पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे झालेल्या जी20 पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत दिले भारताचे समारोपीय निवेदन
हवामान बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास यासारख्या जागतिक आव्हानांचा सामना केवळ सहकार्य, सहयोग आणि बांधीलकीच्या भावनेतूनच केला जाऊ शकतो - भूपेंद्र यादव
Posted On:
17 OCT 2025 5:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2025
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा सांगितले आहे की आपण नेहमीच हे लक्षात ठेवले पाहिजे की या वसुंधरेचे केवळ 'विश्वस्त' आहोत ‘मालक’ नाही", असे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केपटाऊन येथे सांगितले. ते दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात आयोजित जी20 हवामान आणि पर्यावरणीय शाश्वतता कार्यगटाच्या मंत्रीस्तरीय बैठकीत भारताचे समारोपीय निवेदन देत होते. अनुकरणीय नेतृत्वाबद्दल तसेच विविध पर्यावरणाशी संबंधित गुंतागुंतीच्या आणि विविध मुद्द्यांवर विचारमंथन करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याबद्दल यादव यांनी भारताच्या वतीने दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचे मन:पूर्वक आभार मानले.
यादव यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधींचे स्मरण केले आणि सांगितले, “सत्य - केवळ बोलले आणि ऐकलेच नाही तर स्वीकारलेदेखील जाते. आणि आज, आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे की हवामान बदल, पर्यावरणाचा ऱ्हास ही आपल्यासमोरील खरी आव्हाने आहेत”, असे ते म्हणाले. जगासमोरील या आव्हानांचा सामना केवळ सहकार्य, सहयोग आणि बांधिलकीच्या भावनेतूनच शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले. शिखर परिषदेतील आपल्या उद्घाटन भाषणातील आपल्या निरीक्षणांचा पुनरुच्चार करताना यादव म्हणाले की पॅरिस कराराचे दशक आणि त्याअंतर्गत केलेल्या कामावरून असे दिसून येते की काहीही अशक्य नाही. जर आपण ‘वसुंधरेसाठी आणि जनतेसाठी’ हितकारक अशा विकास प्रारूपाचा स्वीकार केला तर विकास आणि पर्यावरण संरक्षण हातात हात घालून पुढे जाऊ शकतात, हे भारताच्या अनुभवावरून दिसून येते असेही ते म्हणाले.
जी20 राष्ट्रे जागतिक जीडीपी आणि मानवी लोकसंख्येच्या 80% पेक्षा जास्त प्रतिनिधित्व करतात आणि म्हणूनच ग्लोबल साउथच्या विकासात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी एक संघ म्हणून एकत्र काम करण्याची सामुहिक जबाबदारी या देशांवर आहे, याची यादव यांनी उपस्थितांना आठवण करून दिली. “विविध पर्यावरणीय समस्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वास्तववादी आणि प्रेरणादायी असला पाहिजे. वास्तववादी - जेणेकरून संबंधित राष्ट्रीय परिस्थिती, क्षमता आणि जबाबदाऱ्या लक्षात घेता येतील. प्रेरणादायी - कारण भविष्यातील पिढ्यांसाठी आपले कर्तव्य आहे”, असेही ते म्हणाले.
भारताने हवामान बदलाशी जुळवून घेण्यात साध्य केलेल्या कामगिरीविषयी बोलताना यादव यांनी माहिती दिली की 2025 मध्ये भारताने आपल्या एकूण वीज निर्मिती क्षमतेपैकी 50% पेक्षा अधिक हिस्सा गैर जीवाश्म स्रोतांमधून निर्माण करण्याचे लक्ष्य पूर्ण केले आहे, आणि तेही पॅरिस करारातील सुधारिता एनडीसी उद्दिष्टांच्या पाच वर्ष आधीच. उदाहरण म्हणून त्यांनी सांगितले की, “2014 मध्ये भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता फक्त 2.8 गिगा वॅट्स होती जी उल्लेखनीय वाढ नोंदवत 2025 मध्ये 127 गिगा वॅट्सवर पोहोचली आहे. म्हणजे गेल्या 11 वर्षांत 45 पट वाढ झाली आहे”. यातून हे स्पष्ट होते की, जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्गही असतो, असे ते म्हणाले. यावेळी यादव यांनी दिवंगत नेल्सन मंडेला यांचे उद्गार उद्धृत केले, 'जोपर्यंत एखादे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते नेहमीच अशक्य वाटत असते'.
"या महान व्यक्तिमत्त्वांपासून प्रेरणा घ्या, सत्य स्वीकारा, एकत्र राहा, एकमेकांवर विश्वास ठेवा आणि आपल्या लोकांचे जीवन सुंदर बनवण्यासाठी आणि आपली वसुंधरा वाचवण्यासाठी एकत्रितपणे काम करा" असे आवाहन करत यादव यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2180508)
Visitor Counter : 4