संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या ऑलिम्पिक अभियान 2036 ला चालना देण्यासाठी भारतीय लष्कराने आयोजित केली लष्करी क्रीडा बैठक 2025

Posted On: 04 NOV 2025 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2025

भारतीय लष्कराने आज नवी दिल्लीत माणेकशॉ सेंटर येथे लष्करी क्रीडा बैठक 2025 चे आयोजन केले. भारताच्या क्रीडा प्रवासातील एका निर्णायक क्षणी घेतलेल्या या बैठकीमुळे, क्रीडाप्रकारातील विजेते घडवण्यासाठी आणि देशाच्या ऑलिम्पिक अभियान 2036 मध्ये योगदान देण्यासाठी लष्कराची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे.

एकात्मिक प्रशिक्षणाचे महासंचालक ले.ज.अजय रामदेव यांनी स्वागतपर भाषणातून पुढच्या चर्चांची दिशा स्पष्ट केली. भारताच्या क्रीडाविषयक महत्त्वाकांक्षा पुढे नेण्यासाठी लष्करी क्रीडा बैठक 2025 हा एक महत्त्वपूर्ण मंच असून, 'येथे झपाटलेपणाला एक उद्दिष्ट मिळते' असे त्यांनी अधोरेखित केले. मिशन ऑलिम्पिक विभागाचे आणि पॅरा-ऍथलीट्सचे त्यांनी कौतुक केले. विज्ञाननिष्ठ, माहितीवर आधारित आणि मानसशास्त्रीय अनुकूलन करणाऱ्या प्रशिक्षणाकडे आता भारताचे क्रीडाक्षेत्र वळत आहे, यावर त्यांनी भर दिला. जागतिक क्रीडाक्षेत्रात देशाचे स्थान उंचावण्याकरिता भारताच्या ऑलिम्पिक अभियान 2036 साठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या क्रीडासचिव हरी रंजन राव यांनी बीजभाषण केले. जागतिक पातळीवर नावाजले जातील असे ऍथलीट्स घडवण्यामध्ये तसेच, देशाच्या अभिमानाचे प्रतीक अशा दिव्यांग खेळाडू आणि साहसी खेळाडूंना पुढे नेण्यामध्ये भारतीय लष्कराच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. सरकारचे TOPS सारखे उपक्रम, खेलो इंडिया केंद्रे, आणि क्रीडा-विज्ञान एकात्मीकरण आदी प्रयत्न अधोरेखित करत त्यांनी, 2036 मध्ये भारताच्या ऑलिम्पिक आकांक्षा पूर्ण होण्यासाठी, सर्व भागधारकांकडून समन्वित प्रयत्न होण्यावर भर दिला. यासाठी दूरगामी नियोजन, समावेशन आणि वैज्ञानिक उत्कृष्टता आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

लष्कर उपप्रमुख (माहिती प्रणाली आणि प्रशिक्षण) ले.ज.राकेश कपूर यांनी त्यांच्या भाषणात, भारतीय लष्कर आणि क्रीडा यांच्यातील दृढ बंध अधोरेखित केला. सुदृढता, शिस्त आणि सांघिक कार्य यांमध्ये या बंधाचे मूळ दडलेले आहे, असे त्यांनी सांगितले. लष्कराच्या प्रमुख क्रीडा उपक्रमांचे सारांशाने वर्णन करतानाच त्यांनी, उत्कृष्टता टिकवण्यासाठी विज्ञाननिष्ठ आणि माहितीवर आधारित प्रशिक्षण देण्याची गरज व्यक्त केली. लष्कर, भारतीय क्रीडा प्राधिकरण, खासगी क्षेत्र आणि शिक्षणक्षेत्र यांनी समन्वय साधून काम करावे आणि भारताच्या ऑलिम्पिक अभियान 2036 साठी सर्वांनी मिळून दृढनिश्चय करावा असे आवाहन त्यांनी केले. 

'संस्थात्मक समन्वय' आणि 'ऍथलीट 360’ या दोन मध्यवर्ती संकल्पनांभोवती ही बैठक गुंफली होती. यातून सर्व भागधारकांमध्ये सहयोग आणि समन्वय साधला जाण्यावर आणि समग्र ऍथलेट विकासासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला गेला. 'राष्ट्रीय क्रीडा धोरणे, संस्थात्मक रचना आणि तंत्रज्ञानातील नवोन्मेष एका दिशेने आणून, त्यांच्या मदतीने ऑलिम्पिकमध्ये दीर्घकाळ टिकणारे यश संपादन करता येईल', या आशयाच्या चर्चा या दोन सत्रांमध्ये झाल्या.

या बैठकीचाच एक भाग म्हणून, भारतीय क्रीडाक्षेत्राला दिलेल्या भरीव योगदानाबद्दल, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते लष्करी क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देऊन तीन यशस्वी ऍथलेट्सचा सत्कार करण्यात आला.

कर्नल बलबीर सिंग कुल्लर (निवृत्त)- ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते, हॉकी (1968)

मुरलीकांत पेटकर, पॅरालिम्पिक सुवर्णपदकविजेते, (1972)

मानद कॅप्टन विजयकुमार शर्मा, ऑलिम्पिक रौप्यपदकविजेते, नेमबाजी (2012)

धैर्य, समर्पण आणि क्रीडा उत्कृष्टतेच्या या दीपस्तंभांना साउथ ब्लॉक मधील या सत्कार समारंभाद्वारे गौरवान्वित करण्यात आले. त्यांच्या जीवनप्रवासातून सर्व्हिस बिफोर सेल्फ' (स्वतःपूर्वी सेवा) हे भारतीय लष्कराचे ब्रीदवाक्यच मूर्तिमंत साकारलेले दिसून येते.

शैलेश पाटील/जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2186464) Visitor Counter : 11