खाण मंत्रालय
नागपूरमधील जवाहरलाल नेहरु अॅल्युमिनियम संशोधन विकास आणि रचना केंद्राच्या नव्या एक्सआरएफ प्रयोगशाळेचे कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीश दुबे यांनी केले उद्घाटन
‘जेएनएआरडीडीसी’ ला सशक्त, आत्मनिर्भर आणि शाश्वत खनिज क्षेत्रासाठी योगदान देण्याचे केले आवाहन
Posted On:
28 NOV 2025 3:17PM by PIB Mumbai
केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री, सतीश दुबे यांनी गुरुवारी नागपूर येथील जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम संशोधन, विकास आणि रचना केंद्रात (जेएनएआरडीडीसी) नव्याने स्थापित केलेल्या एक्सआरएफ प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर, राज्यमंत्री दुबे यांनी विविध प्रयोगशाळांना भेट दिली, शास्त्रज्ञांशी संवाद साधला आणि केंद्राच्या तंत्रज्ञानविषयक प्रगती तसेच उद्योगांमध्ये येणाऱ्या समस्यांवर तयार केलेल्या उपाययोजनांमध्ये विशेष स्वारस्य दाखवले.

केंद्राच्या संशोधन आणि विकास उपक्रमांवर केलेल्या संक्षिप्त सादरीकरणानंतर, त्यांनी जेएनएआरडीडीसीच्या चालू असलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. अभिनव तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी, पुनर्चक्रीकरण क्षमता मजबूत करण्यासाठी आणि महत्त्वाच्या खनिजांवरील संशोधन करण्यासाठी संस्थेच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या, सशक्त, आत्मनिर्भर आणि शाश्वत खनिज क्षेत्रासाठी योगदान देणे सुरू ठेवण्यास त्यांनी वैज्ञानिक चमूला प्रोत्साहित केले. त्यांनी देशाच्या खनिज आणि अॅल्युमिनियम परिसंस्थेतील जेएनएआरडीडीसीच्या योगदानाबद्दल कौतुक केले आणि चमूला नवोन्मेष आणि उत्कृष्टतेत नवीन उंची गाठण्याचे आवाहन केले. या भेटीदरम्यान, दुबे यांनी पर्यावरण शाश्वततेसाठी केंद्राच्या निरंतर बांधिलकीचे दर्शन घडवणाऱ्या "एक पेड माँ के नाम" या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत एक रोप देखील लावले.

एक्सआरएफ प्रयोगशाळेची वैशिष्ट्ये
जेएनएआरडीडीसीच्या विश्लेषणात्मक आणि चाचणी क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करण्यासाठी एक्सआरएफ प्रयोगशाळा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. प्रो-ट्रेस सॉफ्टवेअर आणि प्रमाणित संदर्भ मानकांनी सुसज्ज असलेले नव्याने स्थापित केलेले पॅनॅलिटिकल झेटियम एक्सआरएफ तंत्रज्ञानामुळे खडक, मृदा, गाळ, धातुके, खनिजे आणि खनिज वाळू यांसारख्या भूगर्भशास्त्रीय सामग्रीच्या विस्तृत श्रेणीचे, सुसंगत, उच्च-गुणवत्तेचे, पूर्णपणे माग काढता येण्याजोगे विश्लेषण सुनिश्चित होणार आहे. घन आणि भुकटी अशा दोन्ही स्वरुपातील नमुन्यांमधील मुख्य, गौण आणि दुय्यम मूलद्रव्यांचे अचूक मापन या अत्याधुनिक वेव्हलेंग्थ-डिस्पर्सिव्ह प्रणालीद्वारे करणे शक्य होते. ही प्रयोगशाळा जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया), इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, ओदिशा मायनिंग कॉर्पोरेशन, तसेच इतर अनेक सार्वजनिक आणि खाजगी संस्थांसारख्या महत्त्वाच्या हितधारकांना सेवा पुरवेल. विशेषतः, क्रिटिकल मिनरल्स म्हणजे अतिमहत्त्वाच्या खनिजांच्या मूल्यांकनासाठी ती अतिशय उपयुक्त आहे. ज्यामुळे फ्लोरीन, कोबाल्ट, रेअर अर्थ एलिमेंट्स आणि भारताच्या वाढत्या खनिज क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या इतर धोरणात्मक किंवा उच्च-मूल्याच्या खनिजांचे विश्लेषण करण्याची वाढीव क्षमता प्राप्त झाली आहे.
***
निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2195912)
अभ्यागत कक्ष : 35