वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2047 पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून घडण्यासाठी उत्पादन, कौशल्यनिर्मिती, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान हे भारताच्या दृष्टिकोनाचे चार स्तंभ म्हणून केंद्रीय वाणिज्य तथा उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केले अधोरेखित

Posted On: 18 NOV 2025 7:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025

2047 पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून घडण्यासाठी उत्पादन, कौशल्यनिर्मिती, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान हे चार महत्त्वाचे आयाम असल्याचे केंद्रीय वाणिज्य तथा उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी अधोरेखित केले. ते आज नवी दिल्लीत फिक्की अर्थात भारतीय व्यापार आणि उद्योग महासंघाची 98 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि वार्षिक संमेलनाच्या पूर्वावलोकन कार्यक्रमात बोलत होते. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला येण्याच्या प्रवासातील पहिला महत्त्वपूर्ण आयाम म्हणजे, देशांतर्गत  उत्पादन आणि औद्योगिक केंद्रामध्ये देशाला रुपांतरीत  करण्याची गरज हा आहे. स्पर्धात्मक उत्पादन क्षमतेचा भारताने विस्तार केला पाहिजे आणि देशातच उत्पादित होऊ शकणाऱ्या वस्तूंबाबत स्वयंपूर्णता वाढवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

2000 नंतरच्या 'अमृत-पिढीला' अत्यंत कुशल आणि कामगिरी करून दाखवण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या कार्यबळात रूपांतरित करण्याची गरज, हा दुसरा आयाम होय- असे गोयल म्हणाले. बेरोजगारीपेक्षाही दीर्घ काळापासून भारताला भेडसावणारा प्रश्न म्हणजे निम्न-रोजगार. आणि कार्यबळाला योग्य दिशेने कौशल्यप्रशिक्षण देणे, हाच त्यावरचा तोडगा आहे, असे त्यांनी सांगितले. केवळ कार्यालयीन नोकऱ्यांची आकांक्षा धरण्यापलीकडे आता देशाने विचार केला पाहिजे आणि उद्योगांच्या मापदंडांमध्ये बसतील अशी कौशल्ये असणारे तंत्रकुशल कामगार निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

व्यवसाय-सुलभतेला पाठबळ देणारी गुंतवणूक-स्नेही परिसंस्था उभी करणे, हा तिसरा आयाम असल्याचे मंत्रिमहोदयांनी अधोरेखित केले. व्यापार-व्यवसाय करणे अधिक सुलभ होण्याच्या दृष्टिकोनातून, छोट्या-मोठ्या अडचणी दूर करणे, नियामक अटींचा बोजा कमी करणे, कालबाह्य तरतुदी फौजदारी गुन्ह्यांच्या व्याख्येतून बाहेर काढणे,आणि कालबाह्य कायदे निष्कासित करणे- यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

व्यवसाय-सुलभतेच्या माध्यमातून गुंतवणूक-स्नेही परिसंस्था उभी करणे,नियमने कमी करणे, कायद्यांना फौजदारी गुन्ह्याच्या चौकटीतून बाहेर काढणे, आणि नियामक-अटींचा भार कमी करणे- यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा गोयल यांनी पुनरुच्चार केला.

एक भक्कम गुंतवणूक परिसंस्था रोजगारनिर्मिती करू शकेल, देशात नवे तंत्रज्ञान आणू शकेल, संशोधन आणि नवोन्मेषाला पाठबळ देऊ शकेल आणि संरक्षण आणि सुरक्षेसारख्या प्रगत क्षेत्रांना बळकटी देऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि एका समर्थ ज्ञानाधारित परिसंस्थेचा विकास याभोवती चौथा आयाम केंद्रित आहे, असे गोयल म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग  आणि यंत्र-अध्ययन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा भारताच्या विकास-प्रतिमानात समावेश करून घेण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. स्टार्टअप आणि नवोन्मेष यांना सरकारकडून सातत्याने पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखत केले. नुकताच घोषित झालेला ₹100,000 कोटींचा- संशोधन, विकास आणि नवोन्मेष निधी हे त्याचेच उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रज्ञा आणि नवोन्मेष यांतील भारताचे सामर्थ्य आता जगभरच्या कंपन्यांनी ओळखले आहे आणि त्यामुळे येत्या काळात उगवत्या तंत्रज्ञानांच्या बाबतीत देश नेतृत्व स्थानी राहील  असे प्रतिपादन गोयल यांनी केले.

फिक्कीसमवेत भागीदारी करण्यासाठीचा सरकारचा पाच-कलमी कार्यक्रम गोयल यांनी पुढीलप्रमाणे सांगितला-

FICCI: F - Fiscal discipline (वित्तीय शिस्त), I - Innovation (नवोन्मेष), C -Connectivity & critical infrastructure (संपर्क आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा), C - Commerce (व्यापार), आणि I -Inclusive growth (समावेशी विकास).

फिक्कीने विकासासाठीचे प्रयत्न अधिक व्यापक करावेत, मोठी उद्दिष्टे आखावीत, जगभरच्या उत्कृष्ट कार्यपद्धतींचा अभ्यास करावा, पुढील पिढीच्या नेत्यांना मार्गदर्शन करावे आणि विविध जिल्ह्यांमधील सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगांना आधार द्यावा- जेणेकरून भारताची निर्यात-स्पर्धात्मकता वाढेल असे आवाहन गोयल यांनी केले. 


निलीमा चितळे/जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2191366) Visitor Counter : 6