संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नौदल कमांडर्स कॉन्फरन्स 2025 (CC 2025/2) या परिषदेच्या दुसऱ्या सत्राचा समारोप


माननीय संरक्षणमंत्र्यांनी भारतीय नौदलाच्या उच्च दर्जाच्या कार्यतत्परतेची आणि सक्षम प्रतिबंधात्मक भूमिकेची केली प्रशंसा

प्रविष्टि तिथि: 25 OCT 2025 5:37PM by PIB Mumbai

 

द्वैवार्षिक नौदल कमांडर्स कॉन्फरन्स 2025 या परिषदेचे  दुसरे सत्र, 22 ते 24 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नवी दिल्लीत नौसेना भवन येथे पार पडले. तीन दिवस चाललेल्या या उच्चस्तरीय परिषदेने कार्यतत्परता, सागरी सुरक्षा, क्षमता विकास आणि त्रिसेवा एकात्मता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी, नौदल कमांडर्सना एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

परिषदेचा प्रारंभ नौदल प्रमुखांच्या उद्घाटनपर भाषणाने झाला. सतत बदलत असलेल्या भौगोलिक-राजकीय परिस्थितीचा उल्लेख करताना नौदल प्रमुखांनी तयारी, अनुकूलता आणि प्रादेशिक सहभाग यांच्या माध्यमातून राष्ट्रीय सागरी हितसंबंधांच्या सुरक्षेमध्ये भारतीय नौदलाची भूमिका अधोरेखित केली. नौदल हे एक युद्धसज्ज, विश्वासार्ह, एकसंध आणि भविष्यसज्ज दलअसल्याचा पुनरुच्चार करत, त्यांनी अलीकडील परिचालनात्मक तैनाती, क्षमता वृद्धी आणि संयुक्त मोहिमांची प्रशंसा केली. नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा समावेश आणि संरक्षण सर्वोत्कृष्टतेसाठीचे नवोन्मेष (इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स-iDEX) अशा उपक्रमांच्या माध्यमातून, 2047 सालापर्यंत पूर्णपणे स्वावलंबी (आत्मनिर्भर) नौदल घडवण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीवर देखील त्यांनी विशेष भर दिला.

माननीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 23 ऑक्टोबर 2025 रोजी नौदल कमांडर्सशी संवाद साधत, त्यांना संबोधित केले. त्यांनी राष्ट्रीय हितसंबंधांच्या सुरक्षेत भारतीय नौदल बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची पोचपावती दिली आणि त्यांची उच्च दर्जाची कार्यतत्परता आणि सक्षम प्रतिबंधात्मक भूमिकेची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की हिंद महासागर क्षेत्रातील भारतीय नौदलाची उपस्थिती मित्र राष्ट्रांसाठी आश्वासक ठरते, मात्र या क्षेत्रात अस्थिरता निर्माण करणाऱ्यांची झोप उडवणारी आहे. आत्मनिर्भर नौदल हा आत्मविश्वासपूर्ण आणि सामर्थ्यशाली राष्ट्राचा पाया आहे, आणि भारतीय नौदलाने स्वदेशी लष्करी साधनसामुग्रीच्या  माध्यमातून आपली क्षमता वाढवून आत्मनिर्भरतेचा ध्वजवाहक म्हणून आपली भूमिका सिध्द केली आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. शत्रूवर कुरघोडी करण्यासाठी, युक्त्या-प्रयुक्त्या  आणि तंत्रज्ञानाचा  उपयोग करण्याची आवश्यकता त्यांनी नमूद केली. आधुनिक युद्धात मानवरहीत किंवा स्वयंचलित काम करणाऱ्या उपकरणांचे विशेष महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केले. (https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2181897).

संरक्षणदल प्रमुख (सी डी एस- चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ) , वायू दल प्रमुख आणि मंत्रीमंडळ सचिव यांनीही नौदल कमांडर्सशी संवाद साधला. सी डी एस नी आपल्या संबोधनात एकात्मता, संयुक्त कार्यप्रणाली आणि साधनसंपत्तीचा सर्वोत्तम उपयोग यांचे महत्त्व अधोरेखित केले.

परिषदेदरम्यान नौदलाच्या पाच पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये, रेगुलेशन्स फॉर नेव्हल आर्मामेंट सर्विस (नौदल आयुध सेवा नियमावली), जी ई एम हॅन्डबुक (शासनाची ई-मार्केटप्लेस मार्गदर्शक पुस्तिका) आणि फॉरेन कोऑपरेशन रोडमॅप (परदेशी सहकार्य मार्गचित्र) यांचा समावेश होता. त्याचबरोबर, एकात्मिक ज्ञानासाठी नौदलाचे बौद्धिक पोर्टल (‘NIPUN’-Naval Intellectual Portal for Unified Knowledge) या, संपूर्ण सेवा आणि माहिती एका ठिकाणी मिळवता येणाऱ्या ऑनलाइन वन-स्टॉप सोल्यूशन पोर्टलचे उद्घाटन झाले. हे पोर्टल, विविध क्षेत्रातील नौदल समुदायांच्या बौद्धिक कार्याचे ऑनलाइन संकलक म्हणून काम करेल.

या परिषदेच्या पार्श्वभूमीवर, 22 ऑक्टोबर रोजी आयोजित सागर मंथनकार्यक्रमाने नौदल कमांडर्स, तज्ज्ञ आणि विचारवंत यांना एकत्र आणून समकालीन विषयांवर सविस्तर चर्चा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली.

***

माधुरी पांगे / आशुतोष सावे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2182504) आगंतुक पटल : 34
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil