विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
आरोग्य सेवा क्षेत्राने सरकारी निधीवरील अतिरिक्त अवलंबित्व दूर ठेवावे आणि समन्वित आरोग्यसेवेसाठी खासगी क्षेत्राच्या व्यापक सहभागाच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे आवाहन
भारताने आत्मनिर्भर संशोधन परिसंस्थेच्या दिशेने वाटचाल करायला हवी: डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
24 OCT 2025 5:17PM by PIB Mumbai
आरोग्य सेवा क्षेत्राने सरकारी निधीवरील अतिरिक्त अवलंबित्व दूर राहावे, आणि आरोग्यसेवा संशोधनात जागतिक मापदंड प्रस्थापित करण्यासाठी समन्वित आरोग्यसेवा, परोपकार आणि सहकार्यासाठी खासगी क्षेत्राच्या व्यापक सहभागाच्या संस्कृतीला प्रोत्साहन द्यायला हवे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. ते आज जे एन टाटा सभागृहात, "ट्रीट-डीएम 2025- ट्रान्सलेशनल रिसर्च, अॅडिपोसोपॅथी, टेक्नॉलॉजी फॉर डायबिटीज अँड मेटाबॉलिक डिसीजेस" या विषयावरील मधुमेह परिषदेचे दृकश्राव्य माध्यमातून उद्घाटन करताना बोलत होते.
आता विकेंद्रितपणे काम करण्याचा काळ संपला असून, शिक्षण, संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील एकात्मता, हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे, यावर डॉ. जितेंद्र सिंह यांनी भर दिला. “सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातली सीमा आता पुसट होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सुधारणांमुळे, भारताने आपले अवकाश, अणुऊर्जा आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्र व्यापक सहभागासाठी खुले केले असून, त्याचे ऐतिहासिक परिणाम दिसून येत आहेत,” असे ते म्हणाले. अलिकडच्या काळात झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, भारताने हिमोफिलियासाठी प्रथमच स्वदेशी जीन-थेरपी चाचणी यशस्वीपणे केली आहे. त्यांनी लस संशोधन आणि निर्यातीत भारताने मिळवलेल्या यशाचा उल्लेख केला. जैव-उत्पादनात भारताच्या वाढत्या भूमिकेकडे लक्ष वेधत केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारत आता हिंद प्रशांत प्रदेशात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि जागतिक स्तरावर बाराव्या क्रमांकावर आहे. तिरुवनंतपुरम येथील श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी यासारख्या संस्थांमध्ये विकसित केलेली उपकरणे निर्यात केली जात असून, यामधून स्वदेशी संशोधन आणि विकासाचे यश दिसून येते.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, त्यांनी संशोधकांना त्यांच्या प्रयत्नांना विकसित भारत@2047 या दृष्टीकोनाशी जोडण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारताचा विकास हा नवोन्मेष, स्वावलंबन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने प्रेरित असेल.

*****
सुषमा काणे / राजश्री आगाशे / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2182339)
Visitor Counter : 8