायाभूत सुविधा, संपर्क जोडणी आणि उद्योग क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे, असे मोदी यांनी नमूद केले. गावे आणि लहान शहरे आधुनिक सुविधांनी सुसज्ज केली जात आहेत, लहान शहरे स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठीची नवीन केंद्रे बनत आहेत, आणि गावांमध्ये शेतकरी कृषी उत्पादन संस्था स्थापन करून थेट जागतिक बाजारपेठांशी जोडले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
भारताची महिला शक्ती उल्लेखनीय कामगिरी करत आहे आणि देशाच्या कन्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी नोंदवत आहेत असे ते म्हणाले. हे परिवर्तन केवळ महिला सक्षमीकरणापुरते मर्यादित नसून, मानसिकता आणि समाजाची ताकद अशा दोन्ही पातळ्यांवर परिवर्तन घडवले जात आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
ज्यावेळी नवीन संधी निर्माण होतात आणि अडथळे दूर केले जातात, तेव्हा आकाशात झेप घेण्यासाठी नव्या पंखांचे बळ लाभते असे ते म्हणाले. यापूर्वी सरकारच्या नियंत्रणात असलेल्या भारताच्या अंतराळ क्षेत्राचे उदाहरणही त्यांनी मांडले. आता अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्याकरता सुधारणा केल्या गेल्या, त्याचे परिणामही देशाला दिसू लागले आहेत. केवळ 10-11 दिवसांपूर्वीच आपण हैदराबादमध्ये स्काय रूटच्या इन्फिनिटी संकुलाचे उद्घाटन केले, या घडामोडी त्यांनी अधोरेखित केल्या. स्कायरूट, ही एक खाजगी भारतीय अंतराळ कंपनी असून, ती दरमहा एक रॉकेट तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे, उड्डाणासाठी सज्ज असलेले विक्रम-1 तयार करत आहे, या यशाचा उल्लेखही त्यांनी केला. सरकारने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि त्याआधारे भारताचा युवा वर्ग एक नवीन भविष्य घडवत आहेत, हेच खरे परिवर्तन आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
भारतातील आणखी एका बदलाची चर्चा होणे आवश्यक आहे, असे अधोरेखित करुन मोदी म्हणाले की एक काळ असा होता जेव्हा कशाची तरी प्रतिक्रिया म्हणून सुधारणा होत असे. राजकीय हेतू अथवा एखाद्या संकटाला प्रतिक्रिया म्हणजे सुधारणा होती. आज राष्ट्रहिताचे उद्दीष्ट लक्षात घेऊन सुधारणा होत आहेत. राष्ट्र प्रथम या तत्त्वाला अनुसरुन भारत एकसमान गतीने आणि सातत्य राखून प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. 2025 हे अशा काही सुधारणांचे वर्ष होते असे त्यांनी अधोरेखित केले. जीएसटीच्या पुढच्या टप्प्यातील सुधारणा हे त्याचेच एक मुख्य उदाहरण आहे. या सुधारणांचा प्रभाव देशभरात दिसून आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. प्रत्यक्ष कर प्रणालीतही यावर्षी एक प्रमुख बदल करण्यात आला. 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले. हे घडेल, याची दहा वर्षांपूर्वी कुणी कल्पनादेखील केली नसेल असे ते म्हणाले.
या सुधारणांमध्ये सातत्य राखल्याचे सांगून मोदी म्हणाले की आत्ता तीन चार दिवसांपूर्वीच छोट्या कंपनीच्या मानकांमध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे हजारो कंपन्यांसाठी सोपी नियमावली लागू झाली, प्रक्रिया गतीमान झाली आणि चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या. अनिवार्य दर्जा नियंत्रण आदेशातून सुमारे 200 उत्पादने वगळण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
“भारताची सध्याची वाटचाल केवळ विकासापुरती मर्यादित नाही तर मानसिकतेतील बदलाची असून ही एक मानसिक क्रांतीच आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. आत्मविश्वासाशिवाय कुठलाच देश प्रगती करू शकत नाही. मात्र दुर्दैवाने दीर्घकाळ वसाहतवाद्यांनी राज्य केल्यामुळे वसाहतवादी मानसिकता तयार होऊन भारताचा आत्मविश्वास डळमळला. ही वसाहतवादी मानसिकता भारताच्या प्रगत देश बनण्याच्या मार्गातला मोठा अडसर आहे आणि म्हणूनच आज भारत या मानसिकतेतून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
भारतावर दीर्घकाळ राज्य करण्यासाठी भारतीयांचा आत्मविश्वास कमजोर करावा लागेल आणि त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण करावी लागेल हे ब्रिटीशांना माहीत होते. त्या काळात त्यानी हेच केले, असे मोदी म्हणाले. भारतीय कुटुंबव्यवस्था कालबाह्य ठरवली गेली, भारतीय पोशाख व्यावसायिक नसल्याचे सांगितले गेले, भारतीय सण आणि संस्कृती तर्कहीन ठरवल्या, योग आणि आयुर्वेद अवैज्ञानिक ठरवले आणि भारतीयांनी लावलेले शोध हास्यास्पद मानले गेले असे त्यांनी सांगितले. या सगळ्या विचारसरणीला वारंवार प्रोत्साहित केले गेले. चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्या आणि त्या कित्येक दशके पुन्हा पुन्हा लोकांच्या मनावर बिंबवत राहिल्यामुळे भारतीयांचा आत्मविश्वास डळमळीत झाला, असे मोदी यांनी अधोरेखित केले.
वसाहतवादाच्या व्यापक प्रभावाविषयी बोलताना मोदी म्हणाले की मी तुम्हाला काही उदाहरणे देतो. एकापाठोपाठ एक यशाच्या पायऱ्या चढत जाणाऱ्या भारताला आज जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, जागतिक विकासाचे इंजिन आणि जगाचा उर्जास्रोत म्हणून संबोधले जाते. भारताच्या एवढ्या गतीमान प्रगतीनंतरही कोणीही त्याचा उल्लेख ‘हिंदू विकासाचा वेग’ असा करत नाही. मात्र भारताचा विकासदर दोन ते तीन टक्क्यांच्या आसपास होता, तेव्हा असा उल्लेख केला गेला होता, याची त्यांनी आठवण करुन दिली. देशाच्या विकासाचा त्या देशातील लोकांच्या धर्माशी संबंध जोडणे अनवधानाने घडले होते का? असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला. वसाहतवादी मानसिकतेचाच तो परिणाम होता असे मोदी म्हणाले. एक संपूर्ण समाज आणि एक परंपरा आळशी आणि दारिद्री ठरवली गेले. भारताचा मागासलेपणा हिंदू संस्कृतीचा परिणाम असल्याचे सिद्ध करण्याचे प्रयत्न केले गेले. त्या काळात सगळ्या पुस्तकांमध्ये आणि शोधनिबंधांमध्ये हिंदू विकास दर असे म्हटले गेले. सगळ्या गोष्टींमध्ये जातीयवाद शोधणाऱ्या तथाकथित बुद्धीवाद्यांना हिंदू विकास दर या संकल्पनेत जातीयवाद दिसला नाही, या विरोधाभासाकडे मोदी यांनी लक्ष वेधल.
पंतप्रधान मोदी म्हणाले की वसाहतवादी मानसिकतेने भारतातली उत्पादन साखळी नष्ट केली. आता ती पुन्हा प्रस्थापित केली जात आहे असे त्यांनी अधोरेखित केले. वसाहतवादाच्या काळातही भारत शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा सर्वात मोठा उत्पादक देश होता. त्या काळात भारतात स्फोटकांचे कारखाने होते, शस्त्रास्त्रांची निर्यात केली जात होती आणि जागतिक युद्धांमध्ये ती मोठ्या प्रमाणात वापरली गेली असे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर संरक्षण सामग्री उत्पादन परिसंस्था नष्ट केली गेली. तत्कालिन सरकारमधील वसाहतवादी मानसिकतेमुळे भारतात तयार झालेली शस्त्रास्त्रे कमकुवत मानली गेली आणि भारत जगातला सर्वात मोठा संरक्षण सामग्री आयात करणारा देश झाला, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
याच वसाहतवादी मानसिकतेचा जहाजबांधणी उद्योगावरही परिणाम झाला. तत्पूर्वी कित्येक शतके भारत जहाजबांधणी उद्योगाचे प्रमुख केंद्र होता. पन्नास साठ वर्षांपूर्वीही भारताचा चाळीस टक्के व्यापार भारतीय जहाजांद्वारे होत असे; परंतु वसाहतवादी मानसिकतेने परदेशी जहाजांना प्राधान्य दिले, असे मोदी यांनी सांगितले. याचा परिणाम आपल्याला दिसलाच. एकेकाळी सागरी सामर्थ्य असलेला देश आपल्या 95 टक्के व्यापारासाठी परदेशी जहाजांवर अवलंबून राहू लागला. भारताला सुमारे 75 बिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे सहा लाख कोटी रुपये दरवर्षी परदेशी जहाज कंपन्यांना द्यावे लागत होते.
“जहाजबांधणी असो किंवा संरक्षण सामग्री उत्पादन, आज प्रत्येक क्षेत्रात वसाहतवादी मानसिकतेला मागे सारून भारत प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे,” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
मोदी म्हणाले की दीर्घकाळ प्रशासकीय यंत्रणेचा आपल्याच नागरिकांवर विश्वास नसल्यामुळे या वसाहतवादी मानसिकतेने भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेचे प्रचंड मोठे नुकसान केले. याआधी लोकांना आपली स्वतःचीच कागदपत्रे सत्यापित करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घ्यावी लागत होती. आता हा अविश्वास मोडीत निघाला असून, स्व-सत्यापन पुरेसे मानले जात आहे.
असाही एक काळ होता, जेव्हा छोटीशी चूकदेखील या देशात गंभीर गुन्हा मानली जात होती असे अधोरेखित करुन मोदी म्हणाले की यात बदल घडविण्यासाठी जन विश्वास कायदा अमलात आणला आणि गुन्ह्याबाबतच्या अशा शेकडो तरतूदी रद्द करण्यात आल्या. अविश्वासामुळेच पूर्वी एक हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठीही बँका जामीन मागत असत. आतापर्यंत 37 लाख कोटी रुपये विनातारण कर्ज देणाऱ्या मुद्रा योजनेने अविश्वासाचे हे दुष्टचक्र मोडले, असे पंतप्रधान म्हणाले. तारण म्हणून देण्यासाठी काहीही नसणाऱ्या कुटुंबातील युवकांना या पैशांमुळे आत्मविश्वास मिळाला आणि त्यांना उद्योजक बनविले असे त्यांनी नमूद केले.
एकेकाळी देशात असेही मानले जात होते की सरकारला एकदा काही दिले की ते परत मिळणार नाही, असे सांगून मोदी म्हणाले की जेव्हा सरकार आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते दृढ होते तेव्हा त्याचे परिणाम दिसतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की बँकांमध्ये लोकांचे दावा न केलेले 78 हजार कोटी रुपये होते, म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये तीन हजार कोटी आणि लाभांशाचे 9 हजार कोटी रुपये होते. हे पैसे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे होते, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की या पैशांची मालकी असलेल्या योग्य व्यक्तीला ते परत देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जात आहेत. आतापर्यंत 500 जिल्ह्यांमध्ये अशी शिबिरे आयोजित करुन हजारो कोटी रुपये योग्य व्यक्तींना परत देण्यात आले आहेत.
हा मुद्दा केवळ मालमत्ता परत देण्याचा नाही; तर विश्वासाचा आहे, लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याच्या वचनपूर्तीचा आहे, यावर मोदी यांनी भर दिला. लोकांचा विश्वास हेच देशाचे खरे भांडवल आहे आणि अशा मोहीमा वसाहतवादी मानसिकतेत शक्यच नव्हत्या, असेही मोदी म्हणाले.
"देश प्रत्येक क्षेत्रात वसाहतवादी मानसिकतेपासून पूर्णपणे मुक्त झाला पाहिजे", यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी अधोरेखित केले की काही दिवसांपूर्वीच त्यांनी देशाला आवाहन केले होते की प्रत्येकाने दहा वर्षांचा कालावधी निश्चित करून काम करावे. मोदींनी पुढे नमूद केले की भारतात मानसिक गुलामगिरीची बीजे पेरणाऱ्या मॅकॉलेच्या धोरणाला 2035 मध्ये 200 वर्षे पूर्ण होतील, म्हणजेच दहा वर्षे शिल्लक आहेत. या दहा वर्षांमध्ये सर्व नागरिकांनी, आपला देश वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त होईल याकडे लक्ष दिले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
"भारत हा केवळ एक निश्चित मार्ग ठरवून त्यावर चालणारा देश नाही, तर उत्तम भविष्यासाठी भारताने आपली क्षितिजे विस्तारली पाहिजेत", असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशाच्या भविष्यातील गरजा समजून घेण्याची आणि वर्तमानात उपाय शोधण्याची गरज आहे यावर त्यांनी भर दिला. म्हणूनच ते अनेकदा मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानांबाबत बोलतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. जर असे उपक्रम चार ते पाच दशकांपूर्वी सुरू झाले असते तर आज भारताची परिस्थिती खूप वेगळी असती असे त्यांनी नमूद केले. मोदींनी सेमीकंडक्टर क्षेत्राचे उदाहरण दिले. पाच ते सहा दशकांपूर्वी एक कंपनी भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्यासाठी आली होती, मात्र त्याकडे लक्ष दिले गेले नाही, ज्यामुळे भारत सेमीकंडक्टर उत्पादनात मागे पडला.
पंतप्रधान म्हणाले की ऊर्जा क्षेत्रालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. भारत सध्या दरवर्षी सुमारे 125 लाख कोटी रुपयांचे पेट्रोल, डिझेल आणि गॅस आयात करतो. त्यांनी अधोरेखित केले की देशात मुबलक सूर्यप्रकाश मिळत असूनही, 2014 पर्यंत भारताची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता केवळ 3 गिगावॅट होती. गेल्या दहा वर्षांमध्ये ही क्षमता सुमारे 130 गिगावॅटपर्यंत वाढली आहे, ज्यामध्ये केवळ छतावरील सौरऊर्जेद्वारे 22 गिगावॅटची भर पडली आहे.
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेमुळे नागरिकांना ऊर्जा सुरक्षेच्या मोहिमेत थेट सहभागी होता आले, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. वाराणसीचे खासदार म्हणून त्यांनी स्थानिक आकडेवारीचा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की वाराणसीतील 26,000 पेक्षा जास्त घरांनी या योजनेअंतर्गत सोलार संयंत्रे बसवली आहेत. यातून दररोज तीन लाख युनिटपेक्षा जास्त वीज निर्मिती होत आहे, ज्यामुळे दरमहा लोकांची सुमारे पाच कोटी रुपयांची बचत होत आहे. या सौरऊर्जा निर्मितीमुळे दरवर्षी सुमारे नव्वद हजार मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी होत आहे, ज्याची भरपाई करण्यासाठी चाळीस लाखांहून अधिक झाडे लावावी लागली असती हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी स्पष्ट केले की ते फक्त वाराणसीतील आकडेवारी सादर करत आहेत. यावरून या योजनेमुळे देशाचा किती फायदा होत आहे, याची कल्पना करा, असे आवाहन त्यांनी केले. एखाद्या उपक्रमात भविष्य बदलण्याची किती ताकद असते याचे हे उदाहरण आहे असे त्यांनी नमूद केले.
2014 पूर्वी भारत 75 टक्के मोबाईल फोन आयात करत असे, आणि आज मोबाईल फोन आयात जवळपास शून्यावर आली आहे आणि देश एक प्रमुख निर्यातदार बनला आहे, असे मोदी यांनी निदर्शनास आणून दिले. 2014 नंतर सुधारणा सुरू झाल्या, देशाने उत्तम कामगिरी केली आणि परिवर्तनकारी परिणाम आज जग पाहत आहे यावर त्यांनी भर दिला.
उद्याच्या परिवर्तनाचा हा प्रवास असंख्य योजना, धोरणे, निर्णय, सार्वजनिक आकांक्षा आणि सार्वजनिक सहभागाचा प्रवास आहे हे अधोरेखित करून, मोदी यांनी हा सातत्य राखण्याचा प्रवास आहे, जो एखाद्या शिखर परिषदेच्या चर्चेपुरता मर्यादित नाही तर भारतासाठी एक राष्ट्रीय संकल्प आहे यावर भर दिला. या संकल्पात सर्वांचे सहकार्य आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानले.
***
माधुरी पांगे/तुषार पवार/सुरेखा जोशी/सुषमा काणे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2199932)
आगंतुक पटल : 7