कृषी मंत्रालय
कृषी विज्ञान केंद्रांच्या सक्षमीकरणासंदर्भात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, पदोन्नती , सेवानिवृत्तीचे वय आणि इतर लाभांच्या मुद्यांबाबत शिवराज सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2025 6:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2025
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली मधील कृषी भवन इथे, देशभरातील कृषी विज्ञान केंद्रांना अधिक प्रभावी आणि सक्षम बनवण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली.

सध्या देशभरात 731 कृषी विज्ञान केंद्रे कार्यरत असून, या केंद्राचे जाळे विस्तारण्याचे काम करताना, ही केंद्रे छोट्या शेतकऱ्यांसीठी लाभदायक ठरतील अशारितीने त्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे असल्याची बाब शिवराज सिंह चौहान यांनी या बैठकीत अधोरेखित केली. कृषी विज्ञान केंद्रे ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्राथमिक स्तरावरचे माध्यम आहे, त्यासोबतच तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रशिक्षण आणि कृषी क्षेत्राशी संबंधित नवोन्मेष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात ही केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी विज्ञान केंद्रांनी सरकारची शेतकरी स्नेही धोरणे, कार्यक्रम आणि योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सक्रियपणे मदत करावी, शेतकऱ्यांचे कल्याण आणि जागरूकता निर्माणतही सहभाग द्यावा असे आवाहन त्यांनी केले. कृषी विज्ञान केंद्रांनी एकात्मिक शेती आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारे प्रारुप विकसित करण्याची सूचनाही त्यांनी केली.
कृषी विज्ञान केंद्रांचे कामकाज सुरळीतपणे चालावे तसेच त्यांची परिणामकारकता सुधारावी यासाठी या केंद्रांना पुरेसे आर्थिक पाठबळ, मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा आधार मिळेल याची सुनिश्चिती करावी, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. कृषी विज्ञान केंद्रांमधील वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांच्या पात्रतेनुसार त्यांच्या बढत्या आणि त्याअनुषंगाने शैक्षणिक समानतेची सुनिश्चिती करण्याची गरजही चौहान यांनी यावेळी अधोरेखित केली.
प्रशिक्षण, संशोधन विस्तार आणि कृषी उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सर्व कृषी विज्ञान केंद्रांमध्ये एकरूपता असावी, अशी सूचनाही त्यांनी केली कृषी विज्ञान केंद्रांमधील वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, बढत्या, सेवानिवृत्तीचे वय, आणि सेवानिवृत्तीनंतरचे लाभ याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. या मुद्यांशी संबंधित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी, राज्य सरकारे, नीती आयोग आणि अर्थ मंत्रालयाशी समन्वय साधून, सर्वसमावेशक उपाययोजना आखाव्यात असे निर्देशही शिवराज सिंह चौहान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
छोट्या शेतकऱ्यांना अधिक परिमाणकारक सेवा देता यावी यासाठी कृषी विज्ञान केंद्रांच्या सक्षमीकरणाची गरजही त्यांनी पुन्हा व्यक्त केली. यामुळे या केंद्रांचे कार्य प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल आणि देशातील कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीतही योगदान सुनिश्चित होईल असे ते म्हणाले.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2180138)
आगंतुक पटल : 35