नौवहन मंत्रालय
आयएमओ परिषदेवर भारताची फेरनिवड, भारताने मिळवली सर्वाधिक मते, जागतिक सागरी भूमिका केली मजबूत
भारताने आयएमओ असेंब्लीमध्ये 169 पैकी 154 मते मिळवली, सलग दुसऱ्यांदा ब श्रेणीत सर्वाधिक मते मिळाली
भारत जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, यूएई , ऑस्ट्रेलिया, स्पेन, स्वीडन, नेदरलँड्स आणि ब्राझीलसह 10 प्रमुख सागरी राष्ट्रांच्या महत्त्वाच्या गटात सामील झाला
प्रविष्टि तिथि:
29 NOV 2025 8:00PM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (आयएमओ ) परिषदेत श्रेणी ब मध्ये भारताची फेरनिवड झाली आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक रस असलेल्या 10 देशांचा समावेश आहे. लंडनमधील 34 व्या आयएमओ असेम्ब्लीत 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत भारताने या श्रेणीत सर्वाधिक मते मिळवली, ज्यात 169 वैध मतांपैकी 154 मते होती.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हा निकाल म्हणजे भारताच्या वाढत्या जागतिक सागरी प्रभावाला मिळालेले एक मोठे समर्थन असल्याचे म्हटले आहे. "आयएमओमधील भारताचे यश हे आपले धडाडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सागरी दृष्टिकोनाचा दाखला आहे," असे सर्वानंद सोनोवाल म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या इंडिया मेरीटाईम वीक 2025 च्या यशस्वी आयोजनानंतर लगेचच भारताची फेरनिवड झाली आहे, ज्यामध्ये 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते आणि भारताच्या विकसित होत असलेल्या सागरी क्षमता यात प्रदर्शित केल्या होत्या. या कार्यक्रमाने गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा अवलंब, बंदर-प्रणित विकास आणि सागरी सुरक्षा यावरील चर्चेसाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले.
आयएमओमध्ये भारताचे महत्व सातत्याने वाढत असून सलग दुसऱ्या कार्यकाळात देशाने ब श्रेणीमध्ये सर्वाधिक मते मिळवली आहेत. अधिकाऱ्यांनी या कामगिरीचे वर्णन अमृत काल सागरी व्हिजन 2047 ला गती देण्यात एक मैलाचा दगड असे केले. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सागरी केंद्रात रूपांतरित करण्यासाठी हा दीर्घकालीन आराखडा आहे. या उपक्रमाला मोदी स्वतः मार्गदर्शन करत असून सोनोवाल यांच्यासह बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर त्याचे नेतृत्व करत आहेत.
आयएमओ परिषदेत निवडून आलेले 40 सदस्य देश आहेत जे तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत आणि बैठक सत्रांमध्ये संघटनेची कार्यकारी संस्था म्हणून काम करतात. असेंब्ली दरम्यान भारतीय शिष्टमंडळाने अनेक देश , आंतरराष्ट्रीय सागरी संघटना आणि आयएमओ अधिकाऱ्यांसोबत सागरी सुरक्षा, सागरी डिजिटलायझेशन, हरित नौवहन , नाविकांचे कल्याण आणि बंदर विकासात भागीदारी वाढवण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठका घेतल्या.
भारताव्यतिरिक्त, आयएमओ असेंब्लीने ब श्रेणीमध्ये काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक रस असलेल्या 10 सदस्य देशांना निवडले आहे ज्यात ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई ) यांचा समावेश आहे.
***
शैलेश पाटील/सुषमा काणे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2196458)
आगंतुक पटल : 14