यंदा गोव्यात होणाऱ्या 56 व्या इफ्फी-2025 च्या तयारीसंबंधी पत्रसूचना कार्यालयाच्या प्रधान महासंचालकांचा गोव्यातील प्रसारमाध्यमांचे संपादक आणि माध्यम प्रमुखांशी संवाद
गोवा, 11 नोव्हेंबर 2025
यंदा गोव्यात होणाऱ्या 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी-2025) च्या प्रारंभपूर्व कार्यक्रमाचा भाग म्हणून, पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक श्री धीरेंद्र ओझा तसेच पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी आज दि. 11 नोव्हेंबर रोजी पणजी येथे गोव्यातील प्रमुख प्रसारमाध्यमांचे संपादक आणि माध्यम प्रमुखांशी संवाद साधला.
आगामी 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त माध्यम प्रतिनिधीसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधेसाठीचे नियोजन आणि तयारीच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी या संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. येत्या 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणार असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा दरम्यान प्रसार माध्यमासाठीच्या नियोजित मुख्य उपक्रमांची माहिती या चर्चेदरम्यान दिली गेली.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान विशेषतः पत्रकार परिषदा, महत्त्वाच्या कार्यक्रमांचे वार्तांकन आणि माध्यमांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत, प्रसार माध्यमाना संपूर्ण सहकार्य मिळत राहील यादृष्टीने पत्र सूचना कार्यालयाची व्यापक भूमिका धीरेंद्र ओझा यांनी यावेळी व्यक्त केली. या संपूर्ण महोत्सवा दरम्यान पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने प्रसार माध्यमांना व्यापक सेवासुविधा मिळत राहतील, प्रत्यक्ष मुलाखतींसाठीची सुसज्ज स्टुडिओ, मुख्य कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आणि विविध स्रोतांच्या द्वारे (एलईडी स्क्रीनवर ताजी माहिती, व्हॉट्सॲप समूहावर अद्ययावत सूचना, प्रसिद्धीपत्रके आणि समाज माध्यमांवरील प्रसारित माहिती) वेळेत माहितीचे प्रसारण अशा सेवा सुविधांचा अंतर्भाव असेल असे त्यांनी सांगितले.
7B4W.jpeg)
प्रसार माध्यमानी या संपूर्ण नियोजनात आपले सहकार्य द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2025 चे यश, हे संबंधित सर्व भागधारकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असल्याचेही त्यांनी नमूद केले. या महोत्सवाची जागतिक पातळीवर योग्य दखल घेतली जावी यासाठी, माध्यम जगताचे पाठबळ आणि सहकार्य गरजेचे असल्याची बाबही धीरेंद्र ओझा यांनी अधोरेखित केली. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील माध्यमांचा सहभाग म्हणजे, देशाची सॉफ्ट पॉवरच आहे, याची प्रचिती अवघ्या जगाला यावी, यासाठी पत्र सूचना कार्यालय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र ही प्रक्रिया प्रसार माध्यमानी पुढे वाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपण एकत्रितपणे, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला नवी उंची गाठून देऊ शकतो असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. इफ्फी महोत्सवादरम्यान, पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचीही प्रधान महासंचालकांनी माहिती दिली.
"गेल्या वर्षी प्रथमच, डिजिटल आशय निर्मात्यांना इफ्फीसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची संधी मिळाली, डिजिटल मीडिया क्षेत्रातील त्यांच्या वाढत्या प्रभावाची ही दखल होती. यंदाही हे सुरू राहील. “याव्यतिरिक्त, या वर्षी निवडक माध्यम प्रतिनिधींसाठी फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहयोगाने चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केले आहे. यामुळे माध्यमांची सिनेमाबद्दलची समज समृद्ध होईल,” असे ओझा म्हणाले. समावेशकतेच्या वचनबद्धतेला अनुसरून, पत्र सूचना कार्यालय , यावर्षी देखील स्थानिक कोकणी भाषेत प्रसिद्धी पत्रक उपलब्ध करून देत राहील, जेणेकरून स्थानिक प्रेक्षकांना माहिती मिळेल आणि ते या कार्यक्रमाशी जोडले जातील, असे ते म्हणाले.

स्मिता वत्स शर्मा यांनी जागतिक स्तरावर इफ्फीला प्रेक्षक मिळवून देण्यामधील प्रसार माध्यमांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सांगितले आणि माध्यमांच्या सहभागाला पाठबळ देण्यासाठी पत्र सूचना कार्यालय ज्या विविध साधने-स्रोतांचा आणि प्रणालींचा वापर करणार आहे, त्याबद्दल माहिती दिली. यात रिअल-टाइम अपडेट्स, मल्टीमीडिया रिलीझ आणि समर्पित मीडिया स्पेस यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. संवादाच्या दृष्टिकोनातून महोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी आवश्यक त्या सर्व तरतुदी केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी माध्यमांना दिले.
कार्यक्रमात, प्रश्नोत्तरांचे सत्रदेखील झाले, यावेळी उपस्थितांनी नोंदणी प्रक्रिया, माध्यमांसाठीच्या सुविधा आणि महोत्सवाचे वार्तांकन याबाबत प्रश्न विचारले, तसेच सूचना आणि अभिप्राय दिले.

तत्पूर्वी, पत्र सूचना कार्यालय गोव्याचे संचालक नाना मेश्राम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पत्र सूचना कार्यालय मुंबईचे संचालक सय्यद राबीहश्मी यांनी उपस्थितांचा सहभाग आणि इफ्फी-2025 यशस्वी करण्यासाठीची त्यांची वचनबद्धता, याबद्दल प्रसार माध्यमांचे आभार मानले.
या संवाद सत्राला गोव्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे संपादक उपस्थित होते.
X34F.jpeg)
* * *
पीआयबी पणजी | नाना मेश्राम/सोनाली काकडे/राजश्री आगाशे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
रिलीज़ आईडी:
2188914
| Visitor Counter:
41