अर्थ मंत्रालय
"ऑपरेशन गोल्डन स्वीप" अंतर्गत मुंबईतील विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई – ट्रान्झिट प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली सोन्याची तस्करी करणारी टोळी आणली उघडकीला; सुमारे 12.58 कोटी रुपयांचे 10.5 किलो सोने जप्त, 13 जणांना अटक
Posted On:
11 OCT 2025 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2025
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मिळवलेल्या विशेष गुप्त माहितीच्या आधारे, "ऑपरेशन गोल्डन स्वीप" या विशेष मोहिमेदरम्यान, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (सीएसएमआय) विमानतळावर परदेशी नागरिक, विमानतळ कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय सोने तस्करी टोळीतील इतरांना अटक करण्यात आली. या कारवाईत त्यांच्याकडून सुमारे 12.58 कोटी रुपयांचे 10.488 किलो 24 कॅरेट मूळ परदेशी सोने जप्त करण्यात आले.

या मोहिमेद्वारे, डीआरआयने एक अत्यंत संघटित सोन्याची तस्करी करणारी टोळी यशस्वीरित्या उघडकीस आणली आणि 13 जणांना अटक केली. अटक केलेल्या व्यक्तींमध्ये दोन बांगलादेशी नागरिक, सहा श्रीलंकेचे नागरिक, दोन मीट-अँड-ग्रीट सेवेतील विमानतळ कर्मचारी, दोन हँडलर आणि मुंबईतील मुख्य सूत्रधाराचा समावेश आहे.
तपासात असे दिसून आले की एका आंतरराष्ट्रीय टोळीने अत्याधुनिक कार्यपद्धतीचा अवलंब करत ‘ट्रान्झिट प्रवाशां’चा वापर केला होता. दुबईहून सिंगापूर, बँकॉक आणि ढाका येथे मुंबईमार्गे जाणारे प्रवासी वाहक म्हणून काम करायचे. हे प्रवासी त्यांच्या शरीरात अंड्याच्या आकाराच्या मेणाच्या कॅप्सूलमध्ये सोने लपवून नेत असत.
मुंबईत आगमन झाल्यावर, ट्रान्झिट प्रवासी गुप्तपणे तस्करी केलेले सोने आंतरराष्ट्रीय प्रस्थान क्षेत्रातील विमानतळ कर्मचाऱ्यांना सुपूर्द केले.त्यानंतर, कर्मचारी ते सोने बेकायदेशीरपणे विमानतळ परिसरातून बाहेर काढून ते हँडलर्स आणि रिसीव्हरकडे देत असत, जे पुढे मुख्य सूत्रधाराशी संपर्क साधत असत. मुंबई आणि दुबई येथील सूत्रधारांच्या नियंत्रणाखाली चालवल्या जाणाऱ्या या टोळीत ट्रान्झिट प्रवासी, विमानतळ कर्मचारी, हँडलर आणि रिसीव्हरच्या अनेक थरांचा समावेश होता.
ही यशस्वी कारवाईमुळे डीआरआयच्या गुप्तचर क्षमता, जलद अंमलबजावणी आणि तस्करी करणाऱ्या टोळीच्या नवनवीन पद्धती उघड करण्यासाठी समन्वित कारवाईचे प्रयत्न या बाबी अधोरेखित झाल्या. तसेच, या कारवाईमुळे संवेदनशील पायाभूत सुविधांमधील वाढते अंतर्गत धोके देखील अधोरेखित झाले आहेत, कारण संघटित टोळ्या आर्थिक फायद्यासाठी ट्रान्झिट मार्ग आणि विमानतळ कर्मचाऱ्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
डीआरआय भारताच्या आर्थिक हितसंबंधाचे आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्याच्या आपल्या बांधिलकीवर ठाम असून अशा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांकडून उद्भवणाऱ्या धोक्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2177934)
Visitor Counter : 9