केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते यूपीएससी संकुलामधील आयुर्वेद क्लिनिकचे उद्घाटन
Posted On:
24 SEP 2025 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2025
केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष डॉ. अजय कुमार, यांनी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आवारातील आयुर्वेद क्लिनिकचे (उपचार केंद्र) उद्घाटन केले. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (एआयआयए) या क्लिनिकची स्थापना केली असून यूपीएससीच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालय, आयआयटी दिल्ली आणि सफदरजंग रुग्णालय यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील अशाच प्रकारच्या आयुष सुविधांच्या धर्तीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना डॉ. अजय कुमार यांनी आयुर्वेदातील भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकला, तसेच यूपीएससीने जूनमध्ये साजऱ्या केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे स्मरण करून, आधुनिक आरोग्य विषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी योग आणि आयुर्वेदाच्या एकत्रित उपयुक्ततेवर भर दिला. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन आयुर्वेद उपचार केंद्र अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि कल्याणाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून, प्रतिबंधात्मक काळजी आणि सर्वसमावेशक जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आयुष मंत्रालयाचे पाठबळ असलेला हा उपक्रम योग आणि ताण व्यवस्थापन कार्यशाळांसारख्या सध्याच्या कल्याणकारक उपायांना पूरक असून, पारंपरिक औषध प्रणाली आधुनिक संस्थात्मक व्यवस्थेमध्ये कशी एकरूप होऊ शकते, हे प्रतिबिंबित करतो.
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रतापराव जाधव यांनी अधोरेखित केले की, यूपीएससी संकुलातील आयुर्वेद क्लिनिक पारंपरिक औषध पद्धतींना आधुनिक आरोग्य सेवेशी जोडण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाला पुढे नेण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपारिक औषधांसाठी जागतिक केंद्राची स्थापना, देशभरातील आरोग्य केंद्रांमध्ये आयुर्वेद युनिट्स आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेसाठी "आयुष आहार" चा प्रचार, या उपक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेदाचे अभूतपूर्व पुनरुज्जीवन झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने सुरु केलेल्या या नवीन सुविधेचा लाभ केवळ यूपीएससीचे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनाच मिळणार नाही, तर इतर संस्थांमध्ये सर्वांगीण निरामय जीवन आणि निरोगी जीवनशैलीच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी एक मॉडेल म्हणून काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयुष सचिव राजेश कोटेचा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सचिव शशी रंजन कुमार, एआयआयए, चे संचालक प्रा. प्रदीपकुमार प्रजापती, यांच्यासह इतर नामवंत प्राध्यापक, आणि दोन्ही संस्थांचे उच्चपदस्थ अधिकारी उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2170946)
Visitor Counter : 5