वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत वस्त्रोद्योग क्षेत्रातील जागतिक मागणीला भारत सक्षमतेने आणि आत्मविश्वासाने प्रतिसाद देत आहे : राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा


मुंबईत मॅटेक्सिल (MATEXIL) निर्यात पुरस्कार सोहळा, तांत्रिक वस्त्रोद्योग निर्यातीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा विविध श्रेणीअंतर्गत गौरव

Posted On: 19 NOV 2025 11:50PM by PIB Mumbai

मुंबई, 19 नोव्हेंबर 2025

 

आज जगभरातील वस्त्रोद्योगाची मागणी आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचलेली आहे, आणि जग उच्च कार्यक्षम, उपयुक्त आणि शाश्वत साधन सामग्रीकडे वळत आहे. अशावेळी भारतही या बदलांना अधिक सक्षमतेने आणि आत्मविश्वासाने प्रतिसाद देत असल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत MATEXIL ही मानव निर्मित आणि तांत्रिक वस्त्रोद्योग निर्यात प्रोत्साहन परिषदेचा  2023-24 आणि 2024-25 या वर्षांसाठीचा निर्यात पुरस्कार सोहळा झाला. या सोहळ्याला पवित्रा मार्गरेटा यांनी संबोधित केले.

यावेळी राज्यमंत्री मार्गरेटा यांच्या हस्ते तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील निर्यात उत्कृष्टतेसाठीचे पुरस्कार प्रदान केले. या क्षेत्राअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सुमारे 80 जणांचा वविध श्रेणींअंतर्गत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मार्गरेटा यांनी या सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. हा सोहळा केवळ विजेत्यांची दखल घेणारा नाही, तर तर वस्त्रोद्योग क्षेत्राला पुढे घेऊन जाणाऱ्या प्रत्येक कामगार, अभियंता, डिझायनर, उद्योजक आणि निर्यातदाराला सन्मानित करण्याचा हा सोहळा असल्याचे ते म्हणाले. या सगळ्यांच्या कामामुळे देशभरातील लाखो कुटुंबांना बळ मिळते, तसेच देशाचा अभिमानही वाढतो असे त्यांनी सांगितले.

मानव निर्मित फायबर अर्थात तंतू आणि तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्र हे शाश्वत आणि प्रगत साधन सामग्रीच्या बाबतीत जगभरात घडून येत असलेल्या बदलांचा अवलंब करण्यात  आघाडीवर असल्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली. आजमितीला जागतिक तंतू बाजारात मानव निर्मित तंतूचा वाटा जवळपास 70-75% आहे. हे प्रमाण  ग्राहक मागणी आणि त्याच्या औद्योगिक वापराच्या बाबतीत घडून आलेल्या महत्वाच्या बदलांचे द्योतक असल्याचे ते म्हणाले. भारत या बदलांना सक्षमतेने आणि  आत्मविश्वासाने प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताच्या मानव निर्मित तंतू निर्यातीत 2024-25 मध्ये 6.5% वाढ झाली, तर तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या निर्यातीत 15% पेक्षा अधिक वाढ झाली असल्याचे त्यांनी ठळकपणे अधोरेखित केले. या आकडेवारीतून या उदयोन्मुख क्षेत्रातील भारताची वाढती स्पर्धात्मकता दिसून येते असे ते म्हणाले. या उत्पादनाची जागतिक मागणी सातत्याने वाढत आहे, त्यादृष्टीने आता भारत विस्तारत असलेल्या आंतरराष्ट्रीय बाजाराचा मोठा वाटा व्यापण्यासाठी सज्ज असल्याचे ते म्हणाले. भारताच्या उत्पदनांचा दर्जा उच्च प्रतीचा आहे, त्यामुळे एक विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून देशाच्या प्रतिष्ठेलाही अधिक बळकटी मिळत असल्याचे ते म्हणाले.

आता 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या देशाच्या संकल्पाला अनुसरून  आपण एकत्रितपणे, 2030 पर्यंत वस्त्रोद्योग निर्यात 100 अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत नेण्याचा, तसेच एकूण वस्त्रोद्योग बाजारापेठेचा आकार 350 अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. असे ते म्हणाले.

या उद्योग क्षेत्रासमोर असलेल्या अडचणी कमी करण्यासाठी तसेच मूल्य साखळीअंतर्गत उपलब्ध संधींना बळकटी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह व्यावहारिक दृष्टिकोन बाळगून काम करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वस्त्रोद्योग मंत्रालयाने उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना आणि राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान यांसारखे परिवर्तनकारी उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमुळे मूल्य साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर क्षमता वृद्धी घडून येत असल्याचे ते म्हणाले. आपले मंत्रालय वस्त्रोद्योग क्षेत्र विषयक परिसंस्थेतील सर्व भागधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याबाबतही त्यांनी सर्वांना आश्वस्त केले.

आज झालेल्या या द्विवार्षिक पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून या क्षेत्राअंतर्गत 2023-24 आणि 2024-25 या कालावधीतील केलेली दमदार कामगिरी ठळकपणे अधोरेखित झाली. या काळात, भारताच्या तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राने नवोन्मेष, वैविध्यताकरण आणि जगभरात आपल्या अस्तत्वाचा विस्तार करत चांगली प्रगती केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या निर्यात उत्कृष्टतेत दिल्या गेलेल्या अनुकरणीय योगदानाची दखल घेत, या पुरस्कार सोहळ्याअंतर्गत कृषी, वैद्यकीय, औद्योगिक आणि संरक्षणात्मक वस्त्रोद्योग यासह बारा श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या पुरस्कार विजेत्यांमध्ये या उद्योग क्षेत्रातील, गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड, अरविंद लिमिटेड आणि केटी एक्सपोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यासह इतर आघाडीच्या कंपन्यांचा समावेश होता. भारताच्या तांत्रिक वस्त्रोद्योग परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींनाही यावेळी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान  MATEXIL च्या तांत्रिक वस्त्रोद्योग विषयक माहितीसंग्रहाचे (Technical Textiles Dossier) प्रकाशनही केले गेले. यासोबतच भावी पिढीसाठी तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राअंतर्गत निर्यातीची शक्यता आणि क्षमता (Prospects and Potential for Technical Textiles Exports by GenNext) या विषयावरील निमंत्रितांच्या चर्चा सत्राचेही आयोजन केले गेले होते. या चर्चासत्रात  युवा उद्योजक आणि विचारवंत सहभागी झाले होते. या चर्चासत्रात भविष्यातील बाजारपेठांचे कल, शाश्वततेच्या अनुषंगाने असलेल्या गरजा आणि जागतिक पातळीवरील उपलब्ध संधींविषयी चर्चा केली गेली.

या कार्यक्रमाला MATEXIL चे अध्यक्ष शालीन तोशनीवाल, तांत्रिक वस्त्रोद्योग उपसमितीचे निमंत्रक प्रमोद खोसला, संस्थेचे मावळते अध्यक्ष भादरेश डोडिया आणि उपाध्यक्ष अनिल राजवंशी यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमुख भागधारक उपस्थित होते.

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2192059) Visitor Counter : 9