खाण मंत्रालय
देशाच्या कोळसाविषयक गरजा पुरवण्यात वेस्टर्न कोलफिल्ड्स चे योगदान अत्यंत महत्त्वाचे – केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्रालय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे
डब्ल्यूसीएलच्या नागपूर येथील मुख्यालयात केंद्रीय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये सुरु करण्यात आलेल्या “शस्त्र” या पहिल्याच सिम्युलेटर आधारित शस्त्र प्रशिक्षण केंद्राचे केले उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
28 NOV 2025 1:58PM by PIB Mumbai
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्रालय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांनी गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025 वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) या कंपनीच्या नागपूर स्थित मुख्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी डब्ल्यूसीएलच्या कार्याचा आढावा घेतला तसेच महत्त्वाच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले.

केंद्रीय राज्यमंत्री दुबे यांनी डब्ल्यूसीएल मुख्यालयात उभारण्यात आलेल्या ई-वाहन जलद विदयुत चार्जिंग केंद्राचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी ई-टेहळणीचे काम करणाऱ्या एकात्मिक कमांड आणि नियंत्रण केंद्राची (आयसीसीसी) पाहणी देखील केली.
आढावा बैठकीचे अध्यक्ष म्हणून बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी देशाच्या वाढत्या कोळसाविषयक गरजा लक्षात घेता डब्ल्यूसीएलचे वार्षिक उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक आहे यावर भर दिला.ते म्हणाले की, भारताला कोळसा क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सध्या सुरु असलेल्या खननसंबंधी कामांना बळकटी देणे तसेच नवे प्रकल्प कार्यान्वित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या संदर्भात खनन मंत्रालयाच्या संपूर्ण सहकार्याची ग्वाही त्यांनी दिली. देशाच्या कोळसाविषयक गरजा पुरवण्यात वेस्टर्न कोलफिल्ड्सने दिलेले अत्यंत लक्षणीय योगदान दुबे यांनी अधोरेखित केले.
डब्ल्यूसीएलच्या नव्या संकेतस्थळाचे तसेच चंद्रपूर भागातील अमृत फार्मसीचे उद्घाटन करून या बैठकीला सुरुवात झाली. डब्ल्यूसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जे.पी.द्विवेदी यांनी उपस्थितांसमोर डब्ल्यूसीएलच्या खनन कार्याचे तपशीलवार विहंगावलोकन सादर केले. नवे उपक्रम, कल्याणकारी योजना, कॉर्पोरेट सामाजिक दायित्वसंबंधित कार्ये आणि इतर महत्त्वपूर्ण घडामोडींसह विद्यमान आर्थिक वर्षात झालेले कोळसा उत्पादन आणि आतापर्यंत रवाना झालेला कोळसा याविषयी त्यांनी केंद्रीय मंत्री दुबे यांना माहिती दिली. कंपनीचे वार्षिक उत्पादन लक्ष्य साध्य करण्यासाठी डब्ल्यूसीएल योग्य मार्गाने कार्यरत आहे अशी ग्वाही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिली.
केंद्रीय राज्यमंत्री दुबे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) अखिलेश कुमार, खासगी सचिव रितुराज मिश्रा, उपसचिव राम कुमार, अवर सचिव वसंत बुर्डे, खासगी सचिव ह्रदेश द्विवेदी यांच्यासह डब्ल्यूसीएल चे संचालक (वित्तीय) विक्रम घोष, संचालक (तांत्रिक-परिचालन आणि प्रकल्प/नियोजन)आनंदजी प्रसाद, संचालक (मनुष्यबळ विभाग) डॉ. हेमंत शरद पांडे, मुख्य दक्षता अधिकारी अजय मधुकर म्हेत्रे तसेच कंपनीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक, मुख्यालय महाव्यवस्थापक, विविध विभाग प्रमुख आणि इतर ज्येष्ठ अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.

शस्त्र - या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये सुरु करण्यात आलेल्या “शस्त्र” या पहिल्याच सिम्युलेटर आधारित शस्त्र प्रशिक्षण केंद्राचे केंद्रीय राज्यमंत्री दुबे यांच्या हस्ते उद्घाटन
या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी डब्ल्यूसीएलच्या “शस्त्र” या – लहान मिश्र शस्त्रास्त्रे सिम्युलेटर प्रशिक्षण अकादमीचे - देशातील एखाद्या सार्वजनिक ई=क्षेत्रातील उपक्रम कंपनीमध्ये स्थापन झालेल्या अशा पद्धतीच्या पहिल्याच सिम्युलेटर आधारित शस्त्र प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन देखील केले. नागपूर मध्ये इंदोरा भागातील सुरक्षा प्रशिक्षक केंद्रात स्थापन करण्यात आलेले हे केंद्र डब्ल्यूसीएलच्या कार्यान्वयन विभागांमध्ये कार्यरत सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने उभारण्यात आले आहे.
या केंद्रात उपलब्ध असलेली शस्त्रे आणि प्रशिक्षण पद्धतींचा आढावा घेऊन केंद्रीय राज्यमंत्र्यांनी डब्ल्यूसीएलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना त्यांची कर्तव्ये पार पाडताना दक्ष, कौशल्यपूर्ण आणि प्रामाणिक राहण्यासाठी प्रेरित केले.
***
निलिमा चितळे/संजना चिटणीस/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2195930)
आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English