वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

परवडाणारी आरोग्य सेवा, हे केंद्र सारकारचे सर्वोच्च प्राध्यान, कर शुल्कातील कपात तसेच वस्तू आणि सेवा करातील कपातीचा नागरिकांना फायदा : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल


येत्या काळात भारत परवडणाऱ्या दरातील, उच्च-गुणवत्तेच्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय उपाचरांसाठी सार्थ पर्यटनासाठीचे जगातील आघाडीचे ठिकाण बनेल : पीयूष गोयल

Posted On: 11 NOV 2025 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 नोव्हेंबर 2025

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय उद्योग महासंघाच्या 22 व्या वार्षिक आरोग्य शिखर परिषदेला संबोधित केले. आरोग्यविषयक सेवासुविधा परवडाऱ्या दरात उपलब्ध असायला हव्यात, यावर  केंद्र सरकारने  कायमच भर दिला आहे, असे  त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी आरोग्य सेवा सुविधा तसेच आयुर्विम्यावरील वस्तू आणि सेवा कर 18 टक्क्यांवरून 0 टक्क्यांपर्यंत कमी केल्याचे, तसेच  वैद्यकीय उपकरणे, कर्करोगावरील औषधांसह इतर अनेक अत्यावश्यक औषधांवरील कर शुल्काचीस कपातीचा दाखला दिला. अशा उपाययोजनांमुळे  नागरिकांना अधिक सुलभतेने आणि परवडणाऱ्या दरात उपचार मिळू लागले आहेत असे त्यांनी सांगितले.

अधिकाधिक औषधे किफायतशीर  दरात उपलब्ध व्हावीत यासाठी, अत्यावश्यक औषधे आणि वैद्यकीय उत्पादनांवरील शुल्क तसेच उपकरांमध्ये आणखी कपात करण्याच्या शक्यता तपासण्यासाठी सरकार नेहमीच तयार असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी शुल्क कपात केल्यामुळे अधिकचा लाभ मिळू शकेल, अशा प्रकारची औषधे आणि उत्पादनांची माहिती, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित उद्योग क्षेत्राकडून मिळाली तर त्याचा सरकारला आनंदच होईल असे त्यांनी सांगितले. हे सरकार लोकांचे म्हणने ऐकून घेणारे आहे, हे सरकार अभिप्राय, सूचना आणि कल्पनांचा स्वीकार करण्यासही तयार आहे आणि हे सरकार देशांतर्गत आरोग्यसेवांचा पुरवठा आणि वैद्यकीय उपाचरांसाठी सार्थ पर्यटन, अशा दोन्हींना बळकटी देण्यासाठी भागधारकांसोबत सहकार्याच्या भावनेतून काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी या उद्योगक्षेत्राच्या प्रतिनिधींना दिली.

सरकार, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ  व्यावसायिक आणि आरोग्य सेवेशी संबंधित उद्योग क्षेत्राच्या अशा प्रकारच्या सामूहिक प्रयत्नांमुळे, भारतातील लोकांना अधिक चांगली आरोग्य सेवा पुरवण्यात मदत होईल. यासोबतच देशाला वैद्यकीय उपचार आणि आरोग्यविषयक कल्याणासाठीचे पसंतीचे जागतिक ठिकाण म्हणून स्थान मिळवून देण्यातही असे प्रयत्न कामी येतील ही बाब त्यांनी नमूद केली.

भारतातील आरोग्यसेवेचे स्वरुप हे समावेशक आणि न्याय्य असलायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपण केवळ आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पर्यटनावर लक्ष केंद्रित केले तर, देशातील नागरिक मात्र दर्जेदार आरोग्यसेवेपासून वंचित राहतील अशी भेदभावपूर्ण परिस्थिती  निर्माण होणार नाही याचे भान जपले पाहिजे,  असे आवाहन त्यांनी केले. त्याउलट जर भारताला सार्थ वैद्यकीय प्रवासासाठीचे जागतिक पसंतीचे केंद्र म्हणून स्थान मिळवून द्यायचे असेल तर, त्यासाठी देशांतर्गत मजबूत आरोग्यसेवा व्यवस्था हाच त्याचा पाया असू शकणार आहे याची जाणीवही  त्यांनी उपस्थितांना करून दिली.

यावेळी गोयल यांनी आरोग्य व्यवस्थेबद्दलचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोनही उपस्थितांसमोर मांडला. उत्तम आरोग्य हाच एका समृद्ध समाजाचा पाया असतो, हाच पंतप्रधानांचा दृष्टिकोन  असल्याचे त्यांनी सांगितले. आज भारत 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशा वेळी एक निरोगी आणि उत्पादक राष्ट्र घडवण्याच्या प्रक्रियेत डॉक्टरांसह संपूर्ण वैद्यकीय परिसंस्थेची भूमिका महत्त्वाची असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातील वैद्यकीय समुदायाने कायमच आघाडीवर राहून काम करणे,  समर्पण भावना आणि उत्कृष्टतेची प्रचिती दिली आहे.  मागच्या दशकभरात भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्रात क्षमता आणि गुणवत्ता अशा दोन्हींच्या पातळीवर उल्लेखनीय प्रगती झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी वैद्यकीय पर्यटकांसाठी Visa-on-Arrival आणि E-Visa संबंधी आलेल्या सुचनांचे गोयल यांनी स्वागत केले. भारत अनेक देशांसाठी या या सुविधा याआधीपासूनच देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.  जागतिक लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीच्या तुलनेत भारताची वृद्ध होणारी लोकसंख्या आणि परदेशात वैद्यकीय प्रक्रियांसाठी लागणारा जास्तीचा प्रतीक्षा कालावधी, यामुळे भारताला जागतिक आरोग्य सेवेसाठीचे एक विश्वसार्ह ठिकाण म्हणून ओळख निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण  संधी निर्माण झाली  असल्याचे त्यांनी सांगितले. यादृष्टीने भारतीय उद्योग महासंघाने पायाभूत सुविधा, रुग्णांची निवास व्यवस्था आणि वैद्यकीय पर्यटकांना एकूणात उत्तम अनुभव येईल यासाठीच्या सुधारणा घडवून आणण्यासाठी काय काय केले पाहिजे, याची स्पष्टता देणारा एक कृती कार्यक्रम तयार करावा असे आवाहनही त्यांनी केले.

भारतातील आरोग्य सेवांअंतर्गत, आधुनिक औषधोपचार, आरोग्यविषयक कल्याणाच्या पारंपरिक पद्धती आणि करुणा भावाचा स्पर्ष असलेले रुग्णांची सेवा सुश्रृषा या सगळ्याचा  घडून आलेला मिलाफ, हाच इथल्या आरोग्य सेवांचा खरा लाभ असल्याचे ते म्हणाले. भारताला आरोग्यविषयक कल्याणाचे एक परिपूर्ण ठिकाण म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी Heal in India अर्थात भारतात उपचार घ्या या संकल्पनेत योग, आयुर्वेद, ध्यान धारणा आणि आध्यात्मिक पर्यटनाचाही अंतर्भाव करायला हवा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

 

* * *

सोनाली काकडे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2189003) Visitor Counter : 9