संरक्षण मंत्रालय
संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यात योगदान देणाऱ्या देशांच्या वरिष्ठ लष्करी नेतृत्व आणि अधिकाऱ्यांची परिषद - 2025 नवी दिल्लीत सुरू
Posted On:
14 OCT 2025 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2025
संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यात योगदान देणाऱ्या देशांच्या (यूएनटीसीसी) प्रमुखांची परिषद - 2025 चे औपचारिक उद्घाटन 14 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे झाले. या ऐतिहासिक उपक्रमाने आंतरराष्ट्रीय शांतता राखण्याच्या कार्यात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या या परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यात योगदान देणाऱ्या 32 देशांचे वरिष्ठ सैन्य अधिकारी तसेच संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत. या उद्घाटन सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंह, वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी जागतिक शांतता मोहिमेचे भविष्य एकत्रितपणे ठरवण्यासाठी रूपरेषा तयार केली.
पहिल्या दिवसाच्या कार्यवाहीचा आढावा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या मुख्य भाषणात शांतता मोहिमेवरील भारताचा विश्वास पुन्हा अधोरेखित केला. हा विश्वास ‘वसुधैव कुटुंबकम’ आणि ‘अहिंसे’च्या भारतीय नीतिमत्तेतून उगम पावतो, असे त्यांनी सांगितले. त्यांनी 50 हून अधिक मोहिमांमध्ये सेवा दिलेल्या भारतीय शांतीदूतांच्या त्याग आणि सेवाभावाचे कौतुक केले. शांतता राखणे हे केवळ लष्करी कर्तव्य नाही तर मानवतेप्रती एक नैतिक बांधिलकी आहे, यावर त्यांनी भर दिला.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आपल्या भाषणात, भारताने 50 हून अधिक संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांमध्ये सुमारे 3,00,000 शांती सैनिक पाठवले आहेत, असे सांगितले. तसेच योगदान देण्याचा भारताचा वारसा आणि नवी दिल्लीतील संयुक्त राष्ट्रांच्या शांती अभियान केंद्राच्या माध्यमातून भारताची सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित केली. संयुक्त राष्ट्रांच्या शांती संचालन विभागाचे (डीपीओ) अंडर सेक्रेटरी जनरल जीन-पियरे लॅक्रोइक्स यांनीही या मेळाव्याला संबोधित केले. ही परिषद आयोजित करण्यात भारताच्या नेतृत्वाचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विशेषतः विषम धोके, जटिल राजकीय वातावरण आणि मानवतावादी आव्हानांनी व्यापलेल्या प्रदेशात मोहिमांची विश्वासार्हता आणि शाश्वतता मजबूत करण्यासाठी सैन्य योगदान देणाऱ्या देशांचे महत्त्व अधोरेखित केले. .
नंतर, जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी माणेकशॉ सेंटरमध्ये कझाकस्तान, किर्गिझस्तान आणि व्हिएतनाम या देशांच्या लष्करप्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठकींच्या मालिकेत भाग घेतला. एक दिवस आधी, जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी फ्रान्स, मंगोलिया, उरुग्वे, श्रीलंका आणि भूतानच्या लष्करप्रमुखांशी संवाद साधला होता. प्रत्येक द्विपक्षीय बैठकीत, संरक्षण सहकार्य मजबूत करणे आणि भविष्यातील शांतता मोहिमांमध्ये समन्वय वाढवणे यावर केंद्रित चर्चा झाली. या सहभागामुळे जागतिक शांतता आणि स्थिरता वाढविण्यासाठी संवाद, भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या भावनेला बळकटी मिळाली.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2179184)
Visitor Counter : 5