संरक्षण मंत्रालय
समुद्रापार आसियान देशांकडे केलेल्या तैनातीचा एक भाग म्हणून आय सी जी एस विग्रह इंडोनेशिया कडे रवाना
प्रविष्टि तिथि:
03 DEC 2025 9:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025
समुद्रापार आसियान देशांकडे केलेल्या तैनातीचा एक भाग म्हणून भारतीय तटरक्षक दलाचे जहाज आय सी जी एस विग्रह 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर या तीन दिवसांच्या कार्यात्मक भेटीसाठी जकार्ता, इंडोनेशिया कडे रवाना झाले आहे. या तीन दिवसीय भेटीदरम्यान भारतीय तटरक्षक दलाचे आणि इंडोनेशियन तटरक्षक दलाचे (BAKAMLA) अधिकारी व्यावसायिक चर्चा, टेबलटॉप प्रतिकृतीसह युद्धसराव, जहाजावरील आणीबाणीचा सामना करण्याच्या पद्धतींचा सराव आणि संयुक्त प्रशिक्षण सत्रांमध्ये सहभागी होतील. दोन्ही देशांच्या सागरी क्षेत्रातील सागरी सुरक्षा आणि पर्यावरण सुरक्षेसंबंधित कारवाईत दोन्ही तटरक्षक दलांमधील सहकार्य वाढत असल्याचे या भेटीतून अधोरेखित होत आहे.

या भेटीदरम्यान अनेक सदिच्छा भेटी, जहाज भेटी, योग आणि क्रीडा प्रकार सादरीकरणे तसेच सागरी प्रशिक्षण संस्थांमधील व्यावसायिक चर्चासत्रे होणार आहेत. या परस्पर संवादातून दोन्ही देशांचे नागरिक तसेच अधिकाऱ्यांमधील बंधुभाव वाढीस लागेल आणि त्यातूनच कार्यवाहीतील प्रभावी सहकार्याचा पाया घातला जाईल. भारत आणि इंडोनेशिया हे दोन्ही देश आघाडीच्या सागरी लोकशाही व्यवस्था असून भारत- प्रशांत क्षेत्रात नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा (RBIO) पुरस्कार करण्यासाठी वचनबद्ध आहेत.
भारतीय तटरक्षक दल आणि इंडोनेशियन तटरक्षक दल अर्थात BAKAMLA यांच्यात जुलै 2020 मध्ये झालेला सामंजस्य करार (MoU), भारत-इंडोनेशिया च्या सागरी भागीदारीचा आधारस्तंभ आहे. या महत्वपूर्ण करारामुळे दोन्ही देशांमधील कार्यात्मक सहकार्य, सागरी कायदा अंमलबजावणीतील सहकार्य, सागरी गस्तीतील समन्वय, शोध तसेच बचाव कार्य, सागरी प्रदूषण नियंत्रण, माहितीचे आदानप्रदान आणि क्षमता बांधणीतील सहकार्य वाढण्यासाठी एक आराखडा तयार झाला आहे. या करारामुळे दोन्ही दलांमधील सातत्यपूर्ण संपर्कव्यवस्था सुरू असून त्यामुळे उत्तम सेवापद्धतींचे आदानप्रदान, व्यावसायिक प्रशिक्षण, तसेच संयुक्त सागरी कार्यवाहीतील समन्वय शक्य झाला आहे.

जाकार्तामधील भेट संपल्यावर आयसीजीएस विग्रह आपल्या आसियान देशांमधील तैनातीच्या अंतर्गत मलेशियातील पोर्ट कलांग च्या भेटीवर जाणार आहे. या तैनातीमधून भारत - प्रशांत क्षेत्रातील क्षेत्रीय संपर्क, सहकार्याधारित प्रतिसाद यंत्रणेचे बळकटीकरण, तसेच क्षेत्रीय शांतता , स्थिरता आणि सागरी नियंत्रण इत्यादी उद्दिष्टे साध्य होण्याची अपेक्षा आहे.
सुवर्णा बेडेकर/उमा रायकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2198500)
आगंतुक पटल : 5