संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'INS सतलज'ने मॉरिशसमध्ये जलमापन सर्वेक्षण मोहीम केली पूर्ण

Posted On: 26 OCT 2025 9:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑक्‍टोबर 2025

 

भारतीय नौदलाच्या 'आय.एन.एस. सतलज' या युद्धनौकेने मॉरिशसच्या जलमापन सर्वेक्षण सेवेसोबत संयुक्तपणे आयोजित केलेली जलमापन सर्वेक्षण मोहीम यशस्वीरित्या फत्ते केली आहे. या मोहिमेत सुमारे 35,000 चौरस सागरी मैल इतक्या मोठ्या क्षेत्राचा समावेश होता. भारत आणि मॉरिशस यांच्यातील सध्याच्या सामंजस्य कराराअंतर्गत राष्ट्रीय संस्थांच्या घनिष्ट सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात आले.

हा उपक्रम, सागरी नकाशे तयार करणे, किनारी नियमन, साधनसंपत्ती व्यवस्थापन आणि दीर्घकालीन पर्यावरणीय नियोजनामध्ये मोठे योगदान देईल. परिणामी, मॉरिशसच्या 'ब्ल्यू इकॉनॉमी' अर्थात नील अर्थव्यवस्था विषयक उद्दिष्टांना पाठबळ मिळेल. या मोहिमेच्या क्षमता-उभारणी प्रयत्नांचा भाग म्हणून, मॉरिशसच्या विविध मंत्रालयातील सहा कर्मचाऱ्यांनी 'आय.एन.एस. सतलज'वर अत्याधुनिक जलमापन सर्वेक्षण तंत्रांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले.

   

याव्यतिरिक्त, 'आय.एन.एस. सतलज'ने मॉरिशस राष्ट्रीय तटरक्षक दलासोबत, प्रादेशिक सागरी सुरक्षा अधिक बळकट करणारी संयुक्त विशेष आर्थिक क्षेत्र  पाळत  आणि समुद्री चाचेगिरी विरोधी गस्तही पार पाडली.

जहाजावर आयोजित एका समारंभात, मॉरिशसचे गृहनिर्माण आणि भूमी मंत्री शकील अहमद युसूफ अब्दुल रझाक मोहम्मद आणि मॉरिशसमधील भारताचे उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत, पूर्ण झालेल्या सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल (Fairsheet) मॉरिशसच्या अधिकाऱ्यांकडे औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आला.

हे नियोजन, भारत आणि मॉरिशस यांच्यातील 18 वी संयुक्त जलमापन सर्वेक्षण मोहीम आहे. ही मोहीम म्हणजे, दोन्ही देशांमधील चिरस्थायी सागरी भागीदारी, सुरक्षित नौवहन, शाश्वत महासागर व्यवस्थापन आणि प्रादेशिक सहकार्यासाठी असलेल्या सामायिक वचनबद्धतेचा दाखला आहे. या मोहिमेच्या यशस्वी समारोपामुळे, 'MAHASAGAR' (Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across the Regions) अर्थात प्रदेशांची सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती, या संकल्पावर बेतलेले, दोन्ही राष्ट्रांमधील खोलवर रुजलेले मैत्रीचे संबंध पुन्हा एकदा दृढ झाले आहेत.

 

* * *

सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2182722) Visitor Counter : 10