वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-अमेरिका भागीदारी मजबूत आणि स्थिर असून ती धोरणात्मक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये विस्तारत असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन


देशांतर्गत भागधारकांना संरक्षण देण्यासाठी व्यापार विषयक वाटाघाटी निष्पक्ष आणि संतुलित राहणे आवश्यक : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

Posted On: 18 NOV 2025 8:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025

भारत-अमेरिका भागीदारी मजबूत आणि स्थिर असून, ती धोरणात्मक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये सातत्याने विस्तारत असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सला संबोधित करताना सांगितले. भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांबाबत चिंतेचे कोणतेही कारण नसून, दोन्ही देशांमधील मैत्री लोकशाही, विविधता आणि सामायिक विकासात्मक दृष्टिकोनाच्या मजबूत पायावर उभी असल्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

गोयल म्हणाले की अमेरिका भारताकडे एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहते आणि दोन्ही देश परस्परांबरोबरचा व्यापार आणि वाणिज्य विस्तारासाठी वचनबद्ध आहेत. भारत-अमेरिका संबंधांसारख्या सर्वसमावेशक भागीदारीमध्ये अनेक घटक समाविष्ट असून, ते वेगवेगळ्या गतीने प्रगती करतील असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की वाटाघाटी ही एक सतत चालणारी प्रक्रिया असून, भारताला शेतकरी, मच्छीमार, लघु उद्योग आणि व्यवसायांच्या संवेदनशीलतेचा समतोल साधून आपले हित जपायला हवे.

गोयल म्हणाले की, भारताने गेल्या 10-12 वर्षांत "कमकुवत पाच" मधील अर्थव्यवस्थेपासून, ते जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे. भारत, 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रवास करत आहे, असे ते म्हणाले. भारताचा भक्कम आर्थिक पाया रचण्यात मजबूत बँकिंग प्रणाली, कमी चलनवाढ, नियंत्रित वित्तीय तूट, ग्राहकांची वाढती सकारात्मक भावना आणि जीएसटी सुधारणांमुळे पायाभूत सुविधांचा विस्तार, या घटकांचे प्रमुख योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा संदर्भ देत गोयल यांनी भारत ही केवळ एक उदयोन्मुख बाजारपेठ नसून, ती विकासाचे एक उदयोन्मुख मॉडेल आहे, या विधानाचा उल्लेख केला.

गेल्या दशकभरात भारतीय अर्थव्यवस्था दुपटीपेक्षा जास्त  झाल्याचे नमूद करून, गोयल यांनी भारतीय बाजारपेठेचा विस्तार आणि वाढीचा वेग अधोरेखित केला. सध्याच्या विकास दरानुसार, भारताची अर्थव्यवस्था दर आठ वर्षांनी दुप्पट होत असून, 2047 साला पर्यंत 30-35 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, असे ते म्हणाले. भारताची विकासाची क्षमता सुरक्षित राष्ट्र, स्वच्छ प्रशासन, निर्णायक नेतृत्व आणि सातत्यपूर्ण सुधारणांवर अवलंबून आहे, असे गोयल म्हणाले.

जागतिक अस्थिरता आणि आव्हाने असूनही, भारत स्थैर्याचे केंद्र म्हणून अविचल आहे, असे ते  म्हणाले.

ते म्हणाले की, जागतिक व्यवसायांसाठी भारत एक सर्वात मोठी संधी उपलब्ध करून देत आहे, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये नवीन कल्पना, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नवोन्मेशी संशोधनावर अमेरिकन कंपन्यांबरोबर काम करण्यासाठी तयार आहे.

2047 साला पर्यंत समृद्ध भारत घडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत असे नमूद करून, आव्हानांवर मात करण्यासाठी आणि देशाच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सहकार्य आणि सहयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. गोयल म्हणाले की, जेव्हा 1.4 अब्ज भारतीय एकजुटीने आणि विशिष्ट उद्दिष्ट घेऊन एकत्र काम करतात, तेव्हा कोणताही अडथळा पार  होऊ शकतो.


निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2191428) Visitor Counter : 5