नौवहन मंत्रालय
इंडिया मेरीटाईम वीक 2025: मानवी भांडवलावरील सत्रात आधुनिक सागरी मनुष्यबळ निर्माण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर भर
कौशल्य, कौशल्य सुधारणा आणि पुनर्कौशल्य भारताच्या सागरी मनुष्यबळाचे भविष्य निश्चित करेल: डॉ. मनसुख मांडवीय
प्रविष्टि तिथि:
31 OCT 2025 9:55PM by PIB Mumbai
मुंबई, 31 ऑक्टोबर 2025
इंडिया मेरीटाईम वीक 2025 चा एक भाग म्हणून, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने 30 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड च्या सहयोगाने "सागरी मानवी भांडवल" या विषयावर एक प्रभावपूर्ण सत्र आयोजित केले होते.
जागतिक स्तरावर एक आघाडीचे सागरी राष्ट्र म्हणून उदयाला येण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून, भविष्यासाठी सज्ज सागरी मनुष्यबळ विकसित करण्यावर या सत्रात भर देण्यात आला. भारताच्या सागरी क्षेत्रातील विकासाच्या पुढील टप्प्यात प्रतिभा, तंत्रज्ञान आणि परिवर्तन हे घटक चालना देतील, असे या चर्चेत अधोरेखित करण्यात आले.

केंद्रीय श्रम आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय या सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. सुनील पालीवाल, आयएएस, अध्यक्ष, भारतीय बंदर संघटना, श्याम जगन्नाथन, आयएएस, नौवहन महासंचालक, आणि शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बी.के. त्यागी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग जगतातील धुरीण, सागरी व्यावसायिक आणि तरुण छात्रसैनिकांचा सहभाग होता. ग्रँट थॉर्नटन भारत एलएलपी यांनी या सत्रासाठी नॉलेज पार्टनर म्हणून भागीदारी केली.
डॉ. मनसुख मांडवीय यांनी आपल्या बीज भाषणात भारताच्या सागरी परिवर्तनाच्या केंद्रस्थानी मानवी भांडवल आहे यावर भर दिला. जागतिक मानकांची पूर्तता करण्यासाठी सागरी मनुष्यबळाचे कौशल्य, कौशल्य सुधारणा आणि पुनर्कौशल्य, यावर सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या समृद्ध सागरी वारशाचा उल्लेख करून ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, देश ‘भविष्यातील विकास आणि प्रगतीसाठी आपल्या गहन सागरी वारशाचा उपयोग करत आहे." राष्ट्रीय सागरी वारसा संकुल भारताच्या सागरी इतिहासाचा उत्सव साजरा करणारा जागतिक दर्जाचा अनुभव देणारे केंद्र म्हणून काम करेल, अशी घोषणा त्यांनी केली.
सहभागींचे स्वागत करताना, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बी. के. त्यागी यांनी सागरी उद्योगाला सरकार देत असलेल्या सातत्यपूर्ण आणि दृढ पाठबळाचा उल्लेख केला. त्यांनी चार-स्तंभीय धोरणात्मक दृष्टिकोन, 70,000 कोटी रुपयांचे मंत्रिमंडळाने मंजूर केलेले पॅकेज आणि इंडिया मेरीटाईम वीक दरम्यान जाहीर केलेल्या अनेक नवीन उपक्रमांबाबत माहिती दिली. "सागरी क्षेत्रासाठी अमृत काळ सुरू झाला आहे", ज्यामुळे उद्योग क्षेत्र आणि मानवी भांडवल या दोघांसाठीही अफाट संधींचे दरवाजे खुले झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

नौवहन संचालनालयाचे महासंचालक श्याम जगन्नाथन, (आयएएस) यांनी भारतातील सागरी मानवी भांडवलाचे बदलते स्वरूप आणि जागतिक खलाशांमधील भारताच्या वाढत्या प्रमाणावर भाष्य केले. नाविकांच्या कल्याणासाठी, डिजिटल परिवर्तनासाठी आणि प्रशासन सुधारणांवर लक्ष केंद्रित केलेले उपक्रम राबवण्यासाठी संचालनालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला संबोधित करताना, इंडियन पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पालीवाल, (आयएएस) यांनी हे सत्र आयोजित केल्याबद्दल शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि डीजीएस यांचे कौतुक केले. ‘सागरी अमृत काळ दृष्टिकोन 2047’ ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मानवी भांडवल ही सर्वात महत्त्वाची शक्ती ठरेल यावर त्यांनी भर दिला. भारताच्या सागरी आकांक्षा साध्य करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच मानवी संसाधनांची उभारणी देखील तितकीच आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
या सत्रादरम्यान, मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सागरी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नामांकित व्यावसायिकांचा सन्मान केला :
- कॅप्टन जे. सी. आनंद, संस्थापक, इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग
- मुख्य अभियंता अधिकारी सुनीती बाला, भारतातील पहिल्या महिला अतिरिक्त प्रथम श्रेणी मुख्य अभियंता
- पायलट रेश्मा निलोफर विशालाक्षी, भारताच्या पहिल्या महिला मरीन पायलट
- मरीन इंजिनिअर सोनाली बॅनर्जी, मुख्य अभियंता म्हणून परवानाप्राप्त पहिल्या भारतीय महिला मरीन इंजिनिअर
- नौदल आर्किटेक्ट पार्वती राजलक्ष्मी, भारताच्या पहिल्या महिला नौदल संरचनाकार
डॉ. मांडविया यांनी 2030 पर्यंत जागतिक समुद्री वाहतुकीत भारताचा वाटा 12% वरून 20% पर्यंत वाढवण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाचा पुनरुच्चार केला. भारताच्या लोकसंख्येपैकी 35% लोक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. या युवाशक्तीचा नवोन्मेष आणि उद्योगशीलतेमुळे भारत 2047 पर्यंतच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या स्वप्नपूर्तीकडे निश्चयाने वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले.

* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2184969)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English