वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एपीईडीए ने छत्तीसगडमधून पापुआ न्यू गिनीला 20 मेट्रिक टन पोषकतत्वे-युक्त तांदळाची निर्यात सुविधा प्रदान केली

Posted On: 05 NOV 2025 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2025

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी व प्रक्रियायुक्त  अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीईडीए) छत्तीसगड राज्यातून 20 मेट्रिक टन पोषकतत्वे-युक्त (फोर्टिफाइड) तांदूळ पापुआ न्यू गिनी ला निर्यात करण्यासाठी सुविधा प्रदान केली.

तांदळाची ही खेप भारताच्या कृषी निर्यात क्षेत्राचा विस्तार करण्याच्या आणि जागतिक बाजारपेठेत उच्च प्रतीचे, पोषकद्रव्यांनी समृद्ध आणि मूल्यवर्धित अन्न उत्पादने पुरवणारा विश्वसनीय देश म्हणून भारताची ओळख अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

छत्तीसगड राज्याने तांदूळ आणि फोर्टिफाइड तांदळाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यामुळे राज्यातील शेतकरी, गिरणी मालक आणि निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय व्यापारात अधिक दृश्यमानता आणि प्रतिष्ठा मिळत आहे. पापुआ न्यू गिनीला फोर्टिफाइड तांदळाची यशस्वी निर्यात ही छत्तीसगडच्या जागतिक पोषण-केंद्रित अन्न पुरवठा साखळीतील वाढत्या योगदानाचे प्रतीक आहे आणि भारताच्या कृषी निर्यात उद्दिष्टांच्या पूर्ततेत राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते.

या प्रसंगी एपीईडीए चे अध्यक्ष अभिषेक देव यांनी रायपूरस्थित एम/एस स्पंज एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि या उपक्रमाशी संबंधित सर्व घटकांचे अभिनंदन केले. त्यांनी नमूद केले की छत्तीसगडमधून फोर्टिफाइड तांदळाची यशस्वी निर्यात ही आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी विज्ञानाधारित, उच्च-गुणवत्तेचे आणि पोषणाभिमुख अन्न समाधान पुरविण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचे उदाहरण आहे. अभिषेक देव यांनी एपीईडीएच्या गुणवत्ता आश्वासन प्रणाली, क्षमता वृद्धी, मूल्यसाखळी विकास आणि धोरणात्मक बाजारपेठ जोडणी याद्वारे निर्यातदारांना सतत सहाय्य करण्याच्या बांधिलकीला दुजोरा दिला.

फोर्टिफाइड तांदूळ तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे तांदळाच्या पिठामध्ये लोह, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी12 सारख्या सूक्ष्म पोषक घटकांचे मिश्रण करून ते नैसर्गिक तांदळासारख्या दाण्यांच्या स्वरूपात तयार करणे आणि त्यानंतर ठरावीक प्रमाणात नियमित तांदळात मिसळणे, यामुळे तांदळाचे पोषणमूल्य वाढते.

भारताकडून फोर्टिफाइड तांदळाची निर्यात ही देशाच्या खाद्य सुदृढीकरण  तंत्रज्ञानातील प्रगत कौशल्याचे दर्शन घडवते आणि जागतिक अन्न व पोषण सुरक्षेप्रती भारताची बांधिलकी पुन्हा अधोरेखित करते.

छत्तीसगडहून पापुआ न्यू गिनीला या तांदळाच्या यशस्वी निर्यातीमुळे भारताच्या कृषी निर्यात क्षेत्राला आणखी एक उल्लेखनीय यश प्राप्त झाले आहे.


सुषमा काणे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2186720) Visitor Counter : 6