कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी मंत्री  शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील 20 हजार शेतकरी बंधू-भगिनींच्या मेळाव्याला केले संबोधित


पंतप्रधान  मोदी यांच्या नेतृत्वाखाली, शेतकऱ्यांना पीक विम्याचा   सर्व पैसा देणार –  चौहान

आवश्यकता भासल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष मदतीचे पॅकेज दिले जाईल -  शिवराज सिंह चौहान

शेतीच्या विकासासाठी, हवामान अनुकूल बियाणे विकसित करून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्‍याची गरज  - शिवराज सिंह चौहान

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बनावट खते, बियाणे आणि कीटकनाशकांविरुद्ध विधेयक आणणार - शिवराज सिंह चौहान

Posted On: 07 NOV 2025 6:12PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री  शिवराज सिंह चौहान यांनी आज महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सिरसाळा गावातील ‘कृषिकुल -ग्लोबल विकास ट्रस्ट’ (जीव्हीटी)   येथे शेतकऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. यावेळी सुमारे 20 हजार शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.

मुख्य मेळाव्याला संबोधित करण्यापूर्वी, केंद्रीय मंत्री चौहान यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी   शेतकऱ्यांनी त्यांचे शेतीसंबंधीचे अनुभव सांगितले आणि विविध नवीन उपक्रमांचा  अवलंब केल्यामुळे  त्यांच्या शेती व्यवसायात  आणि जीवनातही  काही चकित करणारे  बदल कसे  घडून आलेयाची माहिती दिली.  शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना रेशीम शेती, नैसर्गिक शेती आणि जलसंधारणातील नवीन उपक्रमांबद्दल माहिती दिली.

सविस्तर चर्चेनंतर, केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी जीव्‍हीटी च्या कार्याचे कौतुक केले आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे जीवन आणि उत्पन्न बदलण्यासाठी जीव्‍हीटी ने राबवलेल्या नवीन प्रयोगांची माहिती इतर गावे आणि समुदायांपर्यंत पोहोचवली पाहिजे. कृषी मंत्री  चौहान यांनी सांगितले कीशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे अंतिम ध्येय आहे. कोणाही शेतकऱी बांधवाला  आत्महत्या करण्याची वेळ नये, यासाठी आपण वचनबध्‍द आहेत.

यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी 20 हजार  शेतकऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी सांगितले कीशेतकरी हे अन्नदाते आणि जीवनदाते देखील आहेत.  मंत्र्यांनी स्पष्ट केले की, देशात पहिल्यांदाच, "विकसित कृषी संकल्प मोहिमेद्वारे" देशभरातील शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळांमध्ये जाण्याऐवजी, शेतात जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आहे, त्यांना संशोधन आणि आवश्यक माहितीचे फायदे दिले आहेत.

चौहान यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सगळीकडे होणारे अचानक हवामान बदल आणि त्यांचे होणारे  परिणाम याविषयी माहिती मंत्री चौहान यांनी दिली.  त्यांनी सांगितले की, यावर्षी अतिवृष्टीचा पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पिकांचे नुकसान संपूर्ण शेतकऱ्यांच्या कुटुंबावर परिणाम करते, ज्यामुळे त्यांच्या मुलांचे भविष्य धोक्यात येते. तथापि, याबाबत सरकार  सतर्क आहे. केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले कीकेंद्र आणि राज्य सरकार बाधित भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी एकत्रितपणे काम करतील. राज्य सरकार शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देईल. शिवाय, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) निधी अंतर्गत राज्य सरकारला केंद्र सरकारकडून मदत मिळेल. शिवाय, नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विशेष मदत पॅकेजची विनंती केल्यास, सरकार ती गरज पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. केंद्रीय मंत्र्यांनी असेही सांगितले की, पीक विमा योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचा प्रत्येक पैसा मिळेल याची खात्री केली जाईल. आवश्यक असल्यास, शेतकऱ्यांशी चर्चा देखील केली जाईल.

केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीत विमा कंपन्यांसोबत झालेल्या अलिकडच्या आढावा बैठकीचाही उल्लेख केला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून नुकसान भरपाई योग्यरित्या पोहोचेल याची खात्री करण्याचे प्रयत्न केले असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही विसंगती दूर केल्या जातील. राज्य सरकार 'पीक कापणी प्रयोग' द्वारे नुकसानीचे मूल्यांकन करेल आणि त्या आधारे, प्रधानमंत्री किसान पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई दिली जाईल असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांनी गायींवर आधारित आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले, खते, कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा अतिरेकी वापर आपल्या जमिनीचा नाश करत आहे. जमिनीची  उत्पादकता कमी होत आहे. म्हणून, भावी पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, आपण सेंद्रिय शेतीचा विचार केला पाहिजे.

केंद्रीय मंत्र्यांनी बनावट कीटकनाशके आणि खते तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही दिले. त्यांनी सांगितले कीसरकार या प्रकरणाबाबत अत्यंत गंभीर आहे. बनावट खते, बियाणे आणि कीटकनाशके तयार करणाऱ्यांविरुद्ध   येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक विधेयक मांडण्‍यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेवटी, पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतानाशिवराज सिंह चौहान यांनी सर्व शेतकरी बंधू-भगिनींना आणि देशवासियांना "वंदे मातरम्" च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

***

निलिमा चितळे /सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2187659) Visitor Counter : 6