संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय युद्ध स्मारकात आयोजित एनसीसीच्या 78 व्या स्थापना दिनाचे संरक्षण सचिवांनी केले नेतृत्व
राष्ट्रीय युद्ध स्मारकात त्रि-सेवा एनसीसी गर्ल कॅडेट्सनी वाहिली श्रद्धांजली
Posted On:
22 NOV 2025 4:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 22 नोव्हेंबर 2025
राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) 23 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचा 78 वा स्थापना दिन साजरा करणार आहे. या दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या सुरुवातीला, 22 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे एक भव्य अभिवादनपर समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी संरक्षण सचिव श्री राजेश कुमार सिंह आणि एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी संपूर्ण संघटनेच्या वतीने शहीद वीरांना पुष्पहार अर्पण केला आणि श्रद्धांजली वाहिली.
या समारंभाने राष्ट्र उभारणी आणि युवा विकासात एनसीसीच्या दृढ भूमिकेवर प्रकाश टाकणाऱ्या देशव्यापी उत्सवाची सुरुवात झाली.
यावेळी तिन्ही सेवा दलातील तीन एनसीसी मुलींच्या कॅडेट्सनीही पुष्पहार अर्पण करून शहीद वीरांना श्रद्धांजली वाहिली आणि देशाच्या शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वासोबत सामील झाले. समारंभानंतर, संरक्षण सचिव, डीजी एनसीसी आणि उपस्थितांनी दिल्लीच्या विविध शाळांमधून आलेल्या एनसीसी कॅडेट्सच्या बँड सादरीकरणाचे निरीक्षण केले आणि या स्मृतिदिनाला एक औपचारिक स्पर्श प्राप्त करून दिला.
एन सी सी ही 1948 मध्ये केवळ 20,000 कॅडेट्सने स्थापन झाल्यापासून 20 लाख कॅडेट्ससह आज जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना बनली आहे, ज्यामध्ये 2014 ते 2025 दरम्यान ६ लाख कॅडेट्सची भर पडली आहे. आज, एनसीसीचे कार्य भारतातील ७८० जिल्ह्यांपैकी ७१३ जिल्ह्यांमध्ये पसरले आहे, ज्यामुळे ते देशातील सर्वात जास्त प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा संस्थांपैकी एक बनली आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, कॅडेट्सनी रक्तदान मोहीम, वृक्षारोपण उपक्रम, 'स्वच्छता ही सेवा' मोहिमा आणि नशा मुक्ती अभियानांतर्गत अंमली पदार्थ विरोधी जागरूकता कार्यक्रम यासारख्या सार्वजनिक सेवा उपक्रमांच्या मालिकेद्वारे हा दिवस साजरा केला. या प्रयत्नांमधून समुदाय सहभाग, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जबाबदारीवर संस्थेचे सतत लक्ष केंद्रित असल्याचे दिसून आले.
या मेळाव्याला संबोधित करताना, संरक्षण सचिवांनी एनसीसीच्या विविध क्षेत्रांमधील योगदानाचे कौतुक केले. त्यांनी आपदा मित्र, आपत्ती प्रतिसाद प्रशिक्षण, एनसीसी माउंट एव्हरेस्ट मोहीम आणि अभ्यासक्रमात ड्रोन आणि सायबर प्रशिक्षणाचा समावेश यासारख्या प्रमुख उपक्रमांवर प्रकाश टाकला.
विकसित भारत मजबूत करण्यासाठी वचनबद्ध शिस्तबद्ध, सामाजिकदृष्ट्या जागरूक आणि तांत्रिकदृष्ट्या कुशल तरुण तयार करत एनसीसी एक चैतन्यशील आणि भविष्यासाठी सज्ज संघटना म्हणून आपला 77 वा वर्धापन दिन साजरा करत असताना विकसित होत आहे.
गोपाळ चिपलकट्टी/हेमांगी कुलकर्णी /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2192874)
Visitor Counter : 4