वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
राष्ट्रीय नियोजन गटाच्या 102 व्या बैठकीत पीएम गतीशक्ती अंतर्गत प्रमुख पायाभूत प्रकल्पांचा आढावा
Posted On:
20 NOV 2025 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर 2025
रस्ते, वाहतूक आणि महामार्गांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय नियोजन गटाची 102 वी बैठक आज पार पडली. या बैठकीत पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर योजनेच्या अनुरुप बहुआयामी संपर्क आणि लॉजिस्टिक कार्यक्षमतेत वाढ करण्यावर केंद्रित करण्यात आले. राष्ट्रीय नियोजन गटाने एकूण 3 प्रकल्पांचे मूल्यमापन केले, ज्यात रस्ते महामार्ग मंत्रालयाचा एक आणि दोन रेल्वे मंत्रालयाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
हे प्रकल्प पीएम गतीशक्तीच्या एकात्मिक बहुआयामी पायाभूत सुविधा, आर्थिक व सामाजिक केंद्रांपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत जोडणी आणि " संपूर्ण सरकार दृष्टिकोन" या तत्त्वांशी सुसंगत आहेत का, याचे परीक्षण करण्यात आले. या उपक्रमांमुळे लॉजिस्टिक कार्यक्षमतेत वाढ, प्रवास वेळेत बचत, आणि प्रकल्प क्षेत्रांमध्ये सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रकल्पांचे थोडक्यात वर्णन:
बिहारच्या पुनारख ते किऊल स्टेशन दरम्यान तिसरी व चौथी रेल्वे मार्गिका:
रेल्वे मंत्रालयाने बिहार राज्यातील पुनारख आणि किऊल स्टेशनदरम्यान सुमारे 49.57 किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या बांधकामाचा प्रस्ताव मांडला आहे. हा विभाग पटना आणि लखीसराय जिल्ह्यातून जातो व राज्यातील औद्योगिक आणि कृषी पट्ट्यातील रेल्वे संरचना बळकट करेल. या कॉरिडॉरला मोठे धोरणात्मक आणि आर्थिक महत्त्व आहे, कारण यामुळे मोठ्या औद्योगिक उपक्रमांना - अल्ट्राटेक सिमेंट प्लांट, (वारसलिगंज), एनटीपीसी बरौनी, एनटीपीसी सुपर थर्मल पॉवर प्लांट (बार्ह), कॅरेज रिपेअर वर्कशॉप (हर्णौत), आणि एसजेव्हीएन पॉवर प्लांट (चौसा) – अधिक कार्यक्षम लॉजिस्टिक आणि रेल्वे सेवा मिळतील. तसेच, फतुहा, पटना–पाटलिपुत्र, मोकामा, बारहिया, आणि लखीसराय या भागांतील लघु आणि मध्यम उद्योगांना देखील फायदा होणार आहे. हा प्रकल्प राज्यातील तसेच देशातील इतर भागांशी वेगवान, सुरक्षित आणि अखंड रेल्वे संपर्क निर्माण करून आर्थिक आणि सामाजिक विकासास गती देईल. याव्यतिरिक्त, हा मार्ग बापू टॉवर, महावीर मंदिर, गांधी संग्रहालय, खुदा बख्श लायब्ररी, कुम्हार पार्क, तक्खत श्री हरमंदिरजी पटना साहिब, गोलघर आणि बिहार संग्रहालय अशा महत्त्वाच्या पर्यटनस्थळांपर्यंत जोडणी सुलभ करेल.
आसामच्या सिलघाट– देकारगाव (तेजपूर) दरम्यान नवीन बीजी लाईन :
रेल्वे मंत्रालयाने आसाम राज्यातील सिलघाट आणि देकारगाव स्टेशनदरम्यान सुमारे 27.50 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गिकेच्या बांधकामाचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावित मार्गाची रचना ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग एनएच-15 आणि एनए-715 च्या परिसरात करण्यात आली आहे, ज्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक प्रणालींमध्ये सुसंवाद निर्माण होईल. हा प्रकल्प बहुआयामी वाहतूक साखळी बळकट करून प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी अखंड प्रवाह सुनिश्चित करेल. प्रस्तावित मार्ग देकारगाव आणि न्यू सिलघाट स्टेशनदरम्यान विद्यमान रेल्वे संरचनेची क्षमता वाढवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. दीर्घकालीन दृष्टीने, हा प्रकल्प आसाम व ईशान्य भारतातील औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन विकासाला चालना देईल. तसेच ईशान्येकडील प्रदेशात वाढत्या जोडणीच्या सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाला बळकटी मिळेल.
रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालय:
महाराष्टात जुना पुणे नाका ते बोरमणी नाका दरम्यान चार मार्गीय उड्डाणपूल
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग एनएच-65 वर सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरमणी नाका दरम्यान सुमारे 9.66 किलोमीटर लांबीच्या चार मार्गीय उड्डाणपूल आणि जोड रस्त्यांच्या बांधकामाचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रकल्प भारतमाला परियोजना (पहिला टप्पा) अंतर्गत आहे आणि त्यामध्ये अप्रोच रॅम्प व सेवा रस्त्यांचा समावेश आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूककोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल, रस्त्यांची सुरक्षितता वाढेल आणि वाहन प्रदुषणात घट होईल. तसेच, या उड्डाणपूलाद्वारे सोलापूरचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन तसेच आर्थिक घडामोडींना चालना मिळेल. ही बैठक उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या लॉजिस्टिक विभागातील संयुक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
गोपाळ चिपलकट्टी/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2192299)
Visitor Counter : 9