वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सार्वजनिक खरेदीमध्ये महिला उद्योजकांच्या सहभागाला चालना देण्यासाठी GeM आणि युएन वुमेन यांच्यात सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
20 NOV 2025 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2025
देशातील सार्वजनिक खरेदी प्रणालीमध्ये, अनौपचारिक उद्योग क्षेत्रातील महिला उद्योजकांचा अंतर्भाव करून त्यांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, भारतातील वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील GeM अर्थात शासकीय ई-बाजारपेठ तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या लिंगभाव समानता आणि महिला सक्षमीकरण संस्था अर्थात युएन वुमेन यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे.
लिंगभाव प्रतिसादावर आधारीत खरेदीला चालना देणे यावर या सामंजस्य करारात भर दिला गेला आहे. यासाठी महिलांच्या नेतृत्वाअंतर्गत सुरु असलेल्या उद्योग व्यवसायांकडून खरेदीचे प्रमाण वाढवण्याला प्रोत्साहन दिले जाणार आहे.ज्यामुळे GeM च्या वूमनिया या उपक्रमांतर्गत महिला उद्योजकांसाठी बाजारपेठांची उपलब्धता वाढू शकणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या लिंगभाव समानता आणि महिला सक्षमीकरण संस्थेच्या भारताच्या प्रतिनिधी कांता सिंह आणि GeM चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजित बी. चव्हाण यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. GeM चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिहिर कुमार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
GeM हे केंद्र आणि राज्य सरकारची मंत्रालये, विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि स्वायत्त संस्थांसाठीचे राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टल आहे. या पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक,कार्यक्षम आणि सर्वसमावेशक खरेदीला चालना दिली जात आहे. GeM च्या माध्यमातून, महिला उद्योजक आणि महिलांचे बचत गट थेट सरकारी खरेदीदारांना आपल्या उत्पादनांचा पुरवठा करू शकतात. त्यादृष्टीने या पोर्टलवर सुलभतेने नोंदणी करता यावी, तसेच त्यांच्या खरेदीला पाठबळ पुरवता यावे या उद्देशाने, GeM वर हस्तकला, हातमागाच्या वस्तू, ताग आणि काथ्यापासून बनवलेल्या वस्तू, बांबूची उत्पादने, सेंद्रिय खाद्यान्न पदार्थ, मसाले, पूरक साधने, गृह सजावटीच्या वस्तू आणि कार्यालयीन फर्निचर यांचा समावेश असलेल्या सामान्य उत्पादन श्रेणी तयार केल्या गेल्या आहेत.
या सहकार्यपूर्ण भागिदारीअंतर्गत, युएन वुमेन प्रशिक्षण साहित्य तयार करून देणार आहे, तसेच जगभरातील सर्वोत्तम कार्यपद्धतींची ओळख करून देईल,यशोगाथा सामायिक करेल आणि महिलांच्या नेतृत्वाअंतर्गत सुरु असलेल्या उद्योग व्यवसायांसाठी मान्यतांचे निकष निश्चित करण्यासाठी मदत करणार आहे.युएन वुमेन द्वारा, वूमनिया – #VocalForLocal अंतर्गतच्या दुकानांच्या प्रचार प्रसाराचे कामही केले जाणार आहे, यासोबतच संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यक्रमात सहभागी असलेल्यांनाही नोंदणी करण्यासाठी पाठबळ पुरवणार आहे. यासोबतच सुक्ष्म-लघू-मध्यम उद्योगांअंतर्गत उद्यम् नोंदणीला प्रोत्साहन देईल, महिला प्रशिक्षकांना संघटित करण्याचेही काम करेल आणि महिला उद्योजकांना सल्लागार तसेच संबंधित संस्थांशी जोडून देण्यासाठी मदत करेल.
त्याचवेळी GeM द्वारा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, सरकारी खरेदीदारांमध्ये याबाबत जाणिवजागृती निर्माण केली जाईल, आणि महिला उद्योजकांनी साध्य केलेले यश ठळकपणे अधोरेखित करण्यासाठीच्या उपाययोजना राबवल्या जातील. याशिवाय GeM द्वारे पोर्टलवर नोंदणी करण्यासाठीच्या मार्गदर्शन कार्यशाळाही आयोजित केल्या जातील, स्थानिक भाषांमधून प्रशिक्षण साहित्य विकसित केले जाईल, आणि उद्योजकता तसेच कामांच्या योग्य संधींसाठी भागीदाऱ्या स्थापित करण्याची जबाबदारीही पार पडली जाईल. याव्यतिरिक्त, उत्पादनांचा विकास, सुधारणा आणि बाजारपेठांकरता सज्जतेसाठी अशा महिला उद्योजकांना पाठबळ पुरवता यावे, या उद्देशाने GeM द्वारे महिला प्रशिक्षकांची नियुक्त केली जाईल, यासोबतच महिला उद्योजकांना शासकीय प्रयोगशाळा तसेच संशोधन आणि विकास संस्थांशी जोडून घेतले जाईल.
लिंगभाव प्रतिसादावर आधारीत खरेदीला चालना देण्याकरता, अत्यंत स्थानिक पातळीवरील बाजारपेठांसोबतच्या जोडणीला बळकटी देणे, आणि यासोबतच शाश्वत विकासाच्या ध्येय उद्दिष्टांअंतर्गतचे लिंगभाव समानता तसेच सर्व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण विषयक ध्येय 5 साध्य करण्यासाठी GeM आणि युएन वुमेन संयुक्तपणे काम करतील.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2192365)
आगंतुक पटल : 34