ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतर क्षेत्रीय सहयोग ही विकसित भारत @2047 चे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्याची गुरुकिल्ली आहे : प्राध्यापक प्रेमलाल पटेल


भारतीय मानक ब्युरो (BIS), नागपूरच्या वतीने "उत्तम जगाच्या निर्मितीसाठी सामायिक दृष्टिकोन : शाश्वत विकास उद्दिष्टे 17 वर विशेष लक्ष" या संकल्पनेवर आधारित उपक्रमांनी जागतिक मानक दिन साजरा

Posted On: 14 OCT 2025 8:35PM by PIB Mumbai

नागपूर, 14 ऑक्टोबर 2025

 

भारतीय मानक ब्युरो (BIS), नागपूर येथील शाखा कार्यालयाने "उत्तम  जगाच्या निर्मितीसाठी सामायिक दृष्टिकोन -शाश्वत विकास उद्दिष्टे 17 वर विशेष लक्ष: ध्येयांसाठी भागीदारी" या संकल्पनेवर आयोजित एका विशेष कार्यक्रमासह 'जागतिक मानक दिन 2025' साजरा केला.

शाश्वत विकास उद्दिष्टे आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय प्रत्यक्षात साकारण्यासाठी आंतर क्षेत्रीय सहयोग अतिशय महत्त्वाचा घटक असल्याचे विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी), नागपूरचे संचालक प्रा. प्रेमलाल पटेल यांनी प्रमुख पाहुणे म्हणून दिलेल्या बीज  भाषणात सांगितले.

मानवतेच्या कल्याणासाठी एकूण सतरा शाश्वत विकास उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली आहेत. मात्र नैसर्गिक आणि मानव निर्मित अशा दोन्ही प्रकारच्या संकटांमुळे त्याविषयीच्या प्रगतीमध्ये अडथळे येत आहेत. अशा संकंटांवर मात करण्यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योगजगत, नागरिक, नागरी समाज संघटना आणि भारतीय मानक ब्युरो यांच्यातील सहकार्य आवश्यक आहे, असे प्राध्यापक पटेल यांनी सांगितले.

शाश्वत विकासातील मानकांची भूमिका विशद करताना ते म्हणाले की शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्यासाठी आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानके भक्कम पायाचे कार्य करतात. मानके परस्पर विश्वास निर्माण करतात, दृढता सुनिश्चित करता आणि विविध स्तरातील हितधारकांना एका सामायिक ध्येयाच्या दिशेने एकत्र आणण्याचे काम करतात, असे ते म्हणाले.

हवामान बदल विषयक कृती, नवीकरणीय ऊर्जा, शाश्वत औद्योगिक पद्धती आणि डिजिटल परिवर्तन ही चार महत्त्वाची क्षेत्रे असून कार्यक्षम मानकीकरण आणि सहकार्याच्या बळावर  शाश्वत विकासाकडे आणि आत्मनिर्भर भविष्याच्या दिशेने होणाऱ्या भारताच्या प्रगतीमधील  हे महत्त्वाचे टप्पे असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, बीआयएस नागपूर शाखेचे संचालक  हेमंत आडे यांनी उद्घाटनपर भाषण केले आणि विषयाची ओळख करून दिली. त्यांनी उद्योग आणि संस्थांमध्ये मानकांचा अवलंब आणि अंमलबजावणी करून गुणवत्ता, सुरक्षितता आणि शाश्वतता वाढविण्याच्या बीआयएसच्या सातत्यपूर्ण  प्रयत्नांविषयी माहिती दिली.

याशिवाय या कार्यक्रमात आयोजित विशेष सत्रांमध्ये या क्षेत्रातील तज्ञांनी तांत्रिक माहिती दिली, यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये मानकांचे  एकत्रीकरण, नवोन्मेषाला चालना, पर्यावरणीय जबाबदारी आणि समावेशक वाढ यावर चर्चा करण्यात आली.

संयुक्त राष्ट्रांनी 2015 मध्ये अंगीकार केलेली  17 शाश्वत विकास उद्दिष्टे एक चांगले आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी एक वैश्विक चौकट  म्हणून कार्य करतात.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2179144) अभ्यागत कक्ष : 20
Read this releasein: English