दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे दूरसंवाद क्षेत्र नवी उंची गाठत आहे:- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
बीएसएनएल 18 वर्षांनंतर नफ्यामध्ये, स्वदेशी 4G स्टॅकमुळे भारत बनला स्वतःचे दूरसंवाद तंत्रज्ञान विकसित करणारा जगातील पाचवा देश
प्रविष्टि तिथि:
17 OCT 2025 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2025
केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज दूरसंवाद विभाग आणि टपाल विभागासह दूरसंवाद मंत्रालयाच्या विविध विभागांच्या कामगिरीसंबंधी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला.

भारत आता दूरसंवाद क्षेत्रात केवळ अनुकरण करणारा देश राहिला नसल्याची बाब त्यांनी या पत्रकार परिषदेत अधोरेखित केली. दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित सेवा आणि उत्पादने या दोन्ही बाबतीत भारत आता नेतृत्व करणारा देश बनला असल्याचे ते म्हणाले.
देशभरातील ग्राहकांची संख्या आणि ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे अनेक पटीने विस्तारले असल्याचे त्यांनी सांगितले. इंटरनेट जोडणीच्या बाबतीतही लक्षणीय वाढ झाली असून, ब्रॉडबँड जोडणी देखील मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले.
या क्षेत्रातील भारताच्या व्याप्तीचे प्रमाण पाहता त्या तुलनेत भारताला कोणताही प्रतिस्पर्धी नसल्याचे ते म्हणाले.जर भारताला केवळ डिजिटल राष्ट्र म्हणून वर्गीकृत केले, तर भारत जगातील तिसरे सर्वात मोठे डिजिटल राष्ट्र ठरेल असे ते म्हणाले. 11 वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी अदृश्य डिजिटल महामार्ग तयार करण्याचा आणि त्या डिजिटल महामार्गाच्या माथ्यमातून अनेक उपयोजने चालवण्याचा, ती तयार करण्यासाठी क्षमता निर्माण करण्याचा दूरदृष्टीकोन मांडला होता. तो आज प्रत्यक्षात उतरला आहे असे ते म्हणाले.

बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडचे आर्थिक पुनरुज्जीवन ही दूरसंवाद विभागाच्या सर्वात उल्लेखनीय कामगिरींपैकी एक असल्याचे सिंधिया यांनी सांगितले. 18 वर्षांनंतर, बीएसएनएल कार्यान्वयीन स्तरावर नफ्यात आले असून, आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत बीएसएनएलने 262 कोटी रुपये आणि चौथ्या तिमाहीत 280 कोटी रुपये नफ्याची नोंद केली अशी माहिती त्यांनी दिली. बीएसएनएलचा व्याज, कर, घसारा आणि ऋणमुक्ती पूर्व नफा (EBITDA - Earnings Before Interest, Taxes, Depreciation, and Amortization) तिपटीने वाढून 5,395 कोटी रुपये झाला आहे, तर नुकसान 5,400 कोटी रुपयांवरून 2,400 कोटी रुपयांपर्यंत कमी झाले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

संपूर्णपणे स्वदेशी 4G स्टॅकची यशस्वी अंमलबजावणी ही या ठोस राष्ट्रीय परिवर्तनात आघाडीची कामगिरी आहे असे ते म्हणाले. या अंमलबजावणीतून भारताने तंत्रज्ञानाच्या पातळीवर एक मोठा टप्पा गाठला असून, यामुळे भारताने स्वतःचे एंड-टू-एंड दूरसंवाद तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता असलेल्या प्रतिष्ठित देशांमध्ये स्थान मिळवले असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
सरकारच्या 100% दूरसंचार संपूर्णता अभियानांतर्गत, भारताने एका वर्षात आपल्या लक्ष्यापैकी 75% लक्ष्य साध्य केले असल्याची माहिती त्यांनी दिली. 4G संपृक्तता प्रकल्पांतर्गत नियोजित 17,000 टॉवर्सपैकी जवळपास 13,000 टॉवर्सची आधीच स्थापित केले आहेत.
आकांक्षीत जिल्ह्या योजनेअंतर्गत 81% संपृक्तता साध्य केली आहे, तर नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये पहिल्या टप्प्यात शून्य टक्क्यांवरून 57% आणि दुसऱ्या टप्प्यात 74% वरून 87% पर्यंत प्रगती साध्य केली असल्याचेही त्यांनी सांगितले. द्वीप प्रदेशांमध्येबी यशस्वी अंमलबजावणीचे प्रमाण 38% वरून 84% पर्यंत सुधारले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2180535)
आगंतुक पटल : 28