युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी क्रीडा पर्यटन आणि फिट इंडिया चळवळीला चालना देण्यात 'पुणे ग्रँड टूर 2026' ची भूमिका केली अधोरेखित


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुणे ग्रँड टूर 2026' च्या लोगो आणि जर्सीचे अनावरण

प्रविष्टि तिथि: 29 OCT 2025 8:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑक्‍टोबर 2025

 

भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय यूसीआय  2.2 स्टेज सायकलिंग रेस असलेल्या ऐतिहासिक 'बजाज पुणे ग्रँड टूर 2026' च्या लोगो आणि जर्सीचे आज पुण्यातील द वेस्टइन हॉटेल येथे अधिकृतपणे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र सरकार, पुणे जिल्हा प्रशासन आणि भारतीय सायकलिंग महासंघ  यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा कार्यक्रम शहराच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि क्रीडा वारशाचा उत्सव साजरा करतो.

याप्रसंगी आपल्या भाषणात, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे म्हणाल्या की, हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2036 मध्ये ऑलिंपिक स्पर्धांचे यजमानपद भूषवण्याच्या  दृष्टिकोनाशी सुसंगत आहे आणि क्रीडा-प्रणित  विकास आणि क्रीडा पर्यटनाप्रति  देशाची वाढती वचनबद्धता यातून प्रतिबिंबित होते.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून, सुमारे 5 लाख सायकलस्वारांच्या सहभागासह दर आठवड्याला 5,000 हून अधिक ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘संडेज ऑन सायकल’  सारख्या उपक्रमांमुळे ‘फिट इंडिया’ चे देशव्यापी लोकचळवळीत रूपांतर होत आहे,” असे त्या म्हणाल्या.

देशभरात 'संडेज ऑन सायकल' चळवळीचे नेतृत्व आणि विस्तार करण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केलेल्या प्रयत्नांचे  खडसे यांनी कौतुक केले. ही चळवळ  सर्व स्तरातील लोकांना  तंदुरुस्ती, शाश्वतता आणि समुदायामध्ये बंध निर्माण करण्याचा  मार्ग म्हणून सायकलिंगचा अवलंब करण्यास प्रेरित करते.

"पुणे ग्रँड टूर 2026 या  खेळाद्वारे पर्यटन आणि निरामयता दोन्हीला कशी चालना मिळू शकते याचे एक आदर्श उदाहरण आहे. क्रीडा विज्ञान देखील खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून उदयास येत आहे आणि अशा कार्यक्रमांमुळे आपली क्रीडा परिसंस्था आणखी मजबूत होईल," असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे ग्रँड टूर पुण्याच्या प्रमुख ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांना उजाळा देईल, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देतानाच "सायकलींचे शहर" म्हणून शहराची पारंपरिक ओळख पुनरुज्जीवित करेल. हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावेल, निरोगी जीवनशैलीला  चालना देईल आणि प्रदूषणाचा सामना करण्यास मदत करेल असे ते म्हणाले.

पुणे हे नेहमीच सायकलचे माहेरघर राहिले आहे आणि या उपक्रमामुळे तो वारसा आणखी दृढ होईल. 'पुणे ग्रँड टूर' मुळे पुणे शहराला व्यावसायिक सायकलिंगच्या जागतिक नकाशावर स्थान मिळेल, तसेच संपूर्ण भारतात आरोग्य आणि पर्यावरण जागरूकता निर्माण होईल,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. “सह्याद्री पर्वतरांगांमधील 200 हून अधिक गावांचा समावेश असलेले हे भव्य आव्हान ‘टूर डी फ्रान्स’पासून प्रेरित आहे. "ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नाही तर आरोग्य, रोजगार, पर्यटन आणि विकासाचा उत्सव आहे," असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या नेतृत्वाखालील पुणे जिल्हा प्रशासनाने विक्रमी वेळेत या उपक्रमाची संकल्पना आखली आणि ती राबवली याबद्दल अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले. शर्यतीच्या मार्गावर जागतिक दर्जाच्या रस्ते पायाभूत सुविधा सुनिश्चित करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

या कार्यक्रमात शहर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आशियाई सायकलिंग कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष दातो अमरजित सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस दातो मनिंदर पाल सिंग आणि आशियाई सायकलिंग कॉन्फेडरेशनचे माजी सरचिटणीस ओंकार सिंग हे देखील उपस्थित होते.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंदवार यांनी या उपक्रमाची संकल्पना आणि सविस्तर तयारी याबाबत माहिती सादर केली.

लोगो, जर्सी आणि शुभंकरचे अनावरण

मान्यवरांनी पुणे ग्रँड टूर 2026 चा अधिकृत लोगो आणि जर्सीचे अनावरण केले. या स्पर्धेचा शुभंकर ‘इंदू’ नावाच्या भीमाशंकरच्या जंगलात आढळणारी लुप्तप्राय भारतीय विशाल खारीपासून प्रेरित आहे. हा प्राणी चपळता, चिकाटी आणि पर्यावरणीय संतुलनाचे प्रतीक आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी 77 वर्षीय ज्येष्ठ सायकलपटू निरुपमा भावे यांचा सत्कारही केला. तसेच प्रीती म्हस्के, प्रणिती सोमण (अहमदनगर), भारत सोनवणे (छत्रपती संभाजीनगर), आकाश म्हेत्रे (जळगाव) आणि पूजा दानोळे (सोलापूर) या सायकलपटूंचा त्यांच्या कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.

‘पुणे ग्रँड टूर 2026’ हा उपक्रम बजाज यांच्या सहकार्याने आयोजित केला जात असून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, चितळे बंधू आणि पंचशील ग्रुप यांचे पाठबळही लाभले आहे.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2183979) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी