कायदा आणि न्याय मंत्रालय
बहरीन आंतरराष्ट्रीय विवाद निराकरण परिषदेत केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल करणार बीजभाषण
भारताच्या सहभागामुळे, मध्यस्थी आणि व्यापारविषयक न्याय सुधारणा या क्षेत्रांत जगाचे नेतृत्व भारताकडे असल्याचे होते अधोरेखित
कायदेविषयक आणि व्यापारविषयक विवाद निराकरण या क्षेत्रांत भारत-बहरीन सहकार्य बळकट करण्यावर भर
Posted On:
04 NOV 2025 12:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2025
किंग्डम ऑफ बहरीन मध्ये 5 आणि 6 नोव्हेंबर 2025 ला भरवल्या जात असलेल्या 'आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक न्यायालयांचे भवितव्य' विषयक परिषदेत आणि किंग हमाद तटस्थ न्याय व्याख्यान संमेलनात केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
किंग्डम ऑफ बहरीनच्या आंतरराष्ट्रीय विवाद निराकरण परिषदेमार्फत हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. बहरीनच्या न्याय, इस्लामी कामकाज आणि देणगी मंत्रालयाच्या' अंतर्गत ती परिषद काम करते. सदर संमेलनात कायदा, मध्यस्थी, आणि न्यायिक सुधारणा या क्षेत्रांतील जागतिक पातळीवरचे तज्ञ एकत्र येत असून, आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक न्यायालयांचे भवितव्य आणि देशापलीकडील न्याययंत्रणा या विषयांवर ते ऊहापोह करणार आहेत.
केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, "बहरीन आणि भारतादरम्यान व्यापारास चालना" या मध्यवर्ती संकल्पनेभोवती बीजभाषण करणार आहेत. 'बहरीन-भारत -: यशस्वी व्यापाराचे मार्ग' नामक विशेष सत्रात त्यांचे हे भाषण होणार आहे. या सत्रात भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश- न्या.सूर्यकांत, CIDR बहरीन चे महासचिव प्रा.मरिके पॉलसन आणि भारतातील वरिष्ठ विधिज्ञ डॉ.पिंकी आनंद यांचाही सहभाग असेल.
भारताच्या व्यापारविषयक विवाद निराकरण चौकटीची क्षमता, विश्वासार्हता आणि जागतिक पातळीवर तिचे एकात्मीकरण उंचावण्याच्या उद्देशाने भारतात केलेल्या प्रागतिक अशा कायदेविषयक आणि संस्थात्मक सुधारणा मंत्रीमहोदय आपल्या भाषणात अधोरेखित करतील, असा अंदाज आहे. बहरीनच्या आंतरराष्ट्रीय विवाद निराकरण परिषदेशी आणि IIAC शी सहयोग साधण्याची भारताची इच्छा त्यांच्या भाषणातून प्रकट होण्याची शक्यता आहे. सर्वोत्तम पद्धतींची देवघेव, व्यावसायिक प्रशिक्षण, आणि परस्परांच्या निवाड्यांना मान्यता देणे- यांद्वारे संस्थात्मक लवाद आणि मध्यस्थी आराखडे बळकट करण्यासाठी हा सहयोग उपयुक्त ठरणार आहे.
व्यापारविषयक न्याय अधिक न्याय्य, तटस्थ आणि देशापलीकडील व्यापारविषयक न्यायनिवाडा अधिक सक्षम व्हावा यासाठी भारताचे जे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु आहेत, त्यांचेच प्रतिबिंब बहरीनच्या परिषदेतील भारताच्या सहभागात दिसून येते.
नेहा कुलकर्णी/जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186595)
Visitor Counter : 8