युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
“पोलादी इच्छाशक्ती, अखंड भारत”, सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रक्षा निखिल खडसे यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर आणि भुसावळमध्ये भव्य एकता यात्रांचे आयोजन
Posted On:
31 OCT 2025 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2025
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आणि जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे भव्य 'एकता यात्रा' आयोजित करण्यात आल्या होत्या. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत मंचाने सुरू केलेल्या देशव्यापी सरदार @150 मोहिमेअंतर्गत आयोजित केलेल्या या पदयात्रांमध्ये युवक, विद्यार्थी आणि स्वयंसेवकांचा प्रचंड सहभाग दिसून आला, आणि राष्ट्रीय एकता आणि सळसळत्या नागरी भावनेचा उत्सव साजरा झाला.

मलकापूर येथे उत्साही जनसमुदायाला संबोधित करताना खडसे यांनी सरदार पटेल यांच्या चिरस्थायी वारशाचे स्मरण केले. त्या म्हणाल्या, “आज आपल्याला ज्या भारताचा अभिमान आहे, तो एकसंध, मजबूत आणि वैविध्यपूर्ण असून, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 560 हून अधिक संस्थानांना एका राष्ट्रात सामावून घेण्याचा अतुलनीय संकल्प आणि दूरदृष्टीचे फलित आहे.
ही पदयात्रा केवळ प्रतीकात्मक नाही, तर ती ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या आपल्या सामूहिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाचे मार्गदर्शन असलेली ही चळवळ, तरुणांना राष्ट्र उभारणीच्या केंद्रस्थानी ठेवून जनभागीदारी आणि विकसित भारताच्या भावनेला बळकटी देते.”
या कार्यक्रमाचा पहिला टप्पा मलकापूरमध्ये पार पडला, ज्यामध्ये स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये विधान परिषदेचे सदस्य एकनाथ खडसे; मलकापूरचे आमदार चैनसुख मदनलाल संचेती; डॉ. अरविंद कोलते, डॉ. अनिल खर्चे, डॉ. सुधीर चव्हाण, जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर; रामराव झांबरे, ज्ञानदेव वाघोडे आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.

दुपारच्या सत्रात, रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ एकता मार्चचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये नागरिकांनी हिरीरीने भाग घेतला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते. इतर उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांचा समावेश होता.
“माय भारत” उपक्रम युवक केंद्रित परिवर्तनाचे खरे आंदोलन बनत आहे, जे देशभरातील लाखो तरुणांना भारताचा विकास प्रवासाशी जोडत आहे, यावर रक्षा खडसे यांनी याप्रसंगी बोलताना भर दिला. एकता यात्रेचे आदर्श तळागाळातील तरुणांनी सेवा, नवोन्मेष आणि नेतृत्वाद्वारे दैनंदिन कृतीत रूपांतरित केले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले.
मलकापूर आणि भुसावळ येथील एकता मार्च हे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सुरू केलेल्या सरदार@150 राष्ट्रीय अभियानाचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरले. या अभियानाचा उद्देश देशात एकता अखंडता आणि राष्ट्र निर्माण यासाठी सामूहिक सहभागाची भावना जागृत करणे आहे, जी भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल.

* * *
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2184948)
Visitor Counter : 6